कृषीपर्यटन केंद्रात "ग्राहक" कुठून येतात?

कृषीपर्यटन केंद्रात "ग्राहक" कुठून येतात?

शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवायचे असेल तर शेतीला पूरक धंद्याची जोड देणे गरजेचे आहे. असे अनेक व्यवसाय आहेत ज्याची जोड आपण शेतीला देवू शकलो तर या जोड धंद्यातून आपणास फायदा तर होईलच शिवाय शेतीतून मिळणाऱ्या लाभात देखील भरीव वाढ मिळेल. डेअरी, कुक्कुटपालन, वराह पालन, आळंबी उत्पादन, शेणखत/गांडूळखत निर्मिती उद्योग, मुरघास निर्मित प्रकल्प, नर्सरी असे कितीतरी पर्याय आहेत. कृषीपर्यटन हा देखील तसाच एक उद्योग आहे.

 • पूर्वी लोकं सुटीत मामाच्या गावी किंवा मूळ गावी जात असत. शेतात फिरणे होत असे व त्यात त्यांना भरपूर आनंदही मिळत असे. आता असे होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहेत. शहरात रहाणारी व अजूनही शेतीची ओढ असणारी हि कुटुंबवत्सल माणसे "कृषीपर्यटन" केंद्रासाठी उत्तम "ग्राहक" आहेत. यात बहुतांश "मध्यम वर्ग" मोडतो.
  •  शहरी भागात जीवनभर सरकारी किंवा खाजगी नोकरी केल्यावर "सेवानिवृत्त" झालेल्या लोकांचे "जेष्ठ नागरिक संघ" असतात. सकाळ-सायंकाळ विरंगुळा म्हणून हि मंडळी एकत्र येतात. जीवनात काय राहून गेलं ते थोड्या प्रमाणात का असेना साधायची यांची इच्छा असते. "कृषीपर्यटनाचे त्यांना विशेष आकर्षण असते." 
   • शहरी भागातील शाळांना वर्षातून एकदा तरी शैक्षणिक सहल काढायची असते. वातावरणात बदल करणे, ज्ञान वाढवणे, कार्यानुभव मिळवणे हे या सहलींचे उद्दिष्ट असते. "कृषीपर्यटन" केंद्रासाठी हा एक उत्तम "ग्राहक वर्ग" आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा या अशा सहली नियमित काढत असतात. दिवाळीच्या काळात व त्यानंतर काही काळ या सहली "कृषी पर्यटन केंद्रात येवू शकतात".
   • पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाच्या  स्वभावानुसार हि पर्यटने घडत असतात. धार्मिक, वैद्यकीय, ऐतिहासिक (लेणी, किल्ले), नैसर्गिक (जंगल सफारी, वाळवंट, समुद्र किनारा, निसर्गोपचार) असे पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. असे एखादे केंद्र आसपास कुठेही असले तर तिथे येणारे पर्यटक त्याच्या पर्यटनाचा एक भाग म्हणून "कृषीपर्यटना" कडे वळू शकतात. 
   • विदेश पर्यटक देखील भारतीय संस्कृती, ग्रामजीवन व कृषी जीवन समजावून घेण्यसाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रा कडे आकर्षित होतात.
   • लेखक, वैज्ञानिक, पेंटर किंवा तत्सम लोकांना एकांताची गरज असते. हि माणसे कृषीपर्यटनाचा पर्याय निवडू शकतात. 

    जर तुम्ही शेतकरी असाल वर दिलेल्या प्रमाणे ग्राहकवर्ग तुम्ही सांभाळू शकत असाल तर "कृषीपर्यटन केंद्र" सुरु करणे एक "आकर्षक" उद्योग ठरू शकतो. या लोकांचे आदरातिथ्य करणे, ग्राम जीवनाशी त्याचा परिचय करून देणे, शेतीतील विविध कामांची तोंड ओळख करून देणे, काही कार्यानुभव देणे अश्या स्वरूपाचे हे काम आहे. नेहमीची शेती ८० टक्के व कृषीपर्यटन २० टक्के अशी विभागणी केली तर तुम्ही यातून चांगला फायदा मिळवू शकाल यात शंका नाही.

   Back to blog