शेती तुमची आणि माझी

शेती तुमची आणि माझी

जेव्हा एखादा शेतकरी "कोणती शेती करू?" असा प्रश्न विचारतो तेव्हा माझ्या समोर एक मोठा प्रश्‍न उभा राहतो...  “तू कोण आहेस?”  (इथल्या एकेरी उद्गारा बद्दल माफी असावी.)

तो एखादा तरूण शेतकरी असेल, ज्याला पुढील तीन महिन्यात पैसा हवा असेल. तो एखादा असा तरुण असेल, जो शहरात राहून,  नोकरी करुन, निमबटायीने शेती करित असेल. तो एखादा डॉक्टर असेल, ज्याला हौशे पोटी शेती करायची असेल. तो एखादा कर्जबाजारी, अल्पभूधारक शेतकरी असेल. या प्रत्येकासाठी सल्ला वेगवेगळा असणार आहे! 

एकदा मी एका “हळद व मिरची कांडप उद्योगाला” भेट दिली. तिथे त्या संदर्भातील यंत्र सामुग्री होती. सगळी व्यवस्था अतिशय नेटकी होती. मालकाशी बोलते वेळी जे मी ऐकले ते अपेक्षे पेक्षा खूप वेगळे होते. हे महाशय हळद व तिखटाचे निर्यातकर्ते होते. ते स्वत:या पिकांचे संपूर्ण सेंद्रिय उत्पाद्न घेत व त्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करीत. यातून त्यांना तत्काल व भरगोस नफा मिळत होता.

अर्थात त्यांच्या शेतीतून येणारे कृषी उत्पादन, त्यांची यंत्रसामुग्री पुरेशी चालावी किंवा मालाची मागणी पूर्ण करू शकेल इतके नव्हते. त्यामुळे  सोबतच ते सेंद्रिय खताचे व हर्बल औषधीची छोट्या प्रमाणात निर्मिती करीत. हि उत्पादने खुल्या बाजारपेठेत न विकता ते हि उत्पादने माफक किमतीत इतर “मिरची व हळद” उत्पादक शेतकरी बांधवास विक्री करीत, सोबत स्वअनुभवातून सिद्ध झालेले मार्गदर्शन करीत. खतांच्या व औषधींच्या किमती माफक असल्याने, त्यांना यात फार नफा नव्हता पण पैसा रोखीचा होता. या कृतीतून अनेक शेतकरी त्यांच्याशी जुळून होते शिवाय या शेतकऱ्यापैकी काहींकडून ते उत्तम दर्जाची मिरची व हळद करार पद्धतीने खरेदी करित. यामुळे त्यांना निर्यातक्षम “तिखट व हळद” योग्य दरात व पुरेशा प्रमाणात उत्पादन करता येत होती. कच्चा माल हक्काने उपलब्ध होत असल्याने त्यांना “हळद व तिखट” निर्यातीद्वारे मिळणाऱ्या अगावू रकमेची शास्वती होती. निर्यातीतून मिळणारा नफा त्यांच्या खर्चापेक्षा जास्त होता (बहुउद्योगी असूनही त्यांचा व्यक्तिगत व व्यावसायीक खर्च कमी होता!). त्यामुळे उर्वरित बहुतांश पैसा ते दीर्घकाळासाठी गुंतवून ठेवत. पैसा गुतंवणूक करते वेळी ते काही रक्कम सरकारी फंडात, काही रक्कम शेअर्स मध्ये तर उर्वरित रक्कम जमीनित अडकवून ठेवत. या पैकी काही मौक्यावरील जागा त्यांनी हॉटेल व्यवसाईकाना भाडे तत्वावर दिल्या होत्या. यातून त्यांना महिन्याकाठी भाड्याची देखील शास्वती होती. आता यांना नेमके काय म्हणावे? शेतकरी, उद्योजक, व्यापारी कि गुंतवणूकदार? मिरची व हळदीच्या शेतीशिवाय इतर कोणतेही पिक घ्यायची त्यांना गरज नव्हती व ते त्यांनी घेतले तरी उद्योगाला लागणारा कच्चा माल त्यांना इतर शेतकऱ्या कडून सहज मिळणार होता.

