गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि मनाचा संकल्प
सर्व शेतकरी बांधवाना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! मराठी नव वर्षाचे हार्दिक अभिनंदन. नवीन वर्षाचा संकल्प करायची पद्धत शेतकरी बांधवात फारशी रुजलेली नाही. तुम्ही म्हणाल हे शहरी पोरा-सोरांची कामे आहेत. ते संकल्प धरतात काय आणि तोडतात काय!
वरचा फोटो पाहून काय वाटतय?
मग करताय ना संकल्प? हो शेतकरी मित्रहो आता आपण संकल्प करायलाच हवा.
कुठला संकल्प करणार?
- नवीन पिकाची माहिती मिळवायची
- शेताच्या एका कोपऱ्यात प्रायोगिक तत्वावर शेडनेट मध्ये शिमला मिर्ची लावायची
- बाईक ऐवजी ट्रॅक्टर घ्यायच
- तंबाखू-गुटखा सोडून वाचलेल्या पैशात "आईच्या" डोळ्याचे ऑपरेशन करायचे
- दारुड्या मित्रांचा साथ सोडून, पत्नी व मुलांना वेळ द्यायचा
- नियमित हिशोब लिहायचा
- शेतीची कामे नोंदवहीत लिहायची
- शेतीचे काही उत्पन्न व्यापाऱ्याला न देता स्वत: विकायचं
असे अनेक विषय असू शकतात. पण नुसत संकल्प करून काय होणार?
आपला संकल्प अढळ-अतूट असायला हवा. पूर्णत्वास जाणारा हवा! अभिमानानं बाळगता यायला हवा!!
शिवाजी महाराजांच्या संकल्पासारखा "अभेद्य" असायला हवा.
तुम्हाला शिवाजी महाराजांसारखा "संकल्प" करायचा असेल तर तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट करा.
स्वत:शी खरे बोला!
समजा तुम्ही दारू सोडायचा संकल्प करणार असाल तर स्वत:ला विचारा..
- मला दारू चढते का?
- दारू पिल्यावर माझा तोल सुटतो का?
- दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माझे डोके दुखते का?
- माझ्या सवयी मुळे चांगली माणसे मला टाळतात का?
- आई-वडिलांना माझ्या व्यसनाचे दुखः आहे का?
- दारू सोडून मी काय काय साध्य करणार आहे? याची यादी बनवा
शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा संकल्प सोडला तेव्हा त्यांनी अनेक चटके सहन केले होते. मातेचे दुख:, मावळचा ऱ्हास, सुल्तानी त्रास त्यांनी बघितला होता. सन्मानाने जगायचे असेल तर "स्वराज्य" निर्माण करावेच लागेल, हा एकच पर्याय आहे याची त्यांना जाणीव होती. या जाणीवेतून त्यांनी संकल्प केला आणि पूर्णत्वास देखील नेला!
जाणीवेतून केलेला संकल्प अटळ असतो. तुमचा संकल्प काहीही असो, तो पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी जाणीवा जागृत कराव्या लागतील. चला तर मग लागा कामाला!