शेतकरी बांधवांनो आपल्या दुष्टीकोनात खोट नको!

नुकतेच युट्युब वर एका व्हिडीओचे थंबनेल बघितले: पगार देणारी शेती! व्हिडीओ बघितला नाही पण मला हे  थंबनेलच मुळातच खूप खटकले. कारण शेती हा एक उद्योग असून शेतकरी उद्योजक आहे, असे माझे ठाम मत आहे. नोकर, व्यावसायिक, उद्योजक व गुंतवणूकदार या चार प्रकारांपैकी शेतकरी “उद्योजक व गुंतवणूकदार” या प्रकारात मोडतो असे माझे ठाम मत आहे. 

नोकर माणसावर कामाची जबाबदारी असली तरी परिणाम मात्र त्याच्यावर फारसा पडत नाही. व्यावसायिक मंडळी, जसे वकील किंवा डॉक्टर, प्रत्येक कामाची फी घेतात. परिणामाची जुजबी जबाबदारी त्याच्यावर असली तरी परिणाम भोगावा मात्र त्यांना लागत नसतो. 

शेतकऱ्याचे मात्र तसे नाही. तो कामे करतो, करवून घेतो, पैसा लावतो व जो काही परिणाम असेल, नफा असो कि नुकसान, त्याला सामोरा जातो. हि झाली उद्योजकता. 

अनेक शेतकरी थोडा जास्त पैसा सुटला तर नवीन शेती विकत घेतात. त्यांची हि कृती एका गुंतवणूक दाराप्रमाणे असते. कुठल्याहि अंगाने शेतकऱ्याला पगार मिळत नाही आणि मिळणार देखील नाही. तशी अपेक्षा करणे अगदीच चुकीचे असणार आहे. असे असले तरी शेती करणाऱ्यातील बहुतेक व्यक्ती, आवड म्हणून शेती करीत नाही. उद्योजकतेला लागणारी धडाडी त्यांच्यात नसते. इतरांचा पगार त्यांना खुणावत असतो. दृष्टीकोनाच्या अभावात, पेरायचे-काढायचे-विकायचे एव्हढेच त्यांना ठावूक असते. असे करत करत, वर्षा मागून वर्ष जातात पण हवी तशी वाढती मिळकत मिळतच नाही. 

वाडवडीला कडून माझ्या एका मित्राला भरपूर जमीन मिळाली. तो मेहनती आहे, काटक आहे. कापूस, मका, सोयाबीन या पिकांकडे त्याचा कल होता. शहरी रहाणीमान त्याला खुणावत होते. शेती दुय्यम आहे असा विचार त्याच्या मनात खोल रुतून बसलेला होता. यातून गेल्या काही वर्षात त्याच्या डोक्यावर कर्ज उभे राहिले. कर्जातून बाहेर कसे निघावे? दिवसरात्र हाच एक विचार त्याला त्रास देत होता. 


एका सायंकाळी, कौटुंबिक वातावरणात आमची चर्चा सुरु होती. वर सांगितल्याप्रमाणे त्याची मानसिकता उमटून पडत होती. मी त्याला म्हटले कि तुझ्या मुलीसाठी तू कसा वर शोधणार? पुण्या-मुंबईतील एखादा सरकारी अधिकारी! असे उत्तर त्याने दिले. ती हुशार, कर्तबगार तर आहेच, सुरेख देखील आहे. त्यामुळे त्याचे हे स्वप्न खरे ठरेल हे नक्की. मग तुझा मुलगा भविष्यात काय करणार? हा प्रश्न मी त्याला विचारला. त्याचे उत्तर: नौदलात सामील होण्याचा त्याचा प्रत्यन आहे. तो तिकडेच जाईल! हे देखील माझ्या मनाला पटले आहे. त्याच्या मुलाच्या प्रयत्नांना मी जाणून आहे. हे देखील खरे होईल याची मला खात्री आहे. 


