Call 9923974222 for dealership.

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे

कल्पना करा
 • तुम्हाला अमिथाभ बच्चनचा फोन आला, तुम्ही "करोडपती" खेळले व करोडपती झाले!
 • तुमच्या दहा एकर क्षेत्रात, तीन महिन्यात, ३२० टन टरबूज झाले. या टरबुजाला २० रु किलोचा भाव मिळून, ६४ लाख तुमच्या खात्यात जमा झाले! 

तुम्हाला किती आनंद होईल व हा आनंद किती दिवस टिकेल?

कल्पना करा

 • जिने तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं, आणाभाका घेतल्या, तिने अचानक तुम्हाला नाकारून दुसऱ्या सोबत लग्न केले. 
 • तुमच्या लाडक्या पांढऱ्या-कवड्या बैलजोडीतील "पांढऱ्या" अचानक वारला 
तुम्हाला किती दुख: होईल व हे दुख: तुम्ही किती दिवस कुरवाळत बसाल?
आपण अनेक विषयांवर भाष्य करणाऱ्या अनेक विशेषज्ञ लोकांना टीव्हीवर बघीतले आहे. त्यांनी वर्तवलेली भाकिते जेमतेमच असते हे आपल्या एव्हाना लक्षात आलेलेच असेल. त्यांचे सोडा, आपण स्वत: बद्दल तज्ञ असतोच ना! मग आपल्या भावनांबद्द्ल भविष्य वर्तवू शकतो का? व वर्तवले तर ते किती खरे ठरते? आपल्याला स्वत:बद्दल किती ज्ञान आहे? आपल्याला आनंद झाला तर तो किती काळ पुरतो व दुख: किती दिवस टिकून रहाते?
माझा मित्र हाडाचा शेतकरी आहे. शेकडो एकर शेती आहे. गावात त्याचा मोठ्ठा वाडा आहे. उच्चशिक्षण झाल्यावर त्याने शेतीकडेच लक्ष दिले. लग्न झाले. सुशिक्षित व सुविद्य पत्नी मिळाली. दोघांनी मिळून एका सुरेख बंगल्याचे स्वप्न बघितले. लवकरच त्यांनी शहरात हा बंगला घेतला. अगदी स्वप्नवत बंगला! शहरातील सर्वात शानदार बंग्ल्यापैकी एक!! त्याचे सर्वांना कौतुक आहे. सर्व त्याचे व त्याच्या पत्नीचे गुणगान गातात. या घरात आपला संसार सुखाचा होईल हि त्यांची भावना होती. काही काळ लोटल्यावर आता मात्र ते दुखी आहेत. तो घरी येतो तेव्हा त्याला त्यात तितका आनंद मिळत नाही जो पहिले मिळत होता. इथपर्यंत ठीक आहे पण त्याला जास्त वाईट वाटते आहे कारण तो नियमित दीड तास प्रवास करून गावी जातो व तितकाच वेळ प्रवास करून परत येतो. रोजचा हा तीन तासाचा प्रवास त्याच्या दुखाचे मूळ कारण ठरले आहे. त्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. नवरा नेहमीच घराबाहेर असतो या विचाराने मित्राची पत्नी देखील दुखी:च आहे.
ज्या बंगल्यात संपूर्ण जीवनाचे सुख शोधले ते सुख आता दुखः होऊन बसले आहे. आता कुटुंब परत आपल्या गावातील वाड्यावर न्यायचं असं त्याने ठरवले आहे.
स्वप्न पूर्ण होऊन देखील त्याचा वाईट परिणाम माझ्या मित्राच्या जीवनावर झाला.
जीवनातल्या नकारात्मक घटनांचा परिणाम काय होतो? 
चार एकर कोरडवाहू शेती, आई-वडील, दोन बहिणी असे घर. वडिलांनी कर्जाला डोंगराला कंटाळून आत्महत्या केल्यावर १९ वर्षाच्या विजूवर सगळी जबाबदारी येवून पडली. "शेती करून कुणाचे भले झाले?" सर्वांनी त्याची समजूत काढली, "शेती विक -शहरात मजुरी कर." सुरवातीला विजू कोलमधून पडला पण त्याने शेतीकडेच लक्ष द्यायचे असे ठरवून टाकले. शहरात मजुरी करून बहिणींचे लग्न झेपणार नाही व कर्जाचा डोंगर देखील सरकणार नाही हे त्याने हेरलं. स्वत:ची जमीन कोरडवाहू होती म्हणून बाजूची दहा एकर बागायती कसायला घेतली. जवळची शहरी बाजारपेठ हेरून भाजीपाला लावत आगेकूच केली. दोघी बहिणीची लग्न लावून आता तो देखील बोहोल्यावर चढणार आहे. कर्जाचा डोंगर? आता त्याच्यात इतकी धमक आहे कि त्याला या कर्जाची भीती वाटतच नाही. 
सुखाचे दुख: व्हायला वेळ लागत नाही पण दुखा:तून सुख उमलायला थोडा वेळ जावू द्यावा लागतो. डगमगून भागत नाही.
मित्रहो, स्वत:साठी आपण काय मागाल ते सांभाळून मागायला हवे कारण पूर्ण होणारी स्वप्न देखील नंतर दुस्वप्न होऊन बसतात व दुखा:चा डोंगर सुखी जीवनाचे सूत्र शिकवून जातो.  जीवन सुख-दुखाची वीण आहे पण जर तुम्ही खास काळजी घेतली तर तुमची स्वप्न तितकीशी दुखःदायी कधीच होणार नाहीत.
 • नकारात्मक गोष्टी ज्यांची तुम्हाला सवय होणार नाही त्या अजिबात स्वीकारू नका. जसे...रोजचा प्रवास. पाठ फिरवली कि बसून रहाणारे नोकर. पिढ्यान पिढ्या चालत आलेले पण नफा न देणारे पिक. भिकेला लावणारी नालायक मालकाकडील चाकरी.
 • कार, बुलेट, बंगला, लॉटरी, मोबाईल अश्या चीजवस्तूंकडून आयुष्यभराच्या सुखाची अपेक्षाच करूच नका.
 • तुमची दुख: एका झटक्यात संपतील हा विचार सोडून द्या. एकाच हंगामात तुमचे सगळे कर्ज फिटून तुम्ही गाडी-बंगला कराल हे दिवास्वप्न आहे.
 • स्वत:साठी शक्य तितका मोकळेपणा व स्वातंत्र्य मिळेल असे बघा. स्वातंत्र्य हि आनंदाची खरी गुरुकिल्ली आहे. ते कधीही गमावू नका. स्वत:ची बाजारपेठ बनवायचा प्रयत्न करा. बांधावर प्रकिया उद्योग सुरु करा. जोपर्यंत तुम्ही बाजार समितीत माल न्याल, तुमचे पारतंत्र्य सुटणार नाही.
 • तंबाखू-बिडी-सिगारेट-दारू अशा फालतू नशा करू नका. वेळ चांगला जावा म्हणून खर्च झाला तर चालेल पण स्वत:चा चांगला छंद जोपासा, त्यातून तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल.
 • जीवाभावाचे पारिवारिक मित्र जमवा. सायंकाळ झाली कि नसत्या मैफिली करणारे, भारंभार,  चिंधीखोर चमचे व लंपट पुढारी जवळपास देखील नकोत.
------------------------------------------

