लिहिते व्हा...पैसा स्वत:हून मागे मागे येईल?

गेल्या पाच वर्षात आपण किती नफा कमावला? किती नुकसान झाले? कोणकोणती पिके घेतली? त्यातली परंपरागत पिक किती? कोणकोणती नवीन पिके आपण घेतली?  गेल्या पाच वर्षात किती जनावरे घेतली? किती वारली? किती विकली? किती जमीन खरेदी केली? किती जमीनीचां पोत सुधरवला? किती जमीन विकली?

तुम्हाला हे सर्व आठवते का? कागद पेन घेवून लिहायला सुरवात करा. तुमचे लिहून झाले कि घरातल्यांशी चर्चा करा...काय काय सुटले? 

 मित्रहो जर आपण मागील पाच वर्षाच्या नोंदी ठेवल्या असत्या तर? आपण यातील कितीतरी प्रश्नांची उत्तरे देवू शकला असता. त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे आपण एक "समृद्ध - यशस्वी" शेतकरी असता! आता तुम्ही अपयशी आहात कि यशस्वी हे मला ठावूक नाही. पण जर तुम्हाला पुढील एक वर्ष शेतात काही पिकले नाही तरी चालेल अशी स्थिती असेल, तुमच्या जवळ "जमा-पुंजी" असेल तर तुम्ही यशस्वी आहात असे समजायला हरकत नाही. (वाड-वडिलांची मिळकत, नोकरी-इतर व्यवसायातून येणारा पैसा हिशोबात धरु नका!)

पण जर तसे नसेल व तुम्ही अपयशी असाल तर नाराज होऊ नका. "झाले गेले गंगेला मिळाले!" मित्रहो जर तुम्हाला अजून यश मिळालेले नाही हे जर तुमच्या लक्षात आले असेल तर काही हरकत नाही. "सुबह का भुला शाम घर आये तो उसे भुला नही कहते!" हो पण नुसते लक्षात आल्याने काही बदलणार नाही. तुम्हाला कृती करावी लागेल...या पुढे नियमित नोंदी ठेवायला सुरवात करावी लागेल. आजपासून सुरवात करा..हळू हळू गरजे नुसार त्यात बदल करा. नोंदी करण्याच्या पद्धतीत सुधारणा करा.! पुढील तीन-चार महिन्यात हा दिनक्रम मार्गी लागेल व दुसऱ्या वर्षापासून नोंदींचा फायदा दिसायला सुरवात होईल.

पण आपण या नोंदी आज पर्यंत का नाही केल्या? काय कारणे होती?

माझा एक मित्र, शेतकरी आहे. चांगला बी. ए. पास आहे. त्याची पत्नी सुविद्य आहे, ती नोकरी करते. जेव्हा नोंदी ठेवण्याचा विषय मी त्याच्याजवळ काढला तेव्हा तो म्हटला कि पत्नी सहकार्य करीत नाही. ती लिहून ठेवत नाही! मित्रहो, मी त्याच्यावर चिडलो...म्हटले ती तुला भरवते का? तिच्या हाताने पाणी पितो का? नाहीना? मग स्वत:चा हिशोब स्वत: लिही! शेतीच्या कामाचे स्वरूप थोडे कठीण आहे हे मान्य. तो म्हणतो कि "थकून भागून आल्यावर नोंदी करायची इच्छा होत नाही!" मी त्याला म्हटले "नेकी कर दर्यामे डाल! दिवस भर राबराब राबायचे आणि हिशोब नाही ठेवायचा म्हणजे सैन्याच्या भाकरी थापण्या सारखे आहे!" 


इतर शेतकरी बांधवांना काही वेगळ्या अडचणी असतील. जसे कुणी साक्षर नसेल त्यामुळे नोंदी ठेवता येत नाहीत. कुणाची जमीन इतकी कमी असेल कि लिहून काही फायदा नाही असे त्याला वाटेल. हिशोब ठेवला तर इतरांना आपली आवक कळेल हि भीती देखील काही बांधवांना असू शकते!. काही काही लोकांना  नोंदी करणे म्हणजे खूप काहीतरी क्लिष्ट काम असेल असे वाटते. मित्रहो, अशी कारणे शोधत बसू नका. हिशोब लिहिल्या शिवाय कुणीही पैसा जमवू शकत नाही. नोंदी ठेवल्या शिवाय अनुभव समृध्द होत नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधा!

 ------------------------------------

आमच्या वेबसाईटवर अनेक ब्लॉग प्रसिद्ध होत असतात. काही ब्लॉग मध्ये "नोंदवहीत हि माहिती लिहून ठेवा" अशी सूचना आम्ही देत असतो. तुम्ही ती माहिती लिहून ठेवता का? आपण तसे करत नसाल तर या पुढे विसरू नका. आमचे ब्लॉग कुठेच जाणार नाहीत पण आपण आपल्या कामाची माहिती लिहून ठेवली तर आपल्याला ऐन वेळेवर शोधाशोध पुरणार नाही.

------------------------------

आपल्याला नोंदवहीचे कोणते फायदे मिळतील?

या ठिकाणी सर्वच फायद्यांची नोंद करता येणार नाही इतकी त्यांची संख्या आहे. पण काही ठळक मुद्द असे आहेत.

  1. आपण चांगले नियोजन करू शकाल. केव्हा कोणते पिक घ्यायचे? कोणत्या फवारण्या करायच्या? कोणत्या सरकारी योजना उपयोगात घ्यायच्या? असे अनेक मुद्दे असतात. योग्य वेळी कृती झाली नाही तर पुढे पुन्हा तो योग यायला वेळ जातो.
  2. व्यवस्थापनाच्या नोंदी ठेवल्याने पुढल्या वेळी मागील नियोजनातील चुका सुधरवता येतात. आपल्या शेती साठी काय योग्य आहे व काय अयोग्य आहे हे लक्षात येते. 
  3. उत्पन्नाच्या नोंदी ठेवल्याने लक्ष ठरवता येते. उत्पन्न वाढवायला मदत होते. आपल्या कोणत्या मेहनतीचा जास्त परतावा येतो हे कळल्याने फायदा होतो.
  4. हिशोब निट ठेवल्याने, परतावे वेळेवर होतात. पत वाढते. कर्ज देणाऱ्या संस्था जास्त चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. 
  5. शेतात वापरली जाणारी अवजारे, औषधी, खते इ. साधनांचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होतो. अचानक कराव्या लागणाऱ्या धावपळीचे प्रमाण कमी होते

 या पूर्वी आम्ही "यशस्वी शेतकऱ्याचे व्यक्तिगत गुण" या शीर्षकाचा एक ब्लोग प्रसिद्धी केला आहे. आपण तो आवर्जून वाचवा. 

आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

---------------------