Click Here for Product Demand Form

संकटे "खुजी" करायची लक्षवेधी योजना

ज्या व्यक्तीला जीवनात प्रगती साधायची असते, स्वत:चे व परीजनांचे जीवनमान उंचावायचे असते  तो योजना आखतो. अशा योजना आखते वेळी आपल्याला "वाढीव मिळकतीचे" एक लक्ष ठरवावे लागते. जर तुम्ही शेती करीत असाल तर एकरी सव्वाशे-दीडशे टन उसाचे उत्पादन करण्याचे लक्ष तुम्ही ठरवाल. कारण सव्वाशे-दीडशे टन उत्पादन झाले तरच तुम्हाला शेतातून पुरून शिल्लक रहाणारी रक्कम प्राप्त होणार आहे. मग असे लक्ष ठरवले असेल तर लक्ष्य प्राप्तीत  कोणकोणत्या अडचणी आहेत याचे तुम्ही विश्लेषण कराल.

तुम्हाल वाटेल कि मुख्य अडचण "खतांच्या डोसेस"ची आहे मग हि समस्या सोडवण्यासाठी एक योजना आखली जाईल. मृदेतील कर्ब, नत्र-स्पुरद-पालाश यांचे परीक्षण करण्यात येईल व त्यानुसार केव्हा व कोणती खते द्यावीत याचे वेळापत्रक तुम्ही तयार कराल. या वेळापत्रकाला चिटकून तुम्ही कसोटी ने काम कराल. खते लागू करते वेळी ते किती चांगल्या पद्धतीने देता येतील, कमीत कमी खर्चात व वेळेत काम कसे पूर्ण होईल हे तुम्ही बघाल. कोणतेही लक्ष गाठायचे ठरवले तर योजना आखणे, अडचणी ओळखून त्यावर तोडगा काढणे, शिस्त बाळगणे, काटेकोरपणे नियंत्रण ठेवणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे आलेच!

इथपर्यंत सर्वकाही योग्य आहे. एव्हाना उत्तम आहे. तरीही हे प्रयत्न पुरेसे आहेत का? फक्त खत व्यवस्थापन सुधारून भागणार आहे का? मग आपल्याला कीडनियंत्रणाकडे लक्ष द्यायला हवे. पाणी कमी पडले तर काय? साखरेचा उतारा नीट बसेल का? उस वेळेत तयार व्हायला हवा. वेळेवर काढणी झाली नाही तर? कारखान्यांने या उसाला योग्य दर दिला तर ठीक नाहीतर सव्वाशे टन माल काढून काय उपयोग? वातावरणात अचानक काही बदल झाले व उभे पिक जळाले, उसाला आग आग लागली तर? 

मुद्दा हा आहे कि बदलत्या वातावरणाला किंवा अचानक निर्माण होणाऱ्या आवाहनांना तोंड देण्यासाठी आपली नेहमीची योजना पुरेशी पडेल का? आपण ठरवलेले लक्ष आपण गाठू का? आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवनमान उंचावेल का?

अलीकडील काळात आपण बघाल कि १०० पैकी ९० टक्के योजना अक्षरशः निरुपयोगी ठरतात व उर्वरित १० टक्के योजना फार फार तर ६०-७० टक्के यशस्वी ठरतात. मेरीट मध्ये यायची योजना आखून जेमतेम फर्स्ट क्लास मिळवण्या सारखी हि परिस्थिती आहे. सर्वदूर हे असेच सुरु आहे. हा प्रश्न फक्त शेतीविषयी नाहीये. अलीकडील काळात नोटबंदी अयशस्वी ठरल्याने लोकप्रियतेच्या शिखरावरील नेता अक्षरशः तोंड लपवत फिरतो आहे. आपण फसवले गेलो आहोत असा जनमानस तयार झाला आहे. अत्यंत अनुभवी, जागतिक दर्जाचा नेता जर अशा प्रकारे अशस्वी ठरत असेल तर आपली काय बिशाद?   

मित्रहो, योजना अशाप्रकारे फसणे हे फार मोठे संकट आहे. या संकटाला खुजे करायचे असेल तर आपल्याला आपल्या नित्याच्या नियमांपलीकडे जावे लागणार. यासाठी आपण योग्य ठिकाणी प्रेरणा शोधायला हवी. 

------------------

फेसबुक, व्हाटसएप व टेलेग्राम वरीलआमच्या सोशल गृप्सला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा आणि वेळो वेळी प्रसारित होणारे लेख नियमित मिळवा.

------------------

निसर्ग/सृष्टी हा आपला खरा गुरु आहे. हि सृष्टी एक प्रचंड यशस्वी यौजना आहे. फार दूर जायची गरज नाही. आपले शरीर हि देखील एक यशस्वी यौजना आहे. माणसाचा मृत्यू झाल्यावर २४ तासात शरीर सडू लागते. जिवंत शरीरात अशा कोणत्या प्रक्रिया असतात ज्यामुळे ते तसूभरही सडत नाही? कुठलाही बाह्य जीव शरीरात शिरू शकत नाही व शिरला तर टिकू शकत नाही?

