शेतीमध्ये करीयर!

शेतीमध्ये करीयर!

करीयर म्हणजे नेमके काय? एखादा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनीअरिंगचे करीयर निवडतो म्हणजे नेमके काय? माझा एक लंगोटी मित्र गरीबीच्या परिस्थतीशी झगडा करीत, सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप मिळवून डॉक्टर झाला. आम्ही अगदी ७ वी ८ वीत होतो तेव्हापासून त्याने डॉक्टर व्हायचे ठरवले होते. मी विचार करीत होतो कि तो त्याचे स्वप्न जगतो आहे. त्याला डॉक्टर व्हायचे होते आणि तो डॉक्टर झाला! प्रत्यक्ष त्याची भेट झाल्यावर तो त्याच्या कामात अजिबातहि सुखी नव्हता हे मला जाणवले. तो नामांकित आहे, श्रीमंत आहे पण दुखी: आहे. एकूण करीयर म्हणजे असे काम ज्याच्यातून तुम्हाला यथायोग्य नाव, पैसा व आनंद मिळतो. शेतीमध्ये करीयर हे टायटल वाचल्यावर तुम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले का?

काळाच्या ओघात कनिष्ठ झालेल्या शेतीला करोना महामारीने कलाटणी देवून पुन्हा एकदा आपल्या जुन्या वैभवाकडे न्यायला सुरवात केली आहे. शहरी गटारात कान-नाक बंद करून दिवसरात्र कळवळत वळवळण्यापेक्षा खुल्या अस्मानाखाली निसर्गाच्या कुशीत प्रत्येक श्वासगणिक स्पुर्तीले जीवन जगणे अधिक श्रेयस्कर आहे हे अनेक तरुणांना उमगले आहे. परतीची हि वाट प्रत्येकासाठी तितकी सुलभ नसेल. हजारोंच्या नावावर काही प्रमाणात शेती साठी लागणारी जमीन असली तरी लाखोंच्या नशिबात भूमिहीनता आली आहे. असे असले तरी कृषीक्षेत्रात या लाखोंना सामावून घ्यायची क्षमता मात्र नक्की आहे.

वाढती लोकसंख्या, वाढत जाणारी जीवनाची लांबी-रुंदी, जिभेचा रुचकर चोखंदळपणा, व्यंजनांचे वाढतचाललेले मेनूकार्ड, माहितीतंत्राने रुंदावलेल्या मागणीच्या जागतिक बाजारपेठां, जैवतंत्राने साकारलेले बीज, थेंबाथेंबाचा हिशोब करणारे जलसिंचन, काटेकोर अन्नद्रव्य व्यवस्थापन, रासायनिक अंश मागे न ठेवणारे रोग-कीड व्यवस्थापन, सचोटीने चालणारे यांत्रिकीकरण, शेतीच्या प्रत्येक अंगाला जोडू शकणारी व उद्याच्या उंबरठ्यावर उभी ठाकलेली कनेक्टीव्हीटी आणि आपण अजूनही ठाव न धरू शकलेल्या हजारो नवीन संधी तरुण नव-शेतकऱ्याला उपलब्ध आहे. गरज आहे ती फक्त डोळसपणे तिला शोधण्याची, आपले तार तिच्याशी जोडण्याची.

कृषीक्षेत्रातील संधी शोधणाऱ्या मित्रांना काही जाणीव करून देणे भाग आहे. पहिली म्हणजे पूर्वी या क्षेत्राला अडाणीपणाचे एक ग्रहण होते. शिकलेली मुले शहरात नोकरीला जात व शिकायला तयार नसलेला त्यांच्या भाऊ शेती करीत असे. त्यामुळे हे क्षेत्र अडाण्याचे आहे असे चित्र तयार झालेले होते. अनके लोकांनी त्यांच्या या अडाणीपणाचा भरपूर लाभ घेतला. आता मात्र हे तितकेसे खरे राहिलेले नाही. आज शेतात राबणारी नवी पिढी अडाणी नाहीये. तिच्या हातात मोबाईलच्या माध्यमातून ज्ञानगंगा वहाते आहे. त्यामुळे आपण या तरुणाला उल्लू बनवायचा मूर्ख विचार अजिबात करू नका. त्याच्या मेहनतीला तुमच्या ज्ञानाची जोड देवूनच तुम्हाला या क्षेत्रात शाश्वत संधी मिळू शकेल.

