शेतकरीदादा व्हा सवयीचे गुलाम!

शेतकरीदादा व्हा सवयीचे गुलाम!

शेतकरी मित्रहो, आपण सर्व सवईचे गुलाम आहोत. हो अगदी मी देखील सवईचा गुलाम आहे. सुखी जीवनाचा एकच फॉर्म्युला आहे "सवयीचे गुलाम व्हा"!

रोहिदास एका बागायतदार शेतकऱ्याचा मुलगा आहे. तीन बहिणींची लग्ने झाल्यावर रोहिदासचे देखील लग्न झाले. दीड वर्षात रोदिहास ला एक गोड "मुलगी" झाली. त्याचा संसार सुरु आहे. दुर्दैव हेच कि त्याचा संसार एखाद्या लोटगाडीसारखा सुरु आहे. शेतीत सातत्याने होणारे नुकसान, वडलांचे म्हातारपणीचे आजारपण, सासू-सुनांची भांडणे व रोहिदासचे अतृप्त मन यामुळे सातत्याने घोर सुरु आहे.

रोहिदासच्या तिघी बहिणींनी माहेराकडे पाठ फिरवली आहे. तिघींच्या घरी शेती असली तरी नवरे नोकरी करणारे आहेत. आईवडिलाबद्दल तिघींच्या मनात प्रेम असले तरी रोहिदास बद्दल त्यांच्या मनात आकस आहे. त्या माहेरी आल्या तरी सकाळी येवून संध्याकाळी निघून जातात. रोहिदास आपल्या घरी यावा असे कुणालाही वाटत नाही. "मुलांचा मामा" इतकेही कौतुक रोहिदास चे होत नाही.

आपल्या बहिणी व बहिणींचे नवरे शिष्ट आहेत असे रोहिदास ला वाटते. थोरल्या बहिणीच्या घरी गेला असता त्याच्या मोठ्या पाहुण्यांनी तर त्याला काठीने बदडून घराबाहेर काढले. तो हा अपमान विसरला असला तरीआता त्यांच्याशी फारसे संबंध ठेवत नाही. दुसरी बहिण दूर रहाते तिकडे जायचा प्रश्न नाही. तिचा नवरा देखील अधूनमधून रोहिदासवर "तोंडसुख" घेत असतो. धाकटी बहिण सासू सासऱ्या सोबत रहाते. तिचा नवरा नोकरीनिमित्ताने दुसऱ्या शहरात रहातो. सासुरवाशिणीकडे जायचा प्रश्नच येत नाही. धाकट्या बहिणीच्या नवऱ्या कडे शहरात भेट घ्यायला रोहिदास एक-दोनदा गेला पण पाहुण्यांनी फार रस दाखवला नाही.

मित्रहो, रोहिदास शेतकरी आहे म्हणून त्याची हि अवस्था झाली आहे का? तो शेतकरी आहे म्हणून बहिणींनी त्याच्या कडे पाठ फिरवली आहे का? असे अजिबात नाहीये. रोहिदास एक व्यसनी माणूस आहे. त्याला तंबाखू, सिगरेट व दारू शिवाय चैन पडत नाही. हाती थोडे पैसे आले कि तो "तीनपत्ती" खेळतो. गावातील वेश्यांकडे त्याचे जाणे-येणे आहे. सिनेमात दाखवतात तश्या "डान्सबार" चे त्याला इतके आकर्षण आहे कि त्यासाठी तो पैसे जमवतो आहे!  आजपर्यंत अनेकवेळेला इतरांचे जीवन त्याने नकोसे केले आहे. स्वत:च्या घरात चोरी करणे, परक्याकडून व्याजाने कर्ज घेणे, गायब होणे, आत्महत्येच्या धमक्या देणे, हातपाय लटलटण्याचे नाटक करणे, परस्पर जमिनीचा व्यवाहार करायचा प्रयत्न करणे असे एका पेक्षा एक किस्से आहेत.त्याच्या चुकीच्या सवयींना कंटाळून सर्व नातेवाईक त्याला टाळू लागली आहेत.