खूप खोलात गेलो तर हा लेख वाचणे व समजावून घेणे कठीण जाईल. कोणतीही यौजना आखतांना व तिचे व्यवस्थापन करते वेळी आपण निसर्गाकडून प्रेरणा घ्यायला हवी असे मला सुचवायचे आहे

मित्रहो "अतिरिक्त तयारी" करणे आवश्यक आहे. निसर्गाकडेच बघितले तर हे सहज लक्षात येईल. इतकीसारी कीटकनाशके मारूनही कीडीचे जीवनचक्र का थांबत नाही? एक मादा कीटक एकावेळी १०० ते १०,००० अंडी देण्याची क्षमता ठेवते. यातील सर्वच अंडी यशस्वी होत नाहीत पण काही अंडी प्रौढ निर्मिती करण्यात यशस्वी होतात, पुन्हा प्रजनन करतात व कीड टिकून रहाते. अतिरिक्त तयारी करणे हि "योजना यशस्वी करण्याची" एक प्रभावी पद्धत आहे. ठरवलेल्या काळात उसाच्या माध्यमातून आपण शेतीतून जो परतावा मिळवू इच्छितो तो फक्त उसातूनच मिळू शकतो का? इतर कोणते अंतरपीक घेतले तर "जोखीम" कमी होईल?  कोणतीही कीड अचानक येते का? कीड येण्याअगोदर कोणत्या उपाययोजना तुम्ही करू शकता?आपण विशिष्ठ पद्धतीने परिसरातील वातावरण जपले तर कीड येणारच नाही. नियंत्रणाचा प्रश्नच निर्माण होणार नाही. गरज पडली कि विहीर खोदणारे मूर्ख असतात. अचानक दुष्काळ पडला किंवा धरण वेळे-अगोदर आटले, धरणातले पाणी चोरी झाले तर? यासाठी जो हक्काचा उपलब्ध जलसाठा आहे तो कसा टिकवून ठेवणार? त्यासाठी पाण्याचा वापर काटेकोर करावा लागेल. इतकेच नाही तर मुळात उस लावते वेळी दुष्काळात तग धरणारी जात निवडली तर? पूर्ण क्षेत्रात फक्त उस लावण्या ऐवजी उर्वरित क्षेत्रात कमी पाण्यात जास्त नफा देणारे एखादे पिक घेतले तर? 

मित्रहो "विविधतेचा" उपयोग नियोजनात केला तर अनेक समस्या निर्माण होण्यापासून रोखून धरणे शक्य आहे. मनुष्याने अवास्तव प्रगती करण्यापूर्वी अरण्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी होती. आजही आहेत. या अरण्यात जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. साध्या डोळ्याने न दिसू शकणाऱ्या जीवांपासून डोळ्यात न मावणाऱ्या जीवां पर्यत इतकी विविधता आहे. पाताळ-जमीन-आकाश व्यापणारे जीव या अरण्यात असतात. एकूणच वैविध्यपूर्णता हे यशस्वी योजनेचे एक ठळक वैशिट्य आहे. या वैशिठ्याचा उपयोग आपल्या योजनेत केला तर लक्ष गाठणे सोपे जाईल हे आपल्याला जाणवले का? उसाच्या शेतीत आपण याचा उपयोग करू शकतो का?

"मोड्युलर" हा शब्द जरी नवीन असला तर त्याचा मतितार्थ नवीन नाही. ट्रॅक्टर हे फक्त एक वाहन आहे का? ते नांगर, वखर, कोळपे, पंप अशी कितीतरी कामे करू शकते. एकाच इंजिना भोवती विविध प्रकारच्या जोडण्या केल्या कि विविध प्रकाची कामे करता येतात. यालाच मोड्युलर म्हणता येईल. निसर्गात मोड्युलर रचनेची अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येक झाडाच्या पानाची रचना बघा. प्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी खास पद्धतीने रचना केलेली दिसून येते. शिवाय पानांच्या आकारामुळे हवेस अडथळा होत नाही. हवेचा दाब झाडाचे फार मोठे नुकसान करू शकत नाही. पानांची रचना बदलवून फुल तयार होते. त्यात रंग-गंध-मकरंद अशी व्यवस्था करून प्रजननाचा मार्ग प्रशस्त केला जातो.  आपले हात हि देखील एक मोड्युलर रचना आहे. त्याच्या मदतीने आपण कितीतरी कामे अगदी सहज करू शकतो. आपल्या योजनेत मोड्युलर रचनेचा सहभाग करून घेणे आवश्यक आहे

