झणझणीत मिरचीचे रंग-रूप आणि नखरे अनेक!

झणझणीत मिरचीचे रंग-रूप आणि नखरे अनेक!

नियमितपणे उत्तम नफा देणारे “मिरची” हे पिक शेतकरी बांधवांचे आवडीचे आहे. भारतीय व्यंजनातील झणझणीत चवीने संपूर्ण जगाला वेड लावत “मिरची”ला एक अढळ स्थान मिळवून दिले आहे. मिरचीचे व्यवस्थापन कसे करावे? कोणती खते द्यावी? कोणत्या फवारण्या घ्याव्यात? अशी भरपूर माहिती आमच्या ब्लॉगवरील पूर्वीच्या लेखात आपण वाचू शकता. फेसबुक लाइव व युट्युबच्या माध्यमातून श्री. अमोल पाटील सरांनी या विषयावर अनेक वेळा मार्गदर्शन केलेच आहे. आपण ते व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चानलला नक्की भेट द्या.

संपूर्ण जगात भारताचे एक वैशिट्य म्हणजे इथली विविधता. भाषा, संस्कृती, पेहेराव, खाद्यसंस्कृतीत मोठे अंतर असून देखील आपल्या देशवासियांचे ऐक्य जगासमोर एक आदर्शनिर्माण करते. मिरची हे पिक देखील याला अपवाद नाही. काश्मीर ते कन्याकुमारी, अनेक प्रकारच्या मिरच्या पिकवल्या व वापरल्या जातात. त्यांची चव, रंग, रूप यात भरपूर वैविध्य आहे. यातील वैविध्य हे आपल्या भारतीयतेला साजेशेच आहे असे म्हणावे लागेल. आजच्या लेखात मिरचीच्या प्रसिद्ध प्रजाती व त्यांचा उपयोग नेमका कुठे होतो हे जाणून घेवू.

आजचा शेतकरी ग्लोबल आहे. त्याने पिकवलेले अन्न जगभरात पाठवले जाते. शिवाय तो आता फक्त शेतकरी राहिला नाही. प्रक्रिया उत्पादनातून व व्यंजनांच्या माध्यमातून देखील तो आपली उत्पादने व सेवा देतो आहे. मिरचीच्या प्रकाराबद्दल माहितीदेणारा हा लेख आजच्या या ग्लोबल बांधवाला नक्कीच भावेल व उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.

भूत जलोकिया: हि उत्तर पूर्व भारतात होणारी सर्वात तिखट मिरची आहे. २००७ साली या मिरचीची जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून गिनीजबुकात नोंद झाली होती. २०११ साली मात्र त्रिनिनाद-स्कोर्पिअन-बच-टी-पेपर या मिरचीने तिखटपणात भूत-जालोकीयाला मागे टाकले.

रेडीमेड चटण्या, सॉस, लोणचे या व्यतिरिक्त वराहमास व आंबवलेल्या मास्याच्या व्यंजनात भूत जलोकीयाचा वापर आजही मोठ्या प्रमाणात होतो. विदेशातील अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांच्या तिखटपणाची तीव्रता अचूक ठेवण्यासाठी भूत जलोकीयाचा उपयोग करतात. त्याव्यतिरिक्त भारतीय रक्षा संशोधन आणि विकास संस्थेने हातगोळ्यात या मिरचीचा वापर केला आहे. लपून बसलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी या तिखट हातगोळ्यांचा उपयोग केला जातो.

 

स्व-संरक्षणाठी, चोर-उचक्क्यांच्या डोळ्यास इजा पोहोचवून त्यांच्या पासून सुटका करून घेण्यासाठी, बनवल्या जाणाऱ्या तिखट स्प्रे मध्ये देखील भूत जालोकीयाचा अर्क वापरण्यात येतो. घृणास्पद घटनांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आधुनिक स्त्रिया या प्रकारचा स्प्रे पर्स मध्ये बाळगतात.

काश्मिरी: नावाप्रमाणे हि मिरची काश्मीर प्रदेशात घेतली जाते. तिखट नसली तरी तिच्या लाल भडक रंगामुळे या मिरचीची मोठी मागणी असते. व्यजनांचा लालभडक रंग पाहून खवय्यांची भूक भडकते व ते चवीने खातात म्हणून चवीसाठी नसलीतरी रंगासाठी या मिरचीला मोठी मागणी आहे.

पॅकिंग मध्ये विकल्या जाणाऱ्या लाल तिखटात चवीसाठी एक व रंगासाठी काश्मिरी मिरची वापरण्याचा दावा अनेक विक्रेते करतात. अर्थात ते किती खरे असते हा भाग वेगळा.भेसळीचे परीक्षण करण्यासाठी विविध किट्स एमेझोनवर उपलब्ध आहे.

गुंटूर: आंध्रप्रदेशातील गुंटूर हे ठिकाण तिथल्या चटकदार तिखट व्यंजनांसाठी प्रसिद्ध आहे. या चवीचे श्रेय तिथल्या जगप्रसिद्ध गुंटूर मिरचीलाच जाते. इथे तयार होणारे तिखट संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात निर्यात होते.

