Call 9923974222 for dealership.

नव्या सैतानी किडीशी कसे लढाल?

मित्रहो, जेव्हापासून आपण शेती करतोय नियमितपणे नवनवीन आवाहनांचा सामना करतोय. काही आवाहनांना आपण एकतर पूर्णपणे नाहीसे केले तर काही आवाहनांची तीव्रता आपण सहन होऊ शकेल इतकी कमी केली. आजही आपण यशस्वीपणे शेती करतोय या पेक्षा मोठा पुरावातो काय?

आता असेच एक आवाहन/संकट आपल्या समोर येवून ठाकलय. संकट नवीन असल्याने सर्व शेतकरी बांधव जागृत नसतील त्यामुळे  पुढील काही काळात या संकटाची व्याप्ती अनपेक्षितपणे वाढेल असे तज्ञांना वाटते आहे. या संकटाचे नाव आहे "अमेरिकन लष्करी अळी". या अळीचे जैविक नाव स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा असून बोंडअळी ची हि चुलत बहिण आहे असे म्हणायला हरकत नाही!

प्रत्येक किडीचे असे काही वैशिट्य असतात जे तिला सफल बनवतात. जर आपण या विशिठ्यावर मात करू शकलो तर आपण त्या किडीचे नियंत्रण करू शकतो. अमेरिकन लष्करी अळीची दोन अशी वैशिट्य आहेत जे तिला अतिशय घातक बनवतात

पसरण्याची क्षमता: या किडीचे पतंग (प्रौढ नर व मादा) एका रात्रीत १०० ते १२५ किमी दूरपर्यंत उडू शकतात. अर्थात हि कीड जिथे असेल तिथून एका रात्रीत १०० किमी च्या परिघात कुठेही पोहोचू शकते.

प्रजनन क्षमता: हि कीड जितक्या वेगाने उडू शकते तितक्याच वेगाने प्रजनन देखील करू शकते. इतर सर्व किडी ज्या प्रमाणे अचानकच शेतात पसरलेल्या दिसू लागतात तसेच या किडीच्या बाबतीत होऊ शकते कारण प्रत्येक मादी २००० पर्यंत अंडी देवू शकते.  

किडीच्या या दोन वैशिठ्यावर कशी मत करायची ते मी या ब्लॉग मध्ये पुढे देणारच आहे. त्या अगोदर या किडीबद्दल एक सर्वात मोठा धोका आहे जो आपण जाणून घ्यायला हवा व प्रत्येक शेतकरी बांधवाला हा धोका माहितच असायला हवा. कुणीही याबाबत बेसावध असायला नको. हि कीड सर्वसाधारणपणे माक्यात आढळून येते असे म्हटले जाते, त्यामुळे सहजीकच ज्या शेतकरी बांधवांनी इतर पिके लावली आहेत ते गाफील रहातात. मित्रहो, हि कीड सर्वसाधारणपणे मक्यात येत असली तरी वेळ आली तर ती कीड ऊस, कापूस व अन्य १०० पिकांवर देखील ताव मारू शकते! त्यामुळे आपले पिक कोणते आहे हि बाब गौण आहे. प्रत्येक शेतकऱ्याने या किडीबद्दल जागृत, सजग असणे आवश्यक आहे.

मका क्षेत्रात किडीने केलेलं नुकसान : A, छोटी अळी; B, पोंगा खाणारी अळी व तिचा मल, ; C&D,तुरयावर ताव मारणारी अळी ; E & F, पिकाचे नुकसान

 

किडीची एक पिढी ३० ते ४० दिवसांची असते. पतंग - अंडी - अळीच्या विविध अवस्था - कोष - पुन्हा पतंग अश्या अवस्था आहेत. मादी पतंग अंडीपुंज घालते. त्यातून येणारी खादाड अळी १४ ते ३० दिवसात सहा अवस्था पूर्ण करते. शेवटच्या अवस्थेत अळीच्या डोक्यावर इंग्रजी L आकाराची खूण असते तर शेपटीकडे वरच्या पृष्ठभागावर चार काळे ठिपक्यांचा चौकोन दिसतो. हि अळी जमिनीमध्ये ८ ते १० दिवसासाठी कोषावस्थेत जाते. त्यातून बाहेर येणारे पतंग ७-८ दिवस जगतात. ते काटक असतात. उडून लांबपर्यंत जातात, मिलन करतात, अंडी घालतात व मरतात.