दुसरी महत्वाची जाणीव म्हणजे इथे संधीसाधु होण्या ऐवजी संधीचे सोने करणाऱ्याला जास्त वाव आहे. आंतरप्रेरणेने पेटून उठणाऱ्याला इथे वाव आहे. या क्षेत्रातील परिस्थिती सातत्याने बदलू शकते त्यामुळे सतत तपशीलवार नियोजन तयार करीत राहावे लागते. सगळीकडे नकारात्मकता पसरली तरी आपल्याला सकारात्मक राहून प्रयत्नशीलता जपावी लागते. इथे टिपिकल ९ ते ५ वाली नोकरी नसेल. कधी दिवसरात्र मेहनत तर कधी महिनाभर रिकामपण!  नोकरी व्यतिरिक्त शेतीमध्ये उद्योजकता, व्यवसाय व गुंतवणूकिला मोठा वाव आहे.

ज्यांच्याकडे स्वत:ची शेती आहे ते हि शेती कसायला प्राधान्य देतील. पंधरा-वीस एकर शेती असणाऱ्या व्यक्तीला स्वत: हि शेती फायदेशीर पद्धतीने करणे फार कठीण नाही. कोणती पिके कधी घ्यावी? लागवड, फवारणी, आळवणी व्यवस्थापन कसे करावे या साठी आमच्या वेबसाईटवर आपणास भरपूर माहिती मिळू शकते.

------------------------------------------------

विविध पिकांचे आळवणी व फवारणी शेड्युल डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

------------------------------------------------

पण ज्यांची शेतजमीन कमी आहे  त्यांना शेतीपूरक व्यवसाय करणे भाग आहे. असे करते वेळी त्यांना आपल्या सारख्या इतर बांधवांना सोबत घेवून काम करावे लागेल.

रोपवाटिका हा छोट्या शेतकरी बांधवासाठी उत्तम व्यवसाय आहे. रोपवाटिका हे जितके शास्त्र आहे तितकीच कला देखील त्यामुळे रोपवाटिका चालवायला आवड हवी. चांगल्या बियाण्याची, मातृवृक्षाची जाण असणे गरजेचे आहे. विविध प्रकारची कलमे करणे, रोपांना रोग व किडींपासून दूर ठेवणे, एकसारख्या, निरोगी, रोपांची निर्मिती करणे फार महत्वाचे आहे. चांगली रोपवाटिका उपलब्ध असणे शेतकरी बांधवांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्यांना आयती कलमे/रोपे उपलब्ध होतात. वेळ, पैसा व श्रम वाचतात व रोपांच्या गुणवत्तेची शंका राहत नाही. दुर्मिळ कलमे देखील सहज उपलब्ध होतात. फळबागा/ फळभाज्या लावण्यास वाव मिळतो. आपल्याला रोपवाटिकांचा सर्व्हे करायचा असल्यास इथे क्लिक करा

------------------------------

महाराष्ट्र राज्यातील रोपवाटिकांची डिरेक्टरी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

-------------------------------

मागणी आणि पुरवठ्या नुसार शेतीमालाच्या किमती ठरतात हि थेअरी आहे. प्रत्यक्षातमात्र असे होत नाही. लबाडी करणे, गैरसमज निर्माण करणे यातून शेतकऱ्याच्या हातावर तुरी देण्याचे काम बाजारात वरचेवर होत असते. त्यातल्या त्यात जर शेतकऱ्यास आर्थिक व्यवस्थापनात गती नसेल, कमाई पेक्षा खर्च अधिक असेल व गाठीशी काही रक्कम बाळगायची सवय नसेल तर परिस्थिती कठीण होऊन बसते. गावपातळीवर प्रक्रिया उद्योगाची बांधणी हि एक मोठी संधी आहे. शेतीमाल नाशवंत असल्याने त्यापासून टिकाऊ पदार्थ बनवल्याने बाजाभावातील फसगत टाळली जावू शकते. भाजी-पाल्याचे निर्जलीकरन असो कि फळापासून प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती असो संधी फार मोठी आहे.  

