हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती
प्रत्येक चांगला शेतकरी पशुपालन करतोच कारण दुध उत्पादन हा एक उत्कृष्ठ जोडधंदा आहे. या उद्योगात चाऱ्याची गरज मोठी असते. जनावरास विविध प्रकारचा चारा खावू घातल्यास हि जनावरे अधिक फायदेशीर ठरतात.
पाण्याची मुबलकता व जमीन असेल तर बहुतेक पशुपालक चारा पिके घेतात. काही शेतकरी अझोलाचे देखील उत्पादन घेतात तर काही शेतकरी मुरघास बनवून ठेवतात. असाच एक प्रकार म्हणजे हायड्रोपोनिक्स चारा. हायड्रोपोनिक्स चारा कमी जागेत, कमी पाण्यात तयार होतो व अतिशय पोषक समजला जातो.
तुम्ही कदाचित दुध उत्पादक नसाल. असे असले तरीही "हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती" हि तुमच्यासाठी एक संधीच आहे! कारण प्रत्येक दुध उत्पादक हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती करेलच असे नाही. पण असा चारा योग्य दरात मिळाला तर ते नक्की खरेदी करतील यात शंका नाही. तुमच्या भोवती असे ग्राहक आहेत का याचा तुम्ही अवश्य शोध घ्या.
हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे नक्की काय?
मृदाविरहीत पद्धतीने वनस्पती वाढवणे यालाच हायड्रोपोनिक्स असे म्हटले जाते. जगातील काही भागात तरंगत्या छोटेखानी बेटांवर थोड्या प्रमाणात शेती केली जात असे. पुढे शास्त्रीय प्रयोग करण्यासाठी या तंत्राचा उपयोग होऊ लागला. शेतीयोग्य जमीन उपलब्ध नसलेल्या भागात अल्पकाळात वाढणारी पिके घेण्यासाठी या तंत्राचा उपयोग होऊ लागला. या तंत्रानुसार पाण्यात काही खते विरघळून त्याला वहाते केले जाते व त्या वहात्या पाण्यावर इतर कृत्रिम आधार वापरून पालकासारखी पिके उगवली जातात.
याच तंत्रात काही बदल करून चारा निर्मिती देखील करता येते. चारा निर्मितीसाठी प्लास्टिक सच्छिद्र ट्रे मध्ये अगोदरच अंकुरलेले गहू, मका, बाजरी टाकून त्यावर तुषार सिंचन व टायमर च्या मदतीने पाण्याच्या एक प्रवाह तयार केला जातो. प्लास्टिकपाईप/स्क्वेअरपाईप चे आधार वापरून तयार केलेल्या शेल्फवर हि यंत्रणा बसवली जाते. बंदिस्त वातावरणात ३०-३५ डिग्री सेल्सिअस तापमान व ८० टक्के ह्युमिडीटी राखली कि सात ते आठ दिवसात एक किलो बियाण्यांपासून ७-८ किलो चारा लीलया तयार होतो. या काळात बियाण्यातील अन्नपदार्थांचा वापर होत असल्याने बाहेरून कोणतेही खत टाकायची गरज नसते. यातून बाहेर पडणारे पाणी इतर ठिकाणी वापरले जावू शकते जसे पालेभाजीचा वाफा. फारसे पाणी वाया जातच नाही.
----------------------------
मित्रहो आपण कोणतेही उत्पादन घ्या पण त्याच्या मार्केटिंगचा विचार अगोदर करा!
पाटील बायोटेक यामध्ये आपली मदत करू शकते.
आपण यात विशेष सहकार्य करू शकता.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
-------------------------
गायी, म्हशी, घोडे, बकऱ्या, कोंबड्या, वराह, ससे या प्राण्यांना हा चारा उपयोगी पडतो. कमी खर्चात, कमी जागेत, कमी वेळेत तयार होणारा हा चारा ८०% पाचक असून चांगलाच पोषक देखील आहे. यात निर्माण होणारी चाऱ्याची लादी पूर्णपणे खाण्यायोग्य असल्याने कुठलाही भाग वाया जात नाही. हा चारा शुद्ध, स्वच्छ तर असतोच शिवाय यात कुठलीही भेसळ नसते.
विदेशात थंड वातावरण असल्याने त्यांना वातावरण निर्मितीसाठी खर्च करावा लागतो पण आपल्याकडे हा खर्च अजीबत करावा लागत नाही.
साधारण पणे एका ट्रे मध्ये ७ किलो चारा तयार होत असेल तर ३ ट्रे मध्ये (२१ किलो) एक गाय/म्हैस, ६ बकऱ्या, १६२ कोंबड्या, ३० ससे यांचे एका दिवसाचे पोषण होते.
आपल्याला सहज लक्षात यावे म्हणून इथे विविध फोटो/व्हिडीओ दाखवत आहे.
मजबूत ट्रे वापरल्याने तो ४ ते ५ वर्ष नक्की टिकेल.
