वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग तेराव्वा )

वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग तेराव्वा )

मित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या नियोजनावर भर देत आहोत. सोबतच इतर काही बाबीं ज्या आपल्या यशावर परिणाम करतात त्यांच्या विषयी देखील जाणून घेत आहोत. (जर आपण या पूर्वीचे भाग वाचले नसतील तर नक्की वाचा. याच पानावर त्याच्या लिंक्स मिळतील) 

पर्यायी मार्ग

या जगात प्रत्येकाला पैसा हवा आहे कारण यश म्हणजे फक्त पैसा हे समीकरण होऊन बसले आहे. अर्थात हे प्रत्येकासाठी खरे नसले तरी ९० टक्के लोकांच्या मनात "पैसा म्हणजे यश" हि एकमेव संकल्पना आहे. सचिन व समीर हे दोघे अरबपती आहेत. दोघांकडे गाड्या, बंगले व अतिसुंदर बायका आहेत. जगप्रसिद्ध मासिकाच्या फ्रंट पेज वर दोघीचा एकत्र फोटो आला आहे. मासिकात दोघांच्या अरबपती होण्याच्या कहाण्या आहेत. अर्थातच या कहाण्या झाक-पाक करून प्रेरणादायी बनवलेल्या आहेत. दोघांची खरी कथा खाली देत आहे. 

सचिनला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे होते. तो छोट्या-मोठ्या बदमाशा करीत असे. यातून कमवलेला सर्व पैसा तो लॉटरी व सट्ट्यावर लावत असे. गोळाबेरीज करून त्याचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण होत नव्हते. त्याला एक युक्ती सुचली.  सटोडीयास त्याने हि योजना सांगितली. असा खेळ पूर्वी कुणीच खेळलेला नव्हता. दुसरा कुणी या खेळास तयार होणे शक्य नव्हते. अर्थात हा खेळ गुप्त पद्धतीने खेळला जाणार होता! ठरल्याप्रमाणे सचिन त्याची गाडी घेवून जंगलात गेला. सटोडीया व इतर अनेक बघे देखील जमले. प्रत्येक बघ्याने या खेळावर पैसा लावला होता. सटोडीयाने त्याच्या गाडीच्या बोनटवर एक सुटकेस उघडली. ती नोटांनी काठोकाठ भरलेली होती. सचिनने ते पैसे बघितले व सटोडीयाने दिलेली पिस्तुल स्वत:च्या कानशिलावर लावली. त्या पिस्तुलात एक गोळी होती व इतर पाच खाते रिकामे होते. चौफेर बघत सचिन ने कुठलाही वेळ वाया जावू न देता पिस्तुलाचा खटका ओढला. ठक..असा आवाज आला. पिस्तुलाचे ते खाते रिकामे निघाले व सचिनला जीवदान मिळाले. सुटकेस मधील सर्व पैस्याचा तो मालक झाल!. हा सगळा पैसा घेवून सचिन भारतात आला व एका शहरात त्याने एक मोठा बंगला घेतला,  अलिशान गाड्या घेतल्या, सुंदर स्त्रीशी लग्न केले.  त्याच्याजवळचा पैसा इतका जास्त होता कि हे सर्व खर्च करूनही त्याच्याजवळ पैसा शिल्लक राहिला. त्याने तो इतरांच्या उद्योगात गुंतवला. गुंतवणूक व परताव्याच्या हिशोबा साठी अकाउटंट ठेवले.  त्याला आता काम करायची गरज नव्हती व इच्छाही नव्हती. गुंतवणूक केलेल्या पैशाच्या परताव्यावर त्याचे जीनव मजेत सुरु झाले. जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेणे हा त्याचा एकमात्र उद्योग आहे.

त्याच्या शेजारी समीरचे घर व हॉस्पिटल होते. दिवसाकाठी तो दहा-बारा हजार कमवत असे. या मिळकतीमधील एक मोठा हिस्सा तो नियमित पणे बाजूला टाकत असे. त्याला वर्षातून ३०० दिवस काम करावे लागे. सचिन येता जाता समीरला नमस्कार करी व मनातल्या मनात विचार करी कि हा माझी बरोबरी कधी करू शकेल का? पण समीरला कामाचा कधी कंटाळा आला नाही. जर तो हे शहर सोडून गावाकडे गेला असता तर त्याला दिवसाकाठी ५ ते ६ हजार मिळाले असते व मुंबईला गेला असता तर दिवसाकाठी २०-२५ हजार मिळाले असते. पण त्याने तसा कधी विचारच केला नाही. त्याच्या व्यस्त जीवनाला कंटाळून त्याची सुविद्य पत्नी त्याला सोडून गेली. समीर अधिकाअधिक वेळ हॉस्पिटलसाठी देवू लागला. सचिनच्या बंगल्याकडे व डौलाकडे पाहून त्याला असूया होत असे. एकदिवस मी देखील हे वैभव मिळवेलच या विचारावर तो ठाम होता. १० वर्षात त्याने हे स्वप्न पूर्ण केले. तोडीचा बंगला बनवला, गाड्या घेतल्या व सुंदर स्त्रीशी विवाह देखील केला. एक यशस्वी डॉक्टर म्हणून तो नवारुपाला आलेलाच होता.