संपूर्ण जगात मिरचीचा सर्वात मोठी उलाढाल गुंटूरलाच होत असते. लगतच्या मध्य प्रदेशातील “गुंटूर सनम” मिरची या जगज्येत्या गुंटूरमिरचीच बहीण म्हणावी. जंगली हत्तींनी शेतात घुसून नासधूस करू नये म्हणून दक्षिण भारतातील अनेक शेतकरी शेताभोवती कुंपणाप्रमाणे मिरचीचे पिक लावतात.

ज्वाला: हि मुळची गुजरातची मिरची असून तेथील खेडा, म्हैसाणा व दक्षिण गुजरात मध्ये हिची शेती होते. हिला फिंगर हॉट पेपर असेही म्हटले जाते. मिर्च-मसाला हा सिनेमा स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातील घटनेवर आधारित आहे. गुजराथ राज्यातील एका गावात सुभेदार कर वसुलीसाठी येतो. तो बेदरकार व स्वच्छंदी असतो. महिलांवर त्याची वाईट नजर असते. सुभेदाराच्या वचकामुळे गावातील कुणीही पुरुष व स्त्रींया त्याच्या अन्यायी मागण्यांना विरोध करीत नाही. अश्यात त्याची नजर सोनबाई या सुंदर स्त्रीवर पडते. तो तिचा हट्ट धरतो पण सोनबाई काही केल्या राजी होत नाही. सुभेदार सोनबाईला वश करण्याचा अतिरिक्त प्रयत्न करतो व सोनबाईला साथ देत गावातील महिला त्याच्या डोळ्यात झणझणीत तिखट घालतात व त्याला संपवतात. सिनेमात दाखवलेली हि मिरची ज्वालाच असावी!

हि मिरची आपल्याकडे परसबागेत देखील घेता येते व बाजारात वर्षभर उपलब्ध असते.

कांथारी: केरळ व तामिळनाडूच्या काही भागात हि मिरची घेतली जाते. हिची वाढ कमी असली तरी ती वर्षभर उपलब्ध होते. पक्षांना हि मिरची फार आवडते व त्यांच्या विष्ठेतून हिचा निसर्गत: प्रसार होतो म्हणून हिला बर्ड आय चिली असेही म्हणतात. पिकली कि मिरची लाल होण्याऐवजी पांढरी होते. स्वादासाठी हि मिरची वापरली तर जातेच शिवाय हिच्या सेवनाने चयापचय वाढून शरीर सडपातळ ठेवण्यास मदत होते. 

व्यंजनाना वैशिट्यपूर्ण चव व स्वाद यावा म्हूनन कांथारीला मागणी असते.

बेडगी: कर्नाटकातील हि सुप्रसिद्ध मिरची असून हावरी जिल्ह्यातील बेडगी या गावावरून हिला हे नाव मिळाली आहे. सुपरमार्केट मध्ये देखील बेडगी मिरचीची पाकिटे उपलब्ध असतात.

सांबाराची चव अस्सल दक्षिण भारतातल्या सांबारा लागावी म्हणून गृह्णी हटकून बेडगी मिरचीचाच वापर करतात. बेडगी मिरची च्या तेलाचा उपयोग नेल पॉलिश व लीपस्टिक च्या निर्मितीमध्ये देखील होत असतो. शीतगृहात हि मिरची साठवली तर त्यापासून मिळणाऱ्या तेलाचे प्रमाण चक्क ३०-३५ टक्क्याने वाढते! या तेलाला युरोप-अमेरिकेत मोठी मागणी असल्याने या मिरचीत व्यापार वाढीस लागला आहे.

रमनाड मुंडू: तामिळनाडू राज्यातील गोल आणि भगव्या रंगाची हि मिरची रमनाड जिल्ह्यात घेतली जाते. चेट्टीनाड व्यंजनात या मिरचीला विशेष महत्व आहे.

धानी: मणिपूर मध्ये उगवल्या जाणाऱ्या  या मिरचीला कलकत्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तिखट, तीव्र वास व रक्ताप्रमाणे लाल रंग असे या मिरचीचे वैशिट्य आहे.

शेतकरी मित्रहो जगभरात खाद्यपदार्थांचे नवनवीन चलन सतत येत असते व जर आपल्याला वैशिट्य पूर्ण मिरचीचे उत्पादन घ्यायची आवड असली तर आपल्याला यात फलदायी सहभाग नोंदवता येवू शकतो. 

प्रयोगशील शेतकरी बांधव संकराच्या माध्यमातून मिरचीचे नवे बियाणे शोधू शकतो त्यासाठी वर दाखवलेले पादप प्रजनन - सिद्धांत एवं विधिया हे पुस्तक आपल्या नक्की उपयोगी पडेल. या कामी आपण कृषीविद्यापीठाची देखील मदत घेवू शकता. पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करून आपण अधिक माहिती मिळवू शकता.
मित्रहो, हा ब्लॉग कसा वाटला? ते कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. लेख आवडला असेल तर फेसबुकवर शेअर करण्यासाठी इथे क्लिक करा. व्हाटसअप वर शेअर करण्यासाठी स्कीनवर डाव्याबाजूला एक बटन दिले आहे.

आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

---------------------

Back to blog