मी त्याला म्हटले कि मग शेतीचे काय करणार? विकून शहरात जाणार! त्याचे उत्तर! 


माझ्या मते इथेच मोठी मेख आहे!  माझा हा मित्र शेतीला आपल्या भविष्याशी जोडू इच्छित नव्हता. मी त्याला एकच सल्ला दिला. तुझ्या मुलाला किंवा मुलीला (जावयाला) जर गरज पडली तर शेती कामी येईल असा विचार कर! जीवनात अनेक अनपेक्षित बदलांना सामोरे जावे लागते. शेती हा एक मोठा एसेट आहे. गरज पडली कि मिळवता येत नाही! शेती टिकवली, वाढवली, दर्जेदार केली तर गरजेच्या वेळी कामी येईल यात तिळमात्र शंका नाही.


आपली शेती आपल्या मुलांना भविष्यात कामाला येवू शकते! हा विचार कामी येतो आहे. आता हा मित्र अधिक आत्मीयतेने शेती कडे बघू लागला आहे. मृदेचा पोत चांगला राहील यासाठी तो प्रत्यनशील आहे. आपल्या गावाच्या क्षेत्रात पाणलोट विकास होईल अश्या सामाजिक कार्यक्रमात तो हिरिरीने भाग घेतोय. विविध फळांची बाग विकसित करणे, चांगला गोठा तयार करणे, फळभाज्या, पाले भाज्यांचे उत्पादन घेणे असे बदल त्याने केलेत. कृषीपर्यटनाची तयारी तो करीत आहे. शहरी भागात मोक्याची जागा विकत किंवा भाड्याने घेण्याचा त्याचा प्रत्यन सुरु आहे. पुढे जावून तिथे डेअरी किंवा फ्रेश फ्रुट एंड व्हिजीटेबल मार्ट सूरु करता येईल का? त्यासाठी चांगला पार्टनर मिळेल का? असे तो बघतो आहे. शेताच्या एका भागात चारा निर्मितीसाठी हायड्रोपोनिक्स यंत्रणा उभी केली असून अझोला उत्पादन देखील सुरु केले आहे. मक्याचा हिरवा चारा उपलब्ध झाला कि मुरघास तयार करण्यासाठी त्याने सोय करून ठेवली आहे.  शेतातील एका उंचवट्याची व सावलीचीजागा निवडून त्याने गांडूळनिर्मिती प्रकल्प सुरु केला असून, कांदाचाळ व छोटे कोल्ड स्टोरेज सुरु करण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे.  


जमिनीचा एक तुकडा विकून त्याने स्वत:ची कर्जातून सुटका केली. कर्जाच्या ओझ्याची घरघर बंद झाल्याने तो आता शेती कडे चांगले लक्ष देवू शकतो.  कापूस, सोयाबीन व मका या पिका पलीकडे तो आपल्या शेतीचा विकास करतो आहे. हि पिके वाईट नसली तरी त्यातून शेतीचा विकास होत नव्हता. डोक्यावर कर्ज झाले होते. आपल्या पुढील पिढीला शेती हस्तांतरित करायची आहे हे लक्षात आल्यावर त्याने शेताचा चेहरा मोहराच बदलवून टाकला आहे. अनेक मार्गाने व नियमित आवक कशी होईल? हे तो पहात आहे. नवीन कौशल्य आत्मसात करण्याचा, सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा धडाकाच त्याने लावला आहे.


मित्रहो, आपणा सर्वांना माझी एकच विनंती आहे. शेती हा उच्च कोटीचा उद्योग आहे व त्यासाठी लागणारा दृष्टीकोन आपल्याला अंगी बाणवायचा आहे हे लक्षात घ्या. 


हा लेख आपणास कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की लिहा. आपल्याला कोणत्या विषयावर लेख हवे आहेत ते देखील कमेंट मध्ये सांगू शकता!

लेख शेअर करायला विसरू नका.