शेतीचे अर्थशास्त्र

शेतीचे अर्थशास्त्र

मित्रहो शेतीचे अर्थशास्त्र आपणास सांगायला मी काही अर्थतज्ञ नाही त्यामुळे आपल्याला सरळ सरळ सल्ला देण्याऐवजी मी आपल्याला आर्थिक मुद्दे विचारात घ्यायला भाग पडणार आहे. खर तर प्रत्येकझण स्वत:च्या दृष्टीकोनातून अर्थतज्ञ असतो. आपल्या कडे किती द्रव्य आहे व आपल्या गरजा काय आहे हे प्रत्येकाला ठावून असते. द्रव्य व गरजा कालानुरूप बदलत जातात व त्यानुसार आर्थिक निर्णय बदलत जातात. ज्यांना आपल्या जवळील द्रव्य व गरजा उमगत नाही त्यांचे निर्णय चुकतात व आर्थिक अडचणी वाढतात. आजपर्यंत अनेकदा असे निर्णय व्यक्तिगत व देशाच्या पातळीवर चुकले आहेत. अर्थशास्त्रात अशा चुका सुधारण्याच्या देखील पद्धती आहेत. गणितात चुकले कि चुकले पण अर्थशास्त्रात असे नाही. गणित अनेक पद्धतीने सोडवता येते पण उत्तर मात्र एकच असू शकते तसे अर्थशास्त्रात नाही. परिस्थिती व ते सोडवणारया नुसार उत्तर बदलते. व्याख्या करायची झाली तर “मर्यादित साधनांपासून “वस्तू किंवा सेवा” बनवून, वितरीत करण्याचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र”  

आमच्या उत्पादनांची संपूर्ण यादी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा 

शेतीच्या बाबतीती विचार करायचा असला तर शेतीयोग्य जमीन (त्यातील जल साठ्या सहित), श्रम (घरचे व बाहेरचे, कुशल व अकुशल उपलब्ध श्रमिक) व भांडवल (यंत्र, औजारे, दळणवळण सुविधा) हि आपली साधने आहेत. कृषीपूरक वातावरण (पर्यावरण व सरकारी धोरण-नीती) हे देखील एक साधन आहे अर्थात यावर आपले अजिबातहि नियंत्रण असू शकत नाही.

साधने नेहमी मर्यादितच असतात पण त्यापासून अनेक उत्पादने व सेवा बनवल्या जावू शकतात. जमिन-पाण्यावर आपण विविध पिके घेवू (ताजी व प्रक्रियायुक्त) शकतो. साधनांची फेररचना करून हि उत्पादने बदलू शकतात. वितरण व्यवस्थे कडे लक्ष देवून आपल्या उत्पादनांसाठी अधिक मोल देणारा ग्राहक मिळवला जावू शकतो.

वातावरण निर्मिती करून समजा आपण एक कृषी-पर्यटन स्थळ बनवले किंवा आपल्याकडे उपलब्ध भांडवली साधने आपण इतरांना भाडे तत्वावर उपलब्ध करून दिली तर ती सेवा ठरते ज्या मोबदल्यात आवक येते.

साधने मर्यादित असतात व त्यात घसारा देखील होऊ शकतो. मृदेची धूप होणे, कस कमी होणे, त्यात उपयोगी जीवाणूंची कमतरता होणे, पिकास मारक सुतकृमी, हुमणी, बुरशी वाढीस लागणे यातून घसारा होतो. पाण्याची पातळी खोल जाणे, शेततळ्यात शैवाल जमा होणे, ठिबक ब्लॉक होणे, तुकडे पडणे, यंत्र-सामुग्रीची झीज होणे, कुशल मजूर स्थलांतरीत होणे यातून साधने कालांतराने कमी होऊ शकतात. विशिष्ठ पद्धतीचे बदल करून हा ऱ्हास थांबवून त्याची दिशा बदलवली जावू शकते. हे जाणीवपूर्वक करावे लागते.

जेव्हा आपण पूर्ण शेतात फक्त उस, फक्त केळी किंवा फक्त कापूस घ्यायचे ठरवतो तेव्हा त्या पिकाच्या संपूर्ण काळा करता आपल्या कडील संपूर्ण जमीन अडकून पडते. सर्वसाधारण पणे श्रम कमी पडतील व औजारेहि कमी लागतील अश्या पद्धतीचे हे नियोजन असते. पण मधल्या काळात काहीही अडचण आली व पिक फसले तर त्या क्षणा पर्यंत केलेली सर्व गुंतवणूक वाया जाते. पिक जर यशस्वी झाले तर मागणी-पुरवठा या तत्वाच्या आधारावर उत्पादित मालाला कमी भाव मिळून, नफ्यात तूट होते. पिक यशस्वी होऊन भावहि चांगला मिळाला तर भरगोस नफा होतो, अशी घटना ४-५ वर्षात एकदाच घडू शकते.

एकूणच संपूर्ण शेतात फक्त एकच पिक लावणे, श्रम व भांडवलाची बचत करणे हि व्यवस्थापनातील सर्वात मोठी व घातक चूक ठरते. आपल्या जवळील जमीन, पाणी, श्रम व भांडवल समतोल पद्धतीने वापरणे महत्वाचे आहे. समतोल साधल्याने धोके कमी होत जावून अधिक मूल्याचे उत्पादन घेतले जावू शकते तसेच अधिक मूल्यवान सेवा देखील उपलब्ध केल्या जावू शकतात.

मित्रहो या लेखात मांडलेले अर्थशास्त्र आपणास कसे वाटले? हे कळवायला मागेपुढे पाहू नका. प्रतिक्रिया लिहा.
--------------------------------
आपली प्रतिक्रिया नोंदवायला 
इथे क्लिक करा
------------------------------
Back to blog