कापसातील तणनियंत्रण

कापसातील तणनियंत्रण

अलीकडील काळात कापसात अत्याधिक उत्पादनशील वाण आलेले आहे त्यामुळे ते अधिक खादाड असते. त्याला जर पाणी, खते व जागेसाठी तणाशी स्पर्धा करावी लागली तर त्याची भूक भागत नाही व उत्पादन कमालीचे खालावते.

प्रत्येक पिकासाठी एक सुरवातीचा संवेदनशील कालावधी असतो. या कालावधीत पिकाची प्रार्थमिक वाढ होत असते. या कालावधीत आपण प्रभावी तण नियंत्रण केले हि तणे पिकाचे काही खास नुकसान करू शकत नाहीत. कापूसात हा कालावधी ६० दिवसाचा असतो. 

 कधीही नियंत्रणापेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावशाली असतो. तणनियंत्रणाच्या पद्धती जाणून घेण्यापूर्वी आपण तणप्रतिबंधनात्मक उपाय काय आहेत हे देखील जाणून घेवू.   

 • नेहमी तण विरहित बियाणेच वापरा
 • बांध-धुरे-पाट याठिकाणी तण वाढू देवू नका
 • शेत-परिसरात येणारे कोणतेही तण फुलावर यायच्या आधी उपटा
 • पूर्णपणे कुजलेलेच कंपोष्ट वापरा कारण अश्या कंपोष्ट मधील तणांच्या सर्व बिया उष्णतेमुळे निर्जीव झालेल्या असतात
 • पेरणी करण्यापूर्वी आलेली तणे वाखरीने काढून शेत स्वच्छ करा

  तणनियंत्रणाची एकात्मिक पद्धत

  तणनियंत्रण करण्यासाठी नेहमी एकात्मिक पद्धतीचाच वापर करावा. याचा अर्थ असा होता कि दोन ते तीन संपूर्ण वेगळ्या पद्धतींची सांगड घालावी. 

  व्यवस्थापकीय पद्धत - हि तण नियंत्रणाची अप्रत्यक्ष पद्धत आहे असे म्हणायला हरकत नाही. वेळेवर, योग्य खोलीवर व नेमक्या अंतरावर पेरणी करणे, खतांची योग्य मात्रा अचूक पद्धतीने देणे, एकरी रोपांची संख्या योग्य राखणे, नेमके जलव्यवस्थापन, आंतरपीक घेणे यांचा या पद्धतीत समावेश होतो.

  भौतिक/यांत्रिक पद्धत - या पद्धतीत तण उपटणे, निंदणी-खुरपणी, कोळपणी करणे, पेरणीपूर्व वखराचीपाळी मारणे, मल्चिंग (प्लास्टिक, अवशेष) करणे अशा पद्धतींचा समावेश होतो.  

  रासायनिक पद्धत - या पद्धतीत रासायनिक तणनाशकांचा उपयोग करण्यात येतो.  तणनाशकाचे परिणाम जितके स्पष्ट दिसतात तितकेच त्याचे दुष्परिणाम देखील स्पष्ट असतात त्यामुळे यांचा उपयोग व्यवस्थित अभ्यास करूनच करावा. इथे कापसामध्ये वापरण्यास योग्य तणनाशकांची माहिती देत आहे. 

   • एलाक्लोर 50% ईसी - हे उगवणीपूर्व वापरायचे तणनाशक लोसो, शोले, ट्रैप या नावानी उपलब्ध असून मका, भुईमुग व सोयबीन या पिकात देखील तणनाशक म्हणून वापरले जावू शकते. हे एक निवडक व आंतरप्रवाही तणनाशक आहे. अंकुरण अवस्थेत याचे शोषण होते व ते प्रथिन निर्मितीत बाधा आणते. मुळांची वाढ खुंटून तण मरते. या निवडक आंतरप्रवाही तणनाशकाच्या उपयोगाने गवत वर्गीय तणे तसेह गजर गवताच्या नियंत्रित केले जावू शकते. एकरी दीड ते दोन लिटर औषध फवारणीसाठी वापरावे. एलाक्लोर 10% जीआर चा एकरी डोस ८-१० किलो चा आहे. 
   • डायुरोन ८०% डब्लू पी. - (एग्रोमॅक्स,हेक्झुरोन, रसायनेक्स) हे तण/शेवाळ नाशक बायर कंपनीने १९५४ मध्ये बाजारात आणले. ते प्रकाशसंश्लेषणात अडथळे आणते. कापसाव्यतिरिक्त हे तणनाशक केळी, रबर, मका, लिंबू, ऊस व द्राक्षातील तणावर वापरले जाते. हे औषध वापरत असाल तर हे लक्षात घ्यावे कि वर्षातून फक्त एकदा वापरू शकता. पाणी साठून राहिले असेल, पुढील तीन दिवसात ५० मिमी पेक्षा अधिक पाउस पडण्याची शक्यता असेल, पुढील तीन दिवसात पाण्याची पाळी द्यायची असेल तर हे तणनाशक अजिबात वापरू नये. 
    • उगवणी पूर्व वापरणार असाल तर सरकि कमीत कमी चार सेमी खोल पेरा व त्यावरील माती पक्की दाबा.हलक्या जमिनीत अजीबात वापरू नका. पेरणी नंतर लगेच याची फवारणी करून घ्या.
    • उगवणी नंतर तणावर फवारणी घेत असाल तर कापसाची उंची कमीत कमी ३० से. मी . असावी व कापसावर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. तणाची उंची १५ सेमी पेक्षा जास्त नसावी. हे लक्षात ठेवा कि हे तणनाशक वापरल्यावर पिक फेरपालट करतांना कपाशी, मका व ज्वारी व्यतिरिक्त पिक घेवू नये. इतर पिकांना अडचण येवू शकते. एकरी डोस ९०० ग्राम च्या वर जायला नको! 
   • फेनोक्झाप्रोपिथिल ९.३% इसी - हे तणनाशक व्हीप सुपर नावाने उपलब्ध असून सोयबीन, भात, कापूस, उडीद व कांद्यात येणाऱ्या गवत वर्गीय तणावर, उगवणी नंतर, फवारले जावू शकते. फवारणी नंतर ते लगेच शोषले जाते व तणातील स्निग्धचय थांबवते. सरकीच्या पेरणी नंतर २०-२५ दिवसाने जेव्हा तण ३-४ पानांचे असते तेव्हा याची तणावर फवारणी करावी. याची फवारणी जमिनीवर करायची नसल्याने मृदेच्या प्रकाराचा यावर परिणाम होत नाही शिवाय कापसाच्या पाठीवर कोणते पिक घ्यावे यावरदेखील कोणतेही बंधन शिल्लक रहात नाही. एकरी  ३०० मिलीचा वापर पुरेसा ठरतो. 

