गाजराला थंड हवामान मानवते. 15-20 अंश तापमानात उगवलेली गाजरे रंगाने आकर्षक व चवीला गोड असतात तर १८-२४ अंश तापमानात गाजराची वाढ वेगाने होते. त्यामुळे खुल्या शेतात गाजर घ्यायचे असेल तर लागवडीसाठी सप्टेंबर ते डिसेम्बर हे महिने उत्तम आहेत. जून-जुलै मध्ये देखील गाजर लागवड करतात पण त्याला हवी तशी गोडी येत नाही.
गाजराला भुसभुशीत जमीन हवी हे तर सांगायलाच नको पण ती उत्तम निचरा होणारी व ६ ते ७ दरम्यान सामुची असावी.
पुसा केसर हे वाण सर्वाधिक पसंतीचे असून, नानटीस हि जात देखील बऱ्यापैकी प्रचलित आहे. एकरी दीड ते अडीच किलो बियाणे लागू शकते. लागवडीपूर्वी २४ तास बियाणे पाण्यात भिजवावे म्हणजे बी ८ दिवसात उगवेल. अन्यथा १२-१५ दिवस वेळ लागू शकतो.

जमीन चांगली भूसभुशीत करून घ्यावी. तयारी करतांना शेवटच्या टप्प्यात चांगले कुजलेले ५-८ टन शेणखत व बेसल डोस मिसळून टाकावा. बेसल डोस ची गरज मृदेनुसार व निवडलेल्या जातीच्या उत्पादक क्षमते नुसार कमी जास्त असू शकते. एका एकर चा डोस खालील प्रमाणे आहे.
- ३६ किलो युरिया
- १५० किलो एस एस पी
- ४० किलो एम ओ पी,
- रीलीजर ३ किलो
आपल्या परिसरात हुमणी चा प्रादुर्भाव असल्यास शेणखत टाकण्या पूर्वी त्यात ३ किलो हुमणासूर अवश्य मिसळावे.
सरी वरंबे करावे. ते चांगले भिजवून वाफसा येवू द्यावा. दोन वरंब्यात ४५ सेमी अंतर ठेवावे. दोन्ही बाजूंनी १५ सेमी अंतरावर टोकन करावी. या नंतर लगेच हलके पाणी द्यावे.
पिक उगवून आल्यावर नियमित पाणी द्यावे. मृदे नुसार ७-८ दिवसाने नियमित पाणी द्यावे. लागवडी नंतर २० दिवसाने युरियाचा ३६ किलोचा डोस पुन्हा द्यावा.
रोग किडीच्या नियंत्रणासाठी एकरी ७ पिवळे व ३ निळे चिकट सापळे लावावे. आवश्यकता वाटल्यास सापळ्यांची संख्या ७० पिवळे व ३० निळे अशी केली जावू शकते. सापळे लावते वेळी ते पिकाच्या वरती रहातील असे लावावेत.
गाजराच्या पिकावर सोंडया भुंगा (कॅरट विव्हिल), सहा ठिपके असलेले तुडतुडे, आणि रूटफ्लाय या किडीचा तर करपा, भुरी, मर पानांवरील ठिपके या बुरशींचा उपद्रव होऊ शकतो. गरज वाटल्यास आलटून पालटून खालील फवारण्या घ्याव्यात.
- १५ लिटर पाण्यात २० मिली पोकलॅड
- १५ लिटर पाण्यात ३० ग्राम क्लीनर पी
गाजरात मुळे तडकणे आणि कॅव्हिटी स्पॉट यांसारख्या विकृती आढळतात. ते टळावे म्हणून गाजरावर दर १० दिवसाला आलटून पालटून कॅलनेट (५० ग्राम प्रती १५ लिटर), एनपीके १९-१९-१९ (१०० ग्राम प्रती १५ लिटर ) व मायक्रोडील सुपरमिक्सची (१५ ग्राम प्रती १५ लिटर) फवारणी करावी.
गाजराची काढणी लावणी नंतर ७० ते ९० दिवसात करतात. काढणीपूर्वी १५ ते २० दिवस पाणी देणे बंद करावे. कुदळीने खोदून हाताने उपटून किंवा नागराच्या ससाहारूयाने गाजराची काढणी करावी. एकरी ८ ते १० टनापर्यंत उत्पादन येते.