रोहिदासच्या वडलांनी, शालिग्रामरावांनी, सुरवात केली तेव्हा त्यांच्याकडे इतकी शेती नव्हती. होत्या तेव्हढ्या शेतीच्या जोरावर त्यांनी तिघी मुलींची लग्न लावून दिलीत, स्वत:चे आईवडील शेवटपर्यंत प्रेमाने सांभाळले. भाऊ-बहिणींकडील नातीगोती सांभाळली.  स्वत:चे पक्के घर केले, नवीन शेती जोडली, विहिरी खणल्या, तळे केले, फळझाडांचे बगीचे तयार केलेत. 

हे सर्व अगदी सहजा सहजी झाले का? त्यांच्या काळात देखील त्यांच्या एकदोन मित्रांनी आत्महत्या केल्यात. पाण्याच्या-विजेच्या फार सोयी नेव्ह्त्या. रस्ते चांगले नव्हते, यांत्रिकीकरण नव्हते, खूप राबावे लागे. मजुरासोबत झुकून ते काम करत. त्यांचे नियोजन चांगले होते. त्यांनी व्यसने दूर ठेवली होती. स्त्रीलोलुपता त्यांच्या मनात त्यांनी जाणीवपूर्वक येवूच दिली नाही. चांगले स्वीकारून वाईटाचा त्यात करणे हा त्यांचा शिरस्ता होता. आता त्यांचे वय झाल्याने त्यांनी अंथरूण धरले आहे. आपल्या पत्नीने मुलाचे अतिलाड केले एव्हडीच तक्रार ते करतात.  

रोहिदासच्या घरातील प्रत्येक व्यक्ती "सवयींचा गुलाम आहे". फरक इतकाच आहे कि रोहिदास "वाईट" सवयींचा गुलाम आहे तर त्याचे वडील "चांगल्या" सवयींचे!.

रोहिदासवर त्याच्या आईची अवास्तव माया हि देखील एक "सवयच" आहे. मुलगा हवा म्हणून तिने अहट्टास केला. तीन मुलींच्या पाठीवर मुलगा जन्मला तेव्हा तिला अपार आनंद झाला. त्याच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक झाले. त्याच्या चुका झाकून ठेवायच्या असा तिचा शिरस्ता होता. शालिग्रामरावांनी खुपदा तिला समजावून सांगितले पण तिने रोहिदासला सदैव पदराखाली ठेवले.व्यसनाधीनता चुकीची आहे हे थोडीना समजावून सांगावे लागते? प्रत्येक व्यसनाधीन माणसाला त्याच्या चुकांची जाणीव असते, जेव्हा इतर मंडळी त्याला मान्यता देतात तेव्हा "आपल्या चुकांना झिडकारून टाकायची त्याची शक्ती गळून पडते". तो चुकांमागे चुका करू लागतो. चुकीच्या सवयींचा गुलाम बनतो.  ज्या आईने आजपर्यंत त्याच्या चुकांवर पांघरूण घातले; तिनेच त्या चुका उघड्या पडल्या तर काहीतरी चांगले होऊ शकते. तसे केल्याने त्याला "व्यसन" टाकून द्यायची प्रेरणा मिळू शकते. मुलाच्या चुकांवर पघरूण घालायची "वाईट सवय" आईने सोडायला हवी, नाहीतर..."रोहिदासच्या कथेचा शेवट चांगला होईल असे वाटत नाही". त्याच्या चुकांची शिक्षा त्याच्या पत्नी व मुलीला भोगाव्या लागतील का? हा प्रश्न मनाला "चटका लावणारा आहे".

मित्रहो आपणदेखील सवयीचे गुलाम नक्की असाल. हरकत नाही. फक्त एव्हढेच निक्षून घ्या कि आपल्या सवयी चांगल्या असायला हव्यात! 

यशस्वी शेतकऱ्याचे व्यक्तिगत गुण हा लेख वाचायला विसरू नका, त्यासाठी इथे क्लिक करा

Back to blog