सांग सांग भोला नाथ, पैसा-बैसा येईल का?

सांग सांग भोला नाथ, पैसा-बैसा येईल का?

"सांग सांग भोला नाथ - पाउस पडेल का?" हे शब्द ऐकले कि मनातल्या मनात आपण या गाण्याचा ठेका धरायला लागतो. लहानपणी ऐकलेले हे गाणे किती छान आहे! शाळेभोवती तळे साठावे व शाळेला सुट्टी मिळावी, म्हणून पाउस यावा अश्या आशयाचे हे गाणे लहान मुलांना फार आवडते. 

पण पावसाची वाट फक्त लहान मुलेच बघतात का? शेतकरी - व्यापारी - नोकरदार - राजकारणी इतकेच काय मंत्री-संत्री देखील पाउस चांगला व्हावा अशी आस लावून बसलेले असतात. 

पाऊस चांगला होईल एव्हडी जनभावना "बाजारात चमक" घेवून येते. पाउस चांगला होईल असा नुसता विश्वास जाणवला तरी शेतकरीदादा "गाठीला" बांधून ठेवलेला "पैसा" खर्च करायला सुरवात करतो. लग्नसमारंभ, घरखरेदी, वस्तूंची खरेदी सुरु होते. गुतंवणूकदार देखील "शेअर मार्केट" मध्ये "खत-कीटकनाशक-ठिबक-ट्रॅक्टर" अशा कंपन्याचे शेअर खरेदी करतात. पाउस चांगला होणार एव्हडी बातमी "लाखो-करोडची उलाढाल करायला पुरेशी असते". विविध पद्धतीने आपण हवामानाचा आणि पावसाचा वेध घेत असतो. 

विशीष्ट प्रकारचे कीडे किंवा पक्षी दिसले किंवा एप्रिल-मे मध्ये जास्त उष्णता असलीकि चांगल्या पावसाचे अनुमान केले जाते. सरकारी वेधशाळा, व्यावसायिक वेधशाळा, परंपरागत भॆडवळ गावात होणारी घटमांडणी यांचा अंदाज दरवर्षी पेपर ची हेडलाईन घेतो. तरीही आजपर्यंत विश्वास ठेवावा इतकि अचूकता कुणाकडेहि नाही. होम हवन करून पाउस पडेल असे सांगणारे ९० टक्के वेळेला तोंडघशी पडतात असे असूनही ते आपल्याला स्वप्न दाखवून स्वत:चा फायदा करूनच घेत असतात! हे सर्व इथे थांबत नाही मल्हार राग गायल्याने पाउस पडतो असे काही गायक म्हणतात. यांना एखाद्या पहाडावर बसवून - हवी ती व्यवस्था करून - मन लावून मल्हार राग गायला काय हरकत आहे? नदी-नाले-धरणे-विहिरी भरून तुडुंब झाल्याशिवाय गाणे बंद करायचेच नाही!

पावसाच्या लहरीपणाचा सगळ्यात जास्त त्रास शेतकरी बांधवांना होतो. जरी हवामान खात्याने ११० टक्के पाउस सांगितला तरी आपल्या शिवारात तो किती पडेल? अतिवृष्टी होऊन ४०० पट पडेल कि नेमका आपल्या भागात २-५ टक्केच पडेल? अचानक गारपीट होईल कि झडी लागून राहील. काही काही सांगताच येत नाही मुळात.

मग पावसाबद्दल आश्वस्थ असायचा मार्ग काय? पावसाच्या बाबतीत आपण नेहमीच "आग रामेश्वरी - बंब सोमेश्वरी" करत आलोय. दऱ्या-डोंगरात पडणार पावसाच पाणी, चक्क शेतात पडणार पाणी आपण ओघळात वाहू देतो. दूर धरणात साठवतो. मग त्याला पाटाने फिरवतो. शेतात सुद्धा मोकळेच पाणी देतो (ठिबक चे प्रमाण अजूनही कमीच आहे). या सर्व प्रक्रियेत भरपूर पाणी वायाच जाते! पावसाचे पाणी पडले तिथेच मुरवले तर हा सगळा फेरा वाचवला जावू शकतो. म्हणून प्रत्येक क्षेत्रात पावसाच्या पाण्याचा साठा हावरटपणे करायला हवा. पावसाचे पाणी पडले तिथेच अडवून जिरवायला हवे. पाणी वापरते वेळी ते योग्य वेळी व ठिबक पद्धतीनेच द्यायला हवे. एव्ह्द्याने भागणार नाही. पाणी उपलब्ध असणे हि फक्त एक सुरवात आहे. या पाण्यचे रुपांतर पैशात कसे करणार? 

उपलब्ध पाण्याचे रुपांतर पैशात होताना कालबद्ध पद्धतीने होते. उदा. केळी लावली तर वर्ष लागेल, मेथी लावली तर दीड महिन्यात पैसा हाती येईल! तुमच्याकडचे संपूर्ण शेत तुम्ही केळीच लावली तर पैसा हाती यायला वर्ष लागेल. जर दुर्दैवाने याच कालावधीत गारपीट झाली तर तोपर्यंत झालेला खर्च वाया जाईल व सुदैवाने पिक चांगले झाले तर भरपूर पैसा हाती लागेल. फक्त मेथी लावली तरी काही वेळा तिला बाजारभाव मिळणार नाही. गारपीट सारखे संकट फार नुकसान करणार नाही पण पोट हातावरच राहील. बक्कळ पैसा येणारच नाही. आता मुद्दा हा आहे कि पाण्याचे रुपांतर पैशात होतांना "काळाच्या" गुर्मीवर कसा विजय मिळवणार? त्यासाठी तुम्हाला टप्या-टप्यात पैसा गोळा करावा लागेल.

शेतीतून येणारा पैसा जेव्हा विविध प्रकारे येईल तेव्हाच फक्त उपलब्ध पाण्याचे रुपांतर पैशात होऊ शकेल. विविध भाजीपाला, दुध-दुभती, मास, अंडी, हंगामी फळे, व्यापारी पिके असे सर्व बाजूने प्रयत्न करावे लागतील. अर्थात यात थोडी बौद्धिक-मानसिक-शारीरिक उर्जेची गरज पडेल. तुमच्या मनाची यासाठी तयारी असायला हवी, असेल तर कंबर कसून कामाला लागा. मग पैसा-बैसा येईल का हे भोलेनाथाला विचारायची गरज नाही. तुमचे प्रयत्न पाहून तोच पाठवून देईल "लक्ष्मीला तुमच्या घरी - पैसा-बैसा घेवून!." अर्थात कमीत कमी तीन वर्षाचे नियोजन करावे लागेल.

Back to blog