वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग आठवा)

वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग आठवा)

मित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या नियोजनावर भर देत आहोत. सोबतच इतर काही बाबीं ज्या आपल्या मानसिकतेवर परिणाम करतात त्यांच्या विषयी देखील जाणून घेत आहोत. यावेळी आपण "पक्षपाती मनोधारणे" विषयी माहिती मिळवू.

किसन हा एक हुशार शेतकरी आहे. आपल्या शेताचे वार्षिक उत्पादन वाढवायचा प्रकल्प त्याने हाती घेतला आहे. तो निवडक तज्ञांचे मार्गदर्शन घेतो. आसपासचे अनेक शेतकरी किसन ला विचारून शेती करतात. त्याच्या शेतावर अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्याच्या शेताच्या एका तुकड्यातून कसे अभूतपूर्व व चवदार उत्पादन निघाले, किसन किती वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो, जिद्दी आहे, मेहनती व हुशार आहे, अशा अनेक मुद्द्यावर या कार्यक्रमात चर्चा होत असते. यश-अपयश हे जीवनाचा एक भाग आहे. शेवटी शेतीचे उत्पादन निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. किसन ला काही वेळा नुकसान देखील झाले आहे. निसर्गाचा लहरीपणा हे मोठे कारण आहे. तो या सर्व बाबींची नोंद ठेवतो. आपल्या तज्ञानवर त्याचा खूप भरोसा आहे, विश्वास आहे.

नुकताच त्याने आपल्या प्रगतीचा आढावा घेतला. गेल्या पाच वर्षात त्याच्या वार्षिक उत्पादनात दरवर्षी ३ टक्याच्या दराने वाढ झाली आहे. हि वाढ महागाई च्या दरापेक्षा कमी आहे. एकी कडे निसर्गाचा लहरीपणा व दुसरीकडे चुकीच्या सरकारी धोरणांमुळे वाढत चाललेली महागाई. अशा विचित्र परिस्थितीत किसन ने फार प्रगती केलेली नाहीये. खरे पहाता त्याने अधोगतीच केली आहे. पण आपल्या शेतीचे वार्षिक उत्पादन वाढवायचा प्रकल्प असाच सुरु ठेवायचा या विचारावर किसन ठाम आहे. काहिहि असले तरी त्याचा विश्वास महत्वाचा आहे. त्याने आपल्या निवडक तज्ञांच्याच मदतीने उत्पादन वाढीचा प्रयत्न सुरु ठेवायचा असे ठरवले आहे. तुम्हाला किसन ची मनोधारणा पक्षपाती वाटत नाही का? त्याने इतर तज्ञांचा सल्ला घ्यावा असे वाटत नाही का? नेमकी चूक कुठे आहे हे बघितले तर किसन कृषी उत्पादकता अधिक वेगाने वाढवू शकत नाही का?


पक्षपाती धारणा गैरसमजाची जननी आहे. कोणतीही नवी माहिती या धारणेसमोर टिकाव धरू शकत नाही. टिकून रहाते ती फक्त "पक्षपाती धारणा". दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर नवीन माहिती जरी वेगळी असली व आपल्या विचारांशी सहमत नसली तर आपण आपली मनोधारणा बदलण्या ऐवजी हि नवीन माहिती चुकीची आहे असा दुराग्रह करून बसतो. शेवटी तुम्ही ज्या रंगाचा चष्मा घालाल त्याच रंगाची दुनिया दिसते. दुर्दैव हेच कि आपले प्रेम आपल्या मनोधारणे वर असते, चष्म्यावर असते. या ठिकाणी आपली प्रगती दुय्यम ठरते व किसनसारखी परिस्थिती निर्माण होते.

पक्षपाती मनोधारणा सर्वदूर दिसून येते. औद्योगिक जगात देखील, कंपन्या रसातळाला आणण्यात, पक्षपाती मनोधारणेचा मोठा हात आहे. तुम्हाला नोकिया माहिती आहे का? वेळेवर योग्य ऑपरेटिंग सिस्टीम न अंगिकारल्याने हि कंपनी मागे पडली. कंप्युटर मध्ये वापरायची ऑपरेटिंग सिस्टीम फोन साठी वापरल्यामुळे ते मागे पडले. विंडोजच चांगली आहे हि मनोधारणा त्यांच्या साठी विनाशकारी ठरली. 

कोडॅक व कॅनोन या दोन कंपन्या कॅमेरा बनवतात. सुरवात कोडॅक ने केली. मोबाईल मध्ये कॅमेरा आल्यावर कोडॅक बंद पडली पण कॅनोन  टिकून राहिली! कारण काय? कोडॅकने आपल्या धारणा बदलल्या नाहीत! कॅनोन वेळे नुसार बदलत घेली आजही ते कॅमेरा बनवतात व त्यांचे कॅमेरे अव्वल आहेत

मित्रहो. विनाशकारी मनोधारणा बदलणे आवश्यक आहे. गैरसमजाशी युद्ध करणे कठीण नाही. प्रत्यत्न केला तर नाविन्याचा स्वीकार करणे सोपे आहे. जेव्हा मनाला न पटणारी माहिती समोर येईल तेव्हा तिची नोंद करून पडताळणी करणे आवश्यक आहे. तुमची मनोधारणा देखील स्पष्ट शब्दात लिहून ठेवा. त्यात काय योग्य आहे याचा आग्रह करण्याऐवजी काय चुकीचे आहे याची पडताळणी करा.

सातत्याने प्रगती करणारा शेतकरी इतरांपेक्षा वेगळा कसा असतो? जेव्हा इतर शेतकरी आपली मनोधारणा किती योग्य आहे अश्या विचारात असतात तेव्हा प्रगत शेतकरी त्याची मनोधारणेत मुद्देसुद बदल करीत असतो.

 
फोटोवर क्लिक करून आपण हि पुस्तके खरेदी करू शकता 

भारतीय खंडात १५० वर्ष राज्य करीत असतांना इंग्रजांनी येथील हिंदू-मुस्लीम संस्कृतीत दुराग्रह वाढवत दोघी लोकात पक्षपाती मनोधारणा निर्माण केली. तिचा उपयोग करत अनेक वर्ष राज्य केले व जाता जाता फाळणीचे बीज पेरून ठेवले. आजही या मनोधारणांच्या मागे लपून राजकीय नेते आपल्या पोळ्या शेकून घेत आहेत. याच धरतीवर अनेक लोकं आपल्या धारणांशी खेळत असतात. पुढील भागात या "मनोधारणेच्या या मोहक विषकन्येचा" खात्मा कसा करायचा व प्रगतीच्या मार्गावर कसे आरूढ व्हायचे हे जाणून घेवू.

 

Back to blog