--------------------

शेतीमालावर प्रक्रिया उद्योगांची माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

---------------------

दुग्धव्यवसाय करण्याच्या इराद्याने माझा एक मित्र गावी गेला. तेव्हा त्याच्यासमोर चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला. शोधाशोध व चर्चा केल्यावर त्याने पशुपालन करण्याऐवजी चारा व पशुखाद्य निर्मितीचा उद्योग सुरु केला. हायड्रोपोनिक्स (अधिक माहितीसाठी आमचा पूर्वीचा लेख नक्की वाचा, त्यासाठी इथे क्लिक करा ), अझोला, मुरघास, चाराबियाणे, गोळीपेंड इतक्यासाऱ्या प्रकारात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या या उद्योगातुं क्षेत्रातील डेअरी व्यावसायिकांशी त्याचे घनिष्ट सम्बन्ध निर्माण झाले व आवडीचे पशुपालन देखिल विनासायास सुरु झाले. समोर आलेल्या अडचणीत त्याने स्वत:साठी संधि तयार केलि व आज त्याची पाळमुळे अगदीच खोल रुजली आहेत.

ग्लोबल दुधवाले हा लेख आम्ही पूर्वी प्रकाशित केला आहे. शहरी मुलांनी उंटाच्या दुधाचे उपपदार्थ बनवून सातासमुद्रापार आपली बाजारपेठ उभी केली. त्यांनी विकसित केलेल्या ब्रांडच्या माध्यमातून त्यांनी इतर सलग्न क्षेत्रातही पाय रोवले आहेत. हा लेख वाचण्यासाठी आपण इथे क्लिक करा.

आगळे वेगळे शेतकरी - मुंबईतले! या लेखात मुंबईच्या अंधेरीत ऐन तिशीतल्या एका जोडप्याने एक इनडोअर "हर्बीवोर फार्म" कसा सुरु केला ? नेमकी प्रक्रिया काय असते? मार्केटिंग कसे केले जाते? याची माहिती दिली आहे. सलाड म्हणून वापरल्या जाणाऱ्या भाज्या शहरातच तयार होत असल्याने ग्राहकाला ताज्याच उपलब्ध होतात. मैलोगणती प्रवासात होणारी भाज्यांची हेळसांड टाळल्याने पोषकतत्व व स्वाद यात कोणताही बदल होत नाही.

कृषीकेंद्र हा ग्रामीण भागातील चलतीचा व्यवसाय मानला जातो. कृषीपदवी घेतलेल्या व शेतीची जाणकारी असलेल्या व्यक्तिंना कृषीकेंद्रासोबत कृषीसाहित्याच्या व्यवसायात मोठी संधी आहे. कृषीकेंद्राचा व्यवसाय कसा वाढवाल?  हा लेख वाचकांना या बाबतीत अधिक मार्गदर्शन करतो. मक्षिकारी हा एक फळमाशी सापळा असून ८१ पिकांत उपयोगी पडतो. त्याचप्रमाणे चीपचीप सापळे हे चिकट सापळे प्रत्येक पिकात उपयोगी आहे. आमची हि उत्पादने विक्री करण्यासाठी कोणताही कृषीपरवाना गरजेचा नाही. कृषीकेंद्र सुरु करण्यापूर्वी हि उत्पादने विक्री करत आपण आपल्या भागातील शेतकरी बांधवांत ओळख परिचय वाढवू शकता. यातून पुढ कृषीकेंद्रासारखा व्यवसाय करणे, त्यात गुंतवणूक करणे सोपे होईल. 

---------------

कृषीकेंद्राचा व्यवसाय कसा वाढवाल? हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

----------------

कृषीमालाच्या भावाचे विश्लेषण करणे हि एक महत्वाची संधी आहे. बाजारपेठ कधीही स्थिर नसते व याचा मोठा परिणाम शेतकऱ्याच्या नफा-नुकसानीवर होत असतो. बाजारभावाची माहिती देणाऱ्या अनेक सेवा उपलब्ध असल्या तरी आजच्या जागतिक घडामोडींचा उद्याच्या बाजारभावावर काय परिणाम होईल असे विश्लेषण सातत्याने करावे लागते. उदा. करोना चीन मध्ये पसरूलागला तेव्हा जर विश्लेषक त्याचा उद्याच्या अन्नधान्याच्या किमतीवर काय परिणाम होईल हे शोधू शकतो व या माहितीच्या आधारे शेतकरी काही फायदेशीर निर्णय घेवू शकतो.

