रावणाचा अंत करतच रहावा

रावणाचा अंत करतच रहावा

दसरा झाला, मनातील भीती, आळस, गर्व, काम, क्रोध, द्वेष, लोभअशा दुर्गुणांची आहुती देवून मन पवित्र झाले. मन शुद्ध झाले, शंका कुशंका धुळीस मिळाल्या. कोण आपले -कोण परके हे देखील स्पष्ट पणे लक्षात आले. परक्यांना टाळून, आपल्यांची माफी मागून...मने जोडून..मिलन झाले....असा झाला साजरा दसरा!

माझे शेतकरी मित्र..रात्री अपरात्री शेतात जातात. वीज रात्रीच असते..मोटारी चालू होतात. पाण्याचे नियोजन करायचे असते...अंधारात काही दिसत नाही...एक विजेरी कामा पुरता प्रकाश देते.  हे नित्याचे आहे, अविभाज्य आहे, सवयीचे आहे. वातावरणातील अंधार छोट्या विजेरीने आपल्या पुरता का होईना दूर करता येतो. हा अंधार मनात घुसू देवू नये. मनात अंधकाराने प्रवेश केला कि त्यात भुते नाचू लागतात...त्यांना दूर करायचे म्हटले तर देवाशी नाते जोडावे. अनेकदा हे नाते जोडणे अवघड जाते मग देवाला आपण दगडात शोधतो...दगडासाठी मंदिर बांधतो..मंदिरासाठी महाराज ठेवतो...रोज नित्यनियमाने मंदिरात जावे, महाराजांनी मंदिर स्वछ: करून, फुलांनी सजवून, सुगंध पसरवून वातावरण भव्य व प्रसन्न केलेलं असत. नतमस्तक होऊन...उर्जा मिळवावी....पुन्हा दुसऱ्या दिवसा पर्यंत तुम्हाला कोणतीच भीती नाही...मनात श्रद्धा तेवत राहील...संकटांचा सामना होईल - तुम्ही लढाल - जिंकाल किंवा हराल...श्रद्धे चे बळ मोठे असते.

यात पुन्हा दुसरी भीती येवू देवू नका...संकटांना घाबरून देवा मला वाचव अशी आळवणी करू नका...देव मला पावणार नाही या भीतीने नवस बोलू नका...देव तुमच्या मनात आहे, हि श्रद्धा क्षीण झाली तर...तुम्ही कमजोर व्हाल. नवस फेडायला महाराज लागतील....महाराजांसमोर नतमस्तक झाले तर त्यांना लोभ होईल, लोभातून ते कर्मकांड वाढवतील..लुट होईल ती वेगळी...आपल्या मनातील देवाशी प्रतारणा होईलती वेगळी. शेतातील अंधारात एक विजेरी पुरेशी ठरते व जीवनातील अंधारात श्रद्धा पुरेशी ठरते.

वर्ष भरातून एकदा दसरा येतोच...आपल्या मनातील वाढीस लागलेल्या  दुर्गुणांचा आढावा घ्या...मनातील या दुर्गुणरुपी रावणाची होळी करा...आपली माणसे जोडा. आपली माणसे दूर झाल्याने रामाला वनवासात...लंकेचा फेरा पडला, आपण तर माणसे आहोत...श्रद्धा हा मूल मंत्र आहे...हि ज्योत तेवत ठेवा..तिचा प्रकाश पुरेसा आहे.

Back to blog