तुम्हाला कोणाची श्रीमंती आवडते आहे? तुम्हाला कुणासारखा पैसा कमवायचा आहे? एकीकडे सचिन ने एका दिवसात मिळवलेली श्रीमंती तुम्हाला आवडली कि समीरने सर्वकाही गमावून पण कठोर काम करून मिळवलेली श्रीमंती?

सचिनने जो पर्याय निवडला तो त्याच्या जीवनासाठी धोकेदायक होता. पिस्तुलाचे पाच रिकामे खाते व एक भरलेले खाते. पाच पर्याय त्याला हवी ती श्रीमंती देवू शकत होते तर एक पर्याय त्याच्या श्रीमंत होण्याच्या स्वप्ना सहित जीवनच संपवू शकत होता. 

समीरकडे देखील पर्याय होते. एखाद्या गावात जावून त्याने पैसा कमी कमवला असता पण सचिनच्या बंगल्याकडे बघून त्याची होणारी जळफळाट थांबली असती व सुविद्य पत्नी देखील त्याने गमावली नसती. मुंबईला जावून, त्याला कमी वेळ खर्च करून, अधिक पैसा कमवता आला असता व संसार देखील तुटला नसता. नामांकित डॉक्टरच्या सोबत सुंदर स्त्री पेक्षा सुविद्य पत्नीच अधिक शोभते! 

एक शेतकरी म्हणून श्रीमंत व्हायचे कोणते पर्याय तुमच्याकडे आहेत?  येत्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळेल. एकरी कमीत कमी १५ क्विंटल जरी कापूस झाला तरी तुमच्या २४ एकरातून तुम्हाला, सहा हजाराच्या भावाने, २१ लाखाचा कापूस होईल. ३० टक्के खर्च व ३ लाख कर्ज वजा जाता १२ लाखाचा निव्वळ नफा होईल. असा नेहमीचा मार्ग तुम्ही निवडाल कि काही पर्याय तुमच्या कडे आहेत?

 

हेवी ड्युटी कटर, विविध प्रकारचे ब्लेड वापरता येतात, वापरायला सोपे, कमीत कमी आवाज व धूर, सहज तोलता येते, मजबूत व टिकवू, टू स्ट्रोक ४३ सी सी इंजिन, १ लिटर पेट्रोल+४० मिली २टी ओईल वापरावे. सोबत दिलेल्या लिंक वरून खरेदी करू शकता. 

 

वर्षाच्या शेवटी एक रकमी २१ लाख मिळवण्याऐवजी शेताची विभागणी करून १० टक्के क्षेत्रात भाजीपाला, १० टक्के क्षेत्रात वैरण, ३० टक्के क्षेत्रात कापूस, ३० टक्के क्षेत्रात सोयाबीन व उर्वरित क्षेत्रात वनशेती, पशुपालन व कृषीपर्यटन राबवून, टप्याटप्प्याने वर्षभर नफा कमवायचा पर्याय तुम्ही निवडू इच्छिता का?

शेतीतून वर्षाच्या शेवटी एकरकमी येणाऱ्या नफ्या ऐवजी जर आपण एका क्षेत्रातून दररोज किंवा दर आठवड्याचा नियमित नफा, दुसरया क्षेत्रातून महिन्याकाठी ठराविक नफा, तिसऱ्या क्षेत्रातून तिमाही नफा व चौथ्या क्षेत्रातून वार्षिक ठोस नफा कमवायचे ठरवले तर वर्षाकाठी अचानक येणारी निराशा पदरी पडणार नाही.

आजच्या जगात आधुनिक शेतकऱ्याकडे बहुविध पर्याय आहेत.

  • पशुपालन करयचे म्हटले तर त्यातही कुक्कुट पालन, देशी व कडकनाथ कोंबडी पालन, इमूपालन, बकरीपालन, ससेपालन, वराहपालन, देशीगाय, विदेशीगाय, म्हशी, मत्स्य, कोळंबी, शिंपले असे पर्याय आहेत. 
  • भाजीपाला, औषधी वनस्पती, मसाला पिके, औद्योगिक पिके असे पर्याय आहेत.
  • अन्नपदार्थ प्रक्रिया म्हटली तर थेट ज्वारी पासून कारल्या-कांद्यापर्यंत अनेक पिकांवर प्रक्रिया केली जावू शकते.
  • इतरांची शेती कसायला घेणे, स्वत:ची शेती इतरांकडून कसून घेणे, सामुहिक शेती करणे, निर्यात ग्रुप बनवणे असेही मार्ग आहेत.   

मित्रहो पर्यायी मार्ग सहजासहजी सुचत नाहीत, सुचले तर त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न करायची आपली तयारी नसते. त्यामुळे आपण आंधळेपणाने नित्याचा मार्ग निवडतो. असा मार्ग तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो पण त्याची किंमत तुम्हाला नको ती मोजावी लागु शकते. पर्यायी मार्गांचा विचार करून नवीन संकल्पना राबल्याने तुमची स्वप्ने पूर्ण होऊ शकतील.

 

Back to blog