एका कोकणकन्येची कथा देखील अतिशय वेगळी आहे. सुंदर-सालस दिसणारी मुलगी. वडील साधे शेतमजूर, पडेल ते काम करणारे. भाऊ शिकून मुंबईत कुठल्याश्या ऑफिस मध्ये कारकून म्हणून लागला. तिला नटण्याची आणि नाटकाची भारी आवड! भावाकडे गेली व हौसेपोटी नाटकात काम करू लागली. तिला यातून गरजेपेक्षा जास्त पैसा मिळू लागताच तिने गावाकडे शेती विकत घ्यायला सुरवात केली (गरजा वाढू न देण्याचे तिचे चातुर्य मात्र वाखाणण्याजोगे म्हणावे लागेल!). सुरवातीला पैसा फार नव्हता त्यामुळे शेतीचे तुकडे देखील छोटे होते. दरम्यान तिचे लग्न एका पर्यटक उद्योगात नोकरी करणाऱ्या तरुणाशी झाले. वडिलांच्या व पतीच्या मदतीने तिने या छोट्या तुकड्यांवर कोकणी घरे बनवायला लावली व चक्क कृषीपर्यटन सुरु केले. ती एक नटी असल्याने तिची सोशल मिडीयावर चांगली पकड! तिच्या चाहत्यांना या पर्यटनात रुची नसली तरच नवल! तिथे आल्येल्या तिच्या शहरी पाहुण्यांना, तिचे वडील व पती दोघे मिळून, शेतीचे धडे देतात सोबत कोकणी स्वादिष्ट जेवण तर असतेच! तुम्ही या तरुणीला काय म्हणणार? नटी, शेतकरी, उद्योजिका कि सोशल मिडिया इनफ्ल्यूअन्सर? "कोणती शेती करू?" हा प्रश्न तिच्यासमोर येणे अशक्यच आहे.

माझा एक मित्र जळगावातील एका कारखान्यात नोकरीला आहे. त्याचे मोठे भाऊ सर्व वडिलोपार्जीत शेती पहातात. ते मुख्य करून चारा पिके घेतात व सोबत कापसाची शेती करतात. यातून आवक कमी पडते म्हणून ते दळणवळण क्षेत्रात हंगामी नोकरी करतात. स्वत:च्या व भावाच्या शेतीतून त्यांना पुरेसे उत्पादन मिळत नाही हि त्यांची शोकांतिका आहे. याच मित्राच्या पत्नीचे भाऊ देखील शेतकरी आहे. ते खानदानी शेतकरी आहेत. शेती प्रतिष्ठेची नाही म्हणून त्यांनी कर्ज काढून दळणवळण क्षेत्रात छोटा उद्योग सुरु केला. अनुभवाच्या अभावामुळे त्यात त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. आता ते नाईलाजाने पुन्हा शेती करीत आहेत. दुर्दैव हेच कि उद्योगासाठी घेतलेलं कर्ज, शेती करून फिटत नाही. यामुळे आता ते कशीबशी आपली पत सांभाळत आहेत. याच मित्राच्या बहिणीचे पती साधे शेतमजूर होते. बहीण हिशोबी असल्याने संसारिक गरजा कमी राहिल्या. पाहुण्यांनी यातून इतरांची शेती करायला सुरुवात केली. वाढवत जावून आज ते बाहेरगावी स्थाईक झालेल्या अनेकांची शेती करीत आहेत. आवक वाढली पण संसारिक गरजा कमीच असल्याने त्यांनी जमिनीचे छोटेछोटे तुकडे खरेदी करून जोडायला सुरवात केली आहे! व्यक्ती तितक्या प्रकृती व तितक्या प्रकारची शेती!

सर्वात महत्वाचे हेच कि कोणतेहि एक पिक, एक हंगाम आपल्याला आर्थिक चाकोरीतून बाहेर काढू शकत नाही. आर्थिक चाकोरीतून बाहेर निघण्यासाठी योजना बद्धता व योजना तडीस नेण्याची जिद्द लागते. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाची काळाशी असलेली झुंज वेगळी आहे. यातुनच, तुमची आणि माझी, “प्रत्येकाची” शेती वेगळी आहे! हि बाब लक्षात घेवून सल्ला मागते वेळी किंवा इतरांचे अनुकरण करते वेळी, पहिले आपली शेती कशी आहे याचा विचार नक्की करा!

 

डॉ. मकरंद राणे (फेसबुक) 

Back to blog