शेतकरी बांधवांसाठी दिशादर्शक पुस्तके, फोटोवर क्लिक करून खरेदी करू शकता.

--------------------------------------------

हा ब्लॉग लिहिता लिहिता नकळत गाणे गुणायला लागलो....ऐरणीच्या देवा तुला..

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी ऱ्हाऊ दे
लेऊ लेनं गरिबीचं, चनं खाऊ लोखंडाचं
जिनं व्हावं आबरुचं, धनी मातुर माझा देवा, वाघावानी असू दे
लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली
इडा पीडा जाईल, आली किरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे
सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी
घावं बसंल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊ दे.
--------------------------------
आपल्या कामात देव पहा, कार्यास पूजा माना, जे मिळाल त्यात सुखी रहा, आत्मसन्मान सांभाळा, आपले व आपल्या माणसांचे आरोग्य चांगले राहील हे पहा. हसत बागडत रहा, येईल त्या संकटाला सामोरे जायची तयारी ठेवा व हे जीवन ज्याने दिले त्या निसर्गाचे आभार माना असे सांगणारे हे सुरेल गाणे....तुम्ही ते ऐकल्याशिवाय व गुणगुणल्या शिवाय या  ब्लॉगचा उद्देश अपूर्णच राहील.

1 comment

 • अप्रतिम लेख आहे

  Rahul marade

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published