"विवेकशीलतेचा" उपयोग केल्याने आखलेल्या योजना अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत करता येतात. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाते. शेतीसाठी डोईजड होणारे कर्ज घेणे म्हणजे आंधळेपणा आहे. कर्जाने आपली कामे सोपी व्हायला हवी. कर्ज एक अत्यंत उत्कृष्ठ आर्थिक उपकरण आहे. कर्जाच्या माध्यमातून पैशाचा एक प्रवाह आपल्या यौजनेत आणता येतो. पण कर्ज नेहमी विवेकाने घ्यायला हवे.  चुकीच्या पद्धतीने व अवास्तव कर्ज घेतल्याने १४०० वर्ष यशस्वी पणे चालणारी कोरियन कंपनी बंद पडली. डोईजड होणारे व फेडता न येणारे कर्ज शेतीला हे कसे परवडणार?  कर्जमाफी विफल होइल असे कर्ज कदापि योजू नये. आपली पत नष्ट होईल व भविष्यात कर्ज मिळायला अडचण येईल असा व्यवहार करू नये. इथे आपला विवेक महत्वाचा आहे. निसर्गात कोणतेही झाड आपल्याला असे दिसणार नाही ज्याची फांदी फळांच्या ओझ्याने तुटून पडेल. (मानवनिर्मित प्रजातीत हि अडचण नियमित दिसून येते.) वाळवंटात वाढणारी शुष्क वनस्पती पाण्याचा साठा करून ठेवतात. साठा करून ठेवलेल्या पाण्याची सहजासहजी वाफ होणार नाही अशी योजना तिथे आपल्याला दिसून येते. निसर्गात हा विवेक आपल्याला पदोपदी आढळून येतो.

महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती॥ हि संत तुकारामांची ओवी आपण सदैवे लक्षात ठेवायला हवी. निसर्गावर आधारित हे शहाणपण आपल्याला अनेक ठिकाणी उपयोगी ठरते. सर्वसाधारण पणे या ओवीचा उपयोग आपण आपला स्वभाव कसा असावा? हे लक्षात ठेवण्यसाठी करतो. आपल्या योजनेत व व्यवस्थापनात देखील लवचिकतेचा उपयोग करणे आवश्यक आहे.मासाहारी जनावरां पासून संरक्षण होण्यासाठी शाकाहारी प्राणी कळपात रहातात. सांकेतिक आवाज काढून इतर प्राण्यांना संकटाची सूचना देतात. मित्रहो "एकीचे बळ मिळते फळ" हि म्हण देखील तितकीच उपयोगी आहे. मी-माझा-माझे हा गर्व आपले घर रिकामे करू शकतो. एकमेकाचे बांध कोरण्याऐवजी, शेजाऱ्याचे वाईट चिंतण्याऐवजी व धुडगूस घालण्यासाठी एकत्र येण्या ऐवजी, ऐक्याचे व प्रगतीचे राजकारण करावे. तणनियंत्रण, कीडनियंत्रण, जलव्यवस्थापन, विक्रीव्यवस्थापन या प्रत्येक प्रक्रियेत "सामुहिकते" तून प्रगती होणार आहे हि बाब गाठ मारून लक्षात ठेवावी. समूहशक्तीचा फायदा घ्यायचा असेल तर जुजबी स्वार्थ बाजूला ठेवावे लागतात. त्यासाठी सुरवात आपल्या वागणुकीत बदल करून करावी. या मार्गावर सुरवातीला एकटेच चालावे लागते...हळू हळू समविचारी माणसे जुळत जातात व एक अशी फळी तयार होते जिच्यासमोर संकटे खुजी होतात.

मित्रहो. आपल्या योजनेत निसर्गापासून प्रेरित  व्यवस्थापन असायला हवे या बद्दल काही मुद्दे मी इथे मांडले आहेत. यातून आपल्या समोर असलेली संकटे खुजी होतील याची मला खात्री आहे. 

आपल्याला काय सुचते आहे? खाली प्रतिक्रियेत आपण ते नोंदवू शकता. आपल्या सूचनांचा योग्य तो आदर आम्ही नक्की करू. तेव्हा प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

ही पोष्ट फेसबुक, ट्विटर व व्हाटसएप वर शेअर करून अधिकाधिक मित्रापर्यंत पोहोचवायला नक्की मदत करा.

धन्यवाद

 

4 comments

 • निसर्गाच्या पुढे आपण कितीही प्रगती केली तरी कमीच आहे.पण कोणत्या अवस्थेत आणि परिस्थितीत कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव आणि कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होईल याचे निरीक्षण करून एकात्मिक उपाययोजना करता येईल

  Yogesh
 • Very nice and energetic thoughs sir

  Sandip
 • atishay uttam as hi madani keleli lekh ahe …khul chan vatala

  shivaji jeure
 • Good suggestion

  B B Choulwar

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published