वांग्यातील कोळी नियंत्रण

महाराष्ट्रातील सर्व भागात वांगी लागवड वर्षभर होत. या फळभाजी पिकाला मोठी मागणी आहे. लहान-थोरांना सर्वांना हि भाजी आवडत असल्याने किंमतहि चांगली मिळते. दुर्देवाने यात किडीचे प्रमाण खूप आहे. योग्य नियोजन न केल्यास एक तर पिक हातून जावू शकते व उशिरा नियोजन केल्यास उत्पादन खर्च वाढू शकतो. 

या ब्लॉगमध्ये आपण वांग्यातील कोळी नियंत्रणाबद्दल माहिती घेणार आहोत. हि कीड भेंडी, टमाटे, मिरची व काकडीवर्गीय पिकात देखील आढळून येते.

पिकावर आढळणाऱ्या कोळ्यांच्या १२०० प्रजाती आहेत. Tetranychus urticae  हि प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळून येते व त्याला सर्वसाधारण पणे लाल कोळी किंवा दोन ठिपक्यांचा कोळी असे म्हटले जाते. 

या किडीमुळे पाने मलूल व निस्तेज पडलेली दिसतात. पाने वरच्या बाजूला आकसलेली दिसतात. हिरव्या पानावर टाचणीच्या टोकासारखे ठिपके दिसतात. असे असंख्य ठिपके नंतर एकमेकांत मिसळतात. अशी पाने नंतर पिवळसर दिसतात. पिवळ्या पानांचे निरीक्षण केल्यास खालील बाजूला कोळीचे सूक्ष्म जाळे दिसते. काही पानाच्या मध्यभागी पानाच्या मुख्य शिरेभोवती हलके तपकीरी चट्टे पडल्यासारखे दिसतात करपल्यासारखे निराकार ठिपके दिसतात. तीव्र प्रादुर्भावामध्ये संपूर्ण पाने गळून पडतात. पूर्ण झाड पर्णहीन होते. ही अवस्था प्रामुख्याने फळ धारणेच्या अवस्थेत दिसते.
अशीच लक्षणे पाण्याचा ताण पडल्यामुळेही दिसत असल्याने कोळ्यांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे पाने व्यवस्थित पाहून प्रादुर्भाव आहे की नाही, समजून घ्यावे. 

हि कीड आकाराने सूक्ष्म (०.३ ते ०.४ मीमी) असून भिंगाच्या साह्याने दिसते. नुकत्याच अंड्यातून निघालेल्या अळीला सहा पाय असतात तर प्रौढ व पिल्लांना आठ पाय असतात. ते सर्व सोंडेने पानातील पेशीमधील रस शोषण करतात. हा कोळी जाळे विणतो व असे जाळे आपल्याला प्रादुर्भावगस्त पानाच्या खालील बाजूला आढळते.. सूक्ष्म असून ते जाळे विणतात. पिल्ले हिरवट रंगाचे असून शरीरावर गर्द ठिपके असतात.पानाच्या खालील बाजूने रस शोषण करून उपजीविका करतात. प्रौढ कोळी हिवाळ्यात जिवंत राहून वर्षभर सक्रीय असतात. या किडीला पंख नसल्यामुळे तिचा प्रसार सरपटत चालून तसेच हवेद्वारे होतो. एक मादी तिच्या ३० दिवसांच्या कार्यकाळात साधारणपणे १०० अंडी पानाच्या खालील बाजूला देते. त्यांच्या अंडी, अळी, पिल्ले (प्रोटोनीम्फ व डयुटोनिम्फ) व प्रौढ अशा पाच अवस्था असतात. एक पिढी कमीत कमी ४ ते ५ दिवसांची असू शकते. छोट्या व एकापाठोपाठ पिढ्या व जास्त अंडी देण्याची क्षमता यामुळे या किडीचा उद्रेक होण्याची शक्यता असते. तसेच त्यांच्यामध्ये कीटकनाशकाची प्रतिकारक्षमताही निर्माण होण्याची दाट शक्यता असते. किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारण पानाच्या देठाभोवती, मुख्य शिरेच्या आजूबाजूला व पाने मुडपण्याच्या ठिकाणी एकवटलेला असतो.

  • हि कीड उबदार-कोरड्या हवामानात वेगाने पसरते
  • पाउस आणि आद्रता या किडीला त्रासदायक असते
  • अंबाडी, गुलखैरा( हॉलीहॉक), रानभेंडी असे तण शेत परिसरात येवू देवू नये
  • पिकास अतिरिक्त नत्र देवू नये
  • प्रादुर्भाव ग्रस्त पाने पिशवीत जमा करून नष्ट करावीत

लाल कोळी अवस्था असल्यास खालील कीटकनाशके वापरून नियंत्रण करू शकता. 

इथोक्साझोल १०% एस सी (बोरनियो) १ ग्राम प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये

फेन्झाक्वीन १०% इसी (मेजीस्टर) २.५ मिली परतील लिटर तोडणी सूर व्हायच्या १० दिवस अगोदर वापरू नये

फेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही  (मिथोथीन) ५ ते ७ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या १० दिवस अगोदर वापरू नये

मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही (सायथिऑन, मॅलमर, मालटेक्स, हिल्थोऑन, सल्मॉथीऑन) २-३ मिली प्रती लिटर 

स्पायरोमेसीफेन २२.९ % एससी (ओबेरॉन, व्होल्टेज, ऑफमाइट) ०.८ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये

दोन ठिपक्यांची अवस्था (पिल्लू अवस्था) दिसून पडल्यास प्रोपारगाइट ५७ % इसी. (ओमाइट, माइटकिल, माष्टामाइट, सिम्बा) २.५ मिली प्रती लिटर दराने फवारावे. तोडणी सूर व्हायच्या ६ दिवस अगोदर हे कीटकनाशक वापरू नये 

पिवळा कोळी

लाल कोळीपेक्षा सूक्ष्म, पिवळसर रंगाचे असून पाठीवर पांढुरक्या रेषा असतात. भिंगातून पाहील्यास स्पष्ट दिसतात. हे कोळी जाळे विणत नाहीत. यांची वाढ ४ ते ५ दिवसांत पूर्ण होते. ( तापमान २२.५ अंश से. ते २७.० अंश से.). मादी सरासरी ५ ते ८ अंडी देते. हा कोळी पांढऱ्या माशीच्या पायाला चिकटून इतरत्र पसरतो. किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नवीन व कोवळ्या पानावर जास्त असतो. संपूर्ण वाढ झालेली अळी सुप्तावस्थेत (३ ते ११ दिवस) जाते. त्यानंतर प्रौढावस्थेत परावर्तित होते

डायकोफॉल १८.५ ईसी  (केलथेन, डिफॉल, हिम्फोल, कोलोनेल- एस) ६ ते १० मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या १५-२० दिवस अगोदर वापरू नये

फेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही  (मिथोथीन) ५ ते ७ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या १० दिवस अगोदर वापरू नये

फ्लूमाइट २०% एस सी / फ्लूफेनझाईन २०% एस सी. ०.५ - १ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये 

 संदर्भ

  • केंद्रीय कीटकनाशक बोर्ड
  • भारतीय कृषी अनुसंधान परिषद
अधिक माहितीसाठी आपण व्हाट्सअपच्या मदतीने आमच्याशी संपर्क साधू शकता त्याकरता स्क्रीनवर "Message us" चे बटन आहे. त्यावर क्लिक करून आपले म्हणणे मांडा. २४ तासाच्या आत आम्ही आपल्याला प्रतिसाद देवू.