   • फ्लुक्लोरालिन 45% ईसी - बसालीन नावाने हे तणनाशक उपलब्ध असून जरी इंटरनेटवर याचा उपयोग अनेक पिकात सुचवला असला तरी केंद्रीय कीटनाशक बोर्डाने फक्त कापूस व सोयाबीन मध्ये शिफारस केलेली दिसते. हे आंतरप्रवाही तणनाशक प्रथिन बनायच्या प्रक्रियेत अडथळे आणते.  (याची विस्तृत माहिती संशोधित केली जात आहे. ) एकरी  १ लीचा वापर पुरेसा ठरतो.
   • पेंडीमिथालिन 30% ई.सी. व पेंडीमिथालिन ३८.७ % सी एस - पेंडीमिथालिन कोशिका विभाजन व वाढ थांबवते त्यामुळे तणाचा बीतून निघणारे अंकुर वाढायचे थांबतात. हे स्पर्शजन्य, उगवणीपूर्व व निवडक प्रकारचे तणनाशक आहे. इ.सी. प्रकारचे संयुग धनुटॉफ, हेमीपेंडा, पेंडिंमींड, पेंडीसोल, क्रोपपेंडी, नागास्त्र, पेडीमोल, पेंडोलाक्स अशा विविध नावांनी बाजरात उपलब्ध आहे.  याची फवारणी करते वेळी मृदेत आद्रता असणे आवश्यक आहे. कापसा व्यतिरिक्त याचा उपयोग कांदा, लसूण, सोयबीन, उडीद, मुग, गहू व भातात केला जातो. सर्वसाधारण एकरी डोस एक ते दीड लिटर चा आहे. भातात मात्र तो दीड ते दोन लिटर असा आहे. सी एस प्रकारचे संयुग आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवले जाते. ते हिटबॅक, क्लीनगार्ड, पंडोरा अशा नावांनी बाजारात उपलब्ध आहे. कापसा व्यतिरिक्त याची शिफारस सोयबीन,मिरची, कांदा या पिकात करण्यात आली आहे. याचा एकरी डोस ६५० मिली आहे.  
   • पैराक्वाट डाईक्लोराइड 24% एस.एल. - हे मोघम (बिना-निवडक), स्पर्शजन्य तणनाशक असून याचा शोध १८८२ साली झाला होता पण उपयोग १९५५ साली लक्षात आला. याची वैशिठ्य म्हणजे, ते वार्षिक गवते, रुंद पानांची व बारमाही तणे वेगाने नियंत्रित करते. फवारणी केल्यावर लगेच पाउस पडला तरी ते पाण्यात वाहून जात नाही. मातीशी स्पर्श झाला कि त्याची क्षमता नाहीशी होते. कापसाव्यतिरिक्त चहा, बटाटे, रबर, मका, द्राक्ष व सफरचंदात दोन-तीन पानावर असल्येल्या तणावर फवारावे. मुख्यपिकावर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. नागरणीशिवाय घेतल्या जाणाऱ्या भात, गहू व मक्यात याचा उपयोग पेरणीपूर्वी करावा. ओझोन नावानं हे उत्पादन बाजारात उपलब्ध आहे. एकरी डोस ६५० मिली ठेवावा

     मित्रहो अचूक तणनियंत्रणातून उत्पादनात ३०-४० % वाढ सहज होते. मुख्य पिकाला वाढायला पूर्ण वाव मिळतो. या विषयावर अजून काही माहितीपूर्ण ब्लॉग आम्ही लवकरच देणार आहोत. आमच्या फेसबुक गृपला जॉईन व्हा म्हणजे ते भाग नक्की वाचायला मिळतील.

    Back to blog