किडीच्या विविध अवस्था. A & B, अंडीपुंज ; C-F, अळीच्या अवस्था; H, I प्रौढ नर; J, K प्रौढ मादा . फोटो श्रेय: अंकिता गुप्ता

इतर किडी प्रमाणे मादीने अंडी दिल्यावर काही दिवसात त्यातून अळी बाहेर येते. हि भुकेली व अधाशी अळी सुरवातीला कोवळ्या पानांवर ताव मारते. सुरवातीला फक्त पृष्ठभाग खरवडते पण नंतर तिची भूक अजून वाढते. थोडी मोठी झाल्यावर ती पानावर छिद्रे पाडू लागते. पानाच्या कडे पासून शिरेकडे पाने खाते. पानाच्या फक्त शिराच शिल्लक रहातात. पोन्ग्यात प्रादुर्भाव झाला असेल तर पान उघडल्यावर त्यावर रांगोळी प्रमाणे एका रेषेत भोके पडलेली दिसतात. 


या किडीची भूक इतकी जास्त असते कि जर एका अळीच्या संपर्कात स्वजातीय दुसरी अळी आली तर बलाढ्य अळी कमजोर अळीला खावून टाकते त्यामुळे एका झाडावर/तोट्यावर आपल्याला फक्त एक अळी दिसली तर धोका कमी आहे असे समजू नका!

 --------------------------------

-------------------------------

 या किडीच्या वैशिठ्यांवर कशी मत करायची हे मी इथे आपणाला सांगणार आहे. 

सर्व प्रथम या किडीबद्दल जितकी चांगली जनजागृती होईल तितकेच तिचे नियंत्रण शक्य होईल. त्यामुळे आपण हा ब्लॉग लगेच शेअर करावा जेणे करून अधिकाअधिक शेतकरी बांधवापर्यत पोहोचणे शक्य होईल.

जर आपल्या शिवारात मक्याचे सलग क्षेत्र असेल तर खंड पडावा, गवत वर्गीयपिके  सोडून इतर पिके घ्यावी. बांधावर अनावश्यक गवत ठेवू नये.

आपल्या शेत परिसरात हि कीड आली आहे का हे  जाणून घेण्यासाठी मक्या हा कामगंध सापळा शेतात एकरी ५-८ या प्रमाणात लावावा. मका, कापूस व उस हि पिके शेतात उभे असतील तर कामगंध सापळा लावायला उगाच टाळाटाळ करू नये.

या किडीचे चे पतंग रात्रीच्या वेळी कार्यरत असतात त्यामुळे आपल्या दृषित सहजपणे सापडणार नाहीत. हा कामगंध सापळा किडीच्या नराला आकर्षून घेवून अडकवून ठेवतो त्यामुळे दिवसा फेरफटका मारल्यावर आपल्याला किडीचे पतंग अडकलेले दिसून पडतील व कीड आली आहे हे कळेल. शेतात फिरून आपण किडीने पाने खाल्ली आहे का हे पुढील ७-८ दिवस नियमित बघायला हवे व आपणाला पानांवर खुणा आढळून आल्यास कीड नियंत्रणा साठी क्मोबो कीटकनाशक प्रकर्षाने वापरावे.

या किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथाॅक्झाम (१२.६ टक्के) + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के) झेड सी (सीजेंटा चे अलीका) हे कोम्बो कीट नाशक ४ मिली प्रती १५ लिटर या दराने शिफारस करण्यात आलेले आहे. 

 त्या व्यतिरिक्त खाली दिलेली कीटकनाशके देखील आपण वापरू शकता.

   • लॅबडा-सायहॅलोथ्रीन (५ ई सी) १५ मि.लि. प्रति १५ लिटर
   • क्लोरॲन्ट्रानिलीप्लोर (१८.५ टक्के एस.सी.) ४.५ मिली प्रती १५ लिटर
   • नोमुरिया रिलेयी (जैविक कीटकनाशक) ६० ग्रॅम प्रति १५ लिटर
  --------------------------------
  हा ब्लॉग फेसबुकवर शेअर करायला इथे क्लिक करा!
  ------------------------------
  संदर्भ
  • भा. कृ. अनु. प. राष्ट्रीय कृषीकीटक कोष केंद्र
  • केंद्रीय कीटकनाशक बोर्ड
  • एग्रोवन

  Leave a comment

  Name and Mobile number .
  .
  Message with Address, District & Pincode .

  Please note, comments must be approved before they are published