 

अशी सेवा देण्यासाठी आपल्याला विविध कृषीमालांच्या किंमतींचा इतर पदार्थ किंवा सेवांच्या किमतीशी कसा संबंध आहे या संबंधी सखोल अभ्यास करावा लागेल. कुठे युद्ध झाले? कुठे गृहकलह झाला? कुठे पाउस चांगला झाला किंवा वाईट झाला यावर लक्ष ठेवून तसे विश्लेषण करावे लागेल. माहितीतंत्र ज्ञानावर आधारित हि संधी मोठी व तितकीच क्लीष्ट देखील आहे.

--------------------------

कृषीमालाची खरेदी विक्री करण्यासाठी आमच्या फार्म एक्स्चेंज या सुविधेचा लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा.

-------------------------

 "कृषीपर्यटन" हा  एक "आकर्षक" उद्योग ठरू शकतो. लोकांचे आदरातिथ्य करणे, त्यांचा ग्राम जीवनाशी परिचय करून देणे, शेतीतील विविध कामांची तोंड ओळख करून देणे, काही कार्यानुभव देणे अश्या स्वरूपाचे हे काम आहे. पूर्वी लोकं सुटीत मामाच्या गावी किंवा मूळ गावी जात असत. शेतात फिरणे होत असे व त्यात त्यांना भरपूर आनंदही मिळत असे. आता असे होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहेत. शहरात रहाणारी व अजूनही शेतीची ओढ असणारी हि कुटुंबवत्सल माणसे "कृषीपर्यटन" केंद्रासाठी उत्तम "ग्राहक" आहेत. यात बहुतांश "मध्यम वर्ग" मोडतो. शहरी भागात जीवनभर सरकारी किंवा खाजगी नोकरी केल्यावर "सेवानिवृत्त" झालेल्या लोकांचे "जेष्ठ नागरिक संघ" असतात. सकाळ-सायंकाळ विरंगुळा म्हणून हि मंडळी एकत्र येतात. जीवनात काय राहून गेलं ते थोड्या प्रमाणात का असेना साधायची यांची इच्छा असते. "कृषीपर्यटनाचे त्यांना विशेष आकर्षण असते." शहरी भागातील शाळांना वर्षातून एकदा तरी शैक्षणिक सहल काढायची असते. वातावरणात बदल करणे, ज्ञान वाढवणे, कार्यानुभव मिळवणे हे या सहलींचे उद्दिष्ट असते. "कृषीपर्यटन" हा एक उत्तम "ग्राहक वर्ग" आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा या अशा सहली नियमित काढत असतात. दिवाळीच्या काळात व त्यानंतर काही काळ या सहली "कृषी पर्यटन केंद्रात नेता येतात". पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाच्या  स्वभावानुसार हि पर्यटने घडत असतात. धार्मिक, वैद्यकीय, ऐतिहासिक (लेणी, किल्ले), नैसर्गिक (जंगल सफारी, वाळवंट, समुद्र किनारा, निसर्गोपचार) असे पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. असे एखादे केंद्र आसपास कुठेही असले तर तिथे येणारे पर्यटक त्याच्या पर्यटनाचा एक भाग म्हणून "कृषीपर्यटना" कडे वळू शकतात. विदेश पर्यटक देखील भारतीय संस्कृती, ग्रामजीवन व कृषी जीवन समजावून घेण्यसाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रा कडे आकर्षित होतात. लेखक, वैज्ञानिक, पेंटर किंवा तत्सम लोकांना एकांताची गरज असते. हि माणसे कृषीपर्यटनाचा पर्याय निवडू शकतात. आपले स्वत:चे कृषीपर्यटन केंद्र असावे हे देखील गरजेचे नाही. अश्या केंद्रापर्यंत पर्यटक पोहोचवणे हा देखील एक उत्तम व्यवसाय असू शकतो.

आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

------------------------

करिअर मग ते कृषी क्षेत्रात असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात; ते करावे लागते, होत नसते. इतरांना जे करायला अडचण आहे ते तुम्ही करा. यात तत्परता हवी, सुबकता हवी, मानवता हवी, व्यवहार्यता हवी म्हणजे झाले!

मित्रहो, हा ब्लॉग कसा वाटला? ते कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. लेख आवडला असेल तर फेसबुकवर शेअर करण्यासाठी इथे क्लिक करा. व्हाटसअप वर शेअर करण्यासाठी स्कीनवर डाव्याबाजूला एक बटन दिले आहे.

Back to blog