कृषी उत्पादकतेत भारत मागे का आहे?

कृषी उत्पादकतेत भारत मागे का आहे?

रासायनिक खते आल्यावर एकरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ दिसू लागली. त्या पाठोपाठ सुधारित वाण, हायब्रीड बियाणे, ऊतीसवर्धीत रोपे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पेपर मल्चिंग, शेडनेट, ग्रीन हाउस, कीटक नाशके असे अनेक बदल कृषी तंत्रात होत गेले. उत्पादनात सातत्याने वाढ दिसत गेलीखर्च वाढले पण उत्पादन देखील वाढले.

 पण आज जर आपण शेजारी देशातील उत्पादकतेशी आपल्या देशातील उत्पादकतेशी तुलना केली तर आपण कुठेतरी मागे पडतो आहोत हे स्पष्ट दिसते आहे.

चीनचा कृषीयोग्य भूप्रदेश जरी भारतापेक्षा जास्त असला तरी १९८० नंतर चीनचे क्षेत्र स्थिर आहे म्हणजे १९८० नंतर शेतीयोग्य जमिनीत वाढ झालेलीच नाही. चीनची शेती देखील आपल्या देशा प्रमाणे लहान-सहान तुकड्यात वाटली गेलेली आहे. असे असून देखील चीनची उत्पादकता भरतापेक्षा जास्त आहे.

१९६० च्या दशकात डाळवर्गीय पिकात भारताचे हेक्टरी उत्पन्न ९५० किलो तर चीनचे १२०० किलो होते, म्हणजेच चीनचे उत्पन्न सव्वा पट अधिक होते. वर्ष २०१३ मध्ये भारताचे उत्पन्न हेक्टरी ३००० किलो तर चीनचे ५८९१ किलो होते म्हणजे जवळपास दुप्पट झाले. म्हणजेच जेव्हा आपली उत्पादन क्षमता तीन पटीने वाढली तिथे चीनची उत्पादन क्षमता जवळ पास ५ पट वाढली!

इतरही अनेक पिकात हीच कथा आहे.

 कृषी उत्पादकतेत भारत चीनच्या मागे का? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर असे लक्षात आले कि १९९० पर्यंत चीनमध्ये शेतात पैसा गुंतवला जात नव्हता पण त्यानंतर या क्षेत्रात त्यांनी भरीव गुंतवणूक केली व आज ते आपल्या पेक्षा ३ ते ४ पट अधिक पैसा शेतात गुंतवतात! खत, पाणी, जमिनीची सुपीकता, यांत्रिकीकरण व सोयीसुविधा वाढवून त्यांनी हे यश मिळवले आहे. 

आपण मात्र अजूनही शेतात गुंतवणूक करावी कि नाही याबद्दल साशंक आहोत. शेत्तीत उज्वल भविष्य असून देखील आपण पुढील पिढीला शेतीपासून दूर सारू पहातोय. आपल्या शेतात तंत्रज्ञानाचा वापर आजही हव्या त्या प्रमाणात केला जात नाही. संतुलित खत मात्रा लक्षात न घेणे हि सर्वात मोठी उणीव सहज दिसून येते. आपण आजहि लाटेवर पिक ठरवतो, इतरांनी जे पिक लावले तेच आपण लावतो, इतकेच काय तर वाण देखील त्याने जे लावले तेच लावतो. प्रयोगशीलतेचा अभाव, लागवडीपूर्वी  पिकाच्या मार्केटिंगच्या अभ्यासाचा आभाव अगदी स्पष्ट जाणवतो. 

मित्रहो, शेतकरी हा एक मोठा व्यावसायिक आहे - हजारो अनिश्चितता असून देखील एक दाणा पेरला कि मुठभर धान्य तयार होतेच, तेव्हा नकारात्मकता टाळायला हवी.

Back to blog