वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग नववा)

मित्रहो आपल्या मनोधारणेचा व गैरसमाजाचा फायदा अनेक लोकं घेत असतात. विश्वासराव गेल्या २० वर्षापासून सरपंच आहेत. त्यांच्या कडे जाणारी प्रत्येक व्यक्ती समाधानी होऊनच परत येते. कुणाचीही त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये. ते आहेत तो पर्यंत "सरपंच" पद त्यांच्या कडेच राहील हे निश्चित आहे. गेल्या २० वर्षात गावातील परिस्थितीत फारसा बदल झालेला नाहीये. पहिले फोन नव्हते, मग फोन आले, आता प्रत्येकाकडे मोबाइल आहेत. टीव्ही नव्हते, मग टीव्ही आले, आता स्मार्ट टीव्ही देखील आले आहेत. पूर्वी रस्ते नव्हते आता सिमेंट चे रस्ते आहेत. हे सर्व बदल बाहेरून आले आहेत. गावातील १०० टक्के लोक शेती करतात पण २० वर्षात गावातील व शेताच्या पाण्याची समस्या जशी होती तशी आहे. एका मध्यवर्ती धरणातून पाणी पुरवठा होतो पण त्यात गावाचा ह्क्क थोडासाच आहे. शिवारातील तण समस्या जशी होती तशीच आहे. सामुहिक तण नियंत्रण केले तर शेतीचे उत्पन्न ४० टक्क्याने वाढू शकते. सामुहिक कीड नियंत्रणातून देखील भरीव फायदा होऊ शकतो. एक नेता म्हणून विश्वासरावांनी असा प्रयत्न केलेला नाही. गावात एकहि कृषीपूरक उद्योग नाहीये. गावातील सर्व कृषीउत्पन्न जवळपासचे व्यापारी व विश्वासराव विकत घेतात. त्यांच्या कडे कुणीही सार्वजनिक समस्या आणत नाही. वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या घेवून कुणी भेटायला गेले कि विश्वासराव समस्या ऐकून घेतात, मनावर फुंकर घालतात, चहा- नाश्त्याचा पाहुणचार करतात. इतर ख्याली खुशाली विचारून - तात्पुरते निराकरण करून देतात. विश्वासरावांनी फक्त त्यांची पत टिकवून ठेवली आहे बाकी सर्व अंधार आहे. पण गावकऱ्यांची मनोधारणा त्यांच्या बाजूने आहे, फायदा विश्वासराव घेत आहेत.मनोधारणेचा गैरफायदा घेणारी दुसरा प्रकार म्हणजे जोतिष्यांचा. 

  • जन्माला आलेले मुल हे रसिक स्वभावाचे, सदा उत्साही व मनमिळवू असेल.
  • कामानिमित बरीच धावपळ होईल
  • महत्वाचे निर्णय जाणकारांच्या सल्ल्याने घेतलेले बरे
  • दुसऱ्याच्या भरवशावर तिसऱ्याला आश्स्वासने देवू नका
  • मुलीचे लग्न लवकरच होईल
  • अमकी पूजा केली तर जिंवनात सुख राहील.

असे ढोबळ सल्ले जोतीशी देत असतात. त्यांच्या भाकितांना फारसा अर्थ नसतो.  हि भाकिते  १०० टक्के चुकीचे ठरू शकत नाही पण १०० टक्के खरे देखील ठरू शकत नाही. पण ज्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला ठावूक नाही ती कुणीतरी द्यावी म्हणून आपण ज्योतिष्याकडे जातो व स्वत:चे तत्कालिक समाधान करून घेतो. आपल्या मनोधारणेचा फायदा ते करून घेतात. 

प्रत्येकाने रोज थोडा व्यायाम करायला हवा. त्यामुळे दिवसभर मोकळे वाटते, दमखम टिकून रहातो, चांगली भूक लागते, खाल्लेलं अन्न लवकर पचते, पित्त व अपचन होत नाही. प्रत्येकाने रोज थोडा व्यायाम करायला हवा हे सत्य आहे. तुम्ही योगशिबिरात गेले आहात का? तिथे योगा मुळे तंदुरुस्त असलेले ८५ वर्षाचे आजी किंवा आजोबा असतात. योगाचे अनेक फायदे सांगितले जातात. अनेक किस्से सांगितले जातात पण योग करून देखील जी लोके अकाली मरण पावली त्यांच्या बद्दल सांगतले जात नाही! थोडे सत्य ठासून दाखवले जाते व थोडे सत्य समोर येवूच दिले जात नाही. इथे मनोधारणे चा चांगला उपयोग करून घेतला जातो. 

इंटरनेट वर तुमच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो. जेव्हा आपण कुठल्याही विषयावर माहिती शोधतो किंवा एखादी वस्तू बघतो तेव्हा आपल्या मोबाईल किंवा काम्पुटरच्या  आय पी एड्रेस च्या मदतीने या वेबसाईट आपल्या मानसिकतेचा शोध घेतात व त्या नुसार पुढील माहिती जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतात. एकदा तुम्ही सनी लिओनि असे तुमच्या बाउझर मध्ये टाईप केले कि तिचे फोटो, तिच्या जाहिराती, तिच्या सारख्या इतर ललनांचे फोटो तुम्हाला दाखवून आकृष्ट करून घेतले जाते. हा अनुभव तुम्हाला नक्की आलेला असणार! आय पी एड्रेस च्या मदतीने कुणी आपल्या मानसिकतेचा अभ्यास करू नये असे वाटत असेल तर इनकॉगनेटो नावाची एक सोय आहे. तिचा वापर करू शकता!

 एक शेतकरी म्हणून, शेतीच्या बाबतीत, पिक निवडीचे शास्त्र, लागवडीची पद्धत, व्यवस्थापन या संदर्भात तुमचे मानसिक कल ठरलेले असतील. तुम्ही ते एका डायरीत नोंदवून ठेवा. कालानुरूप तुमचे मत किती योग्य आहे व किती अयोग्य आहे याची देखील नोंद घ्या. तुमचे मत किती योग्य आहे या पेक्षा किती अयोग्य आहे यावर जास्त भर द्या. हा सूर्य - हा जयद्रत या पद्धतीने विज्ञान व वाणिज्या च्या निकषांवर योग्य निर्णय घ्या.

मित्रहो, तुमचा प्रत्येक समज हि एक सुंदर व लाघवी प्रियसी आहे असे समजा. जर तिच्या सोबत तुमची प्रगती होत असेल तर उत्तम आहे पण जर ती विषकन्या बनून तुमच्या प्रगतीत अपयशाचे विष पेरत असेल तर अशा प्रियसीचा नाद करणे योग्य नाही, अशा समजाला तिलांजली द्यायला हवी. 

पुढील भागात वेळेच्या काही खास नियामांवर लक्ष केंद्रित करू तेव्हा पुन्हा भेट द्यायला विसरू नका!