संतुलित खत मात्रेची क्लिष्टता

पिकाचे संतुलित पोषण करावे असे नेहमी म्हटले जाते पण "याचा नेमका अर्थ काय?" हे शेतकरी बांधवांना ठावूक नसते. अशा अवस्थेत ते "जो जे सांगेल ते व तो जे म्हणेल त्या प्रमाणात" पिकास देतात. यातून संतुलित पोषण होते कि नाही याचा कुणीही विचार करीत नाही. अर्थात यातून खर्च तर नक्की वाढतोच!

आपल्या देशात विचित्र तज्ञांची देखील काही कमी नाही! कुणी सांगते शेतात यज्ञ करा, कुणी म्हणते फक्त शेणखत वापरा! खर्चच करायचा नाही, शेती नैसर्गिक पद्धतीने करायची असे सांगणारे आहेत! खता ऐवजी मीठ टाकायला सांगणारे महाभाग देखील आहेत! अशा तज्ञापासून आपण सावध असायला हवे. 

मित्रहो "संतुलित पोषण" हि काही मोघम संकल्पना नाही. नत्र, स्पुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक/सल्फर, लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरान व मोलाब्द हि पिक पोषणासाठी आवश्यक मूलद्रव्ये आहेत. हि पोषक तत्वे विविध पदार्थाच्या रुपात पिकास प्राप्त होतात. हि सर्व तत्वे सारख्या प्रमाणात लागत नाहीत. यांच्या गरजेच्या मात्रा प्रमुख्याने तीन प्रकारात मोडतात.

प्रार्थमिक, द्वितीय व सूक्ष्म 

प्रार्थमिक प्रकारात नत्र, स्पुरद व पालाश यांचा समावेश होतो व हे मोठ्या प्रमाणात लागतात.

द्वितीय प्रकारात कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक/सल्फर यांचा समावेश होतो व हे थोड्या प्रमाणात लागतात तर

सूक्ष्म या प्रकारात लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरान व मोलाब्द यांचा अंतर्भाव होतो व ते अतिशय कमी  प्रमाणात लागतात. भाजीत मीठ किती लागते? तशी यांची गरज असते.

जरी काही घटक जास्त, काही मध्यम व काही सूक्ष्म प्रमाणात लागत असली तरी यापैकी एकाचीहि कमतरता झाली तर पिकाचे कुपोषण होऊन उत्पादनात मोठी कमी येवू शकते. या उलट जर आपण एखादा घटक गरजेपेक्षा जास्त पुरवला तर त्याचे दुष्परिणाम होऊनहि उत्पादनात मोठी घट येवू शकते. उदाहरण द्याचे झाले तर लोहाच्या कमतरते मुळे पाने पिवळी पडतात. अशा वेळी नत्र कमी झाला आहे असा विचार करून आपण नत्र दिले तर रससोषक किडीचे प्रमाण वाढू शकते!

एकूणच पिक पोषण हे वाटते तितके सोपे व अनाकलनीय असावे इतके कठीण नाही. कोणत्याहि पिकासाठी खत मात्रा ठरवते वेळी अनेक घटकांचा विचार करावा लागतो. जसे मृदेचा प्रकार, स्थिती, पूर्वीचे पिक, सद्य पिकाची जात, वाढीची स्थिती, वातावरणातील बदल.

कोणताही एक पोषण घटक नेमका कुठल्या स्वरुपात दिल्याने फायदा होईल याचा देखील विचार करणे आवश्यक असते. जसे "नत्र" हा घटक "अमोनिकल", "नायट्रेट" व "सेंद्रिय" या तीन स्वरुपात देणे शक्य आहे. युरीयातील नत्र हे "अमोनिकल" स्वरूपातील असते. "अमोनियम नायट्रेट" मध्ये ते दोन स्वरुपात उपलब्ध असते. अमिनो-एसिड मधील नत्र सेंद्रिय स्वरुपात असते मुळातून लागू होण्यासाठी त्याला प्रथम अमोनिकल स्वरुपात यावे लागते व नंतर नायट्रेट स्वरुपात आले कि ते पिकास प्राप्त होऊ शकते! आपल्या पिकातील वाफसा स्थिती, पिकाची स्थिती, पावसाचा अंदाज यावरून कोणत्या स्वरूपातील नत्र द्यावे व किती याचा विचार करावा लागतो. 

मित्रहो, वरील माहितीवरून हे अगदी स्पष्ट आहे कि याविषयी आपण सखोल माहिती मिळवायला हवी. पाटील बायोटेक हि माहिती छोट्या छोट्या लेखांच्या स्वरुपात पोहोचवणार आहे. त्यासाठी आपण आमची वेबसाईट चाळू शकता. काही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये विचारू शकता. संतुलित खत मात्रेची क्लिष्टता कमी करण्यासाठी काय करावे हे सांगू पुढील भागात. 

क्रमशः

आमचे नियमित प्रसारित होणारे लेख वाचता यावेत म्हणून आमच फेसबुक पेज लाईक करा