वेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग पाचवा)

पाटील बायोटेक प्रा. ली. हि कंपनी शेतकरी बांधवांच्या सेवेत सदैव अग्रेसर आहे. जर शेतकऱ्यास सुखी व्हायचे असेल तर त्याने "स्मार्ट" होणे गरजेचे आहे, या विचारधारेवर आधारित लेखमाला "वेळ आली आहे____ शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची" सुरु करण्यात आली. या लेखांद्वारे आपण अनेक अश्या क्लुपत्यांचा उहापोह करीत आहोत ज्या सर्वश्रुत आहेत पण उपयोगात आणल्या जात नाहीत. हे लेख तुम्हाला या क्लुप्त्या वापरायला सुचवतात.

आता पर्यंतच्या चार भागात आपण कामाचे वर्गीकरण कसे करावे? ध्येय्य कसे ठरवावे? महत्वाचे काम प्रामुख्याने कसे करावे? वाया जाणारा वेळ कसा उपयोगात आणावा? या विषयी माहिती घेतली. आता मूळ मुद्दा हा आहे कि जर तुम्हाला फक्त नेमकी व ठराविकच कामात प्रत्यक्ष सहभागी व्हायचे असेल तर उर्वरित महत्वाची व कमी महत्वाची कामे कोण करणार?

कामे इतरांवर सोपवायला शिका!

अनेक शेतकरी बांधवांसाठी वेळेचे नियोजन मोठे जिकरीचे असते कारण प्रत्येक काम "छोटे-मोठे-महत्वाचे-कमी महत्वाचे" त्याला एकट्यालाच करायचे असते. मुले शिकलेली असतात त्यांना शेतीतले काही कळतच नाही. पत्नीला व्यवाहार समजत नाही, सालदार सांगकाम्या असतो, मजुरांच्या मागे लगल्याशिवाय काम पुढे सरकत नाही, लग्न-मुंज-मरणात गेले नाही तर नातेवाईक आपल्याला ओळख देत नाहीत.

मित्रहो, रतन टाटा किती मोठे उद्योजक आहेत! आजच्या क्षणाला त्यांच्या कडे किती नोकर असतील? समजा टाटांनी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगाराच्या चेकवर स्वत:च साक्षरी करायचे असे ठरवले तर महिन्याकाठी त्यांच्याकडे झोपायला सुद्धा वेळ शिल्लक रहाणार नाही! 

आता तुम्ही म्हणाल, त्यांचा उद्योग मोठा आहे शेती शी त्याची तुलना कशी कराल? कुठेतरी सुरुवात करणे गरजेचे आहे. आपल्याभोवती जी कोणी माणसे आहेत त्यांची बुद्धी, क्षमता व निष्ठा यांची परख करणे व त्यानुसार त्यांना काही काम सोपवणे गरजेचे आहे. एकदा काम सोपवले कि स्वत:च्या निर्णयावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे

समजा तुम्ही नेहमी स्वत:च्या वाहनाने प्रवास करत असाल व एखाद्या वेळी अचानक बसने प्रवास करायची वेळ आली कि तुम्ही ड्रायव्हर च्या बाजूला बसून त्याला टोकु शकाल का? तुम्ही तसे केले तर तो तुम्हाला गाडी खाली उतरवेल!

समजा तुमच्या मुलाला शेतीतले काही समजत नाही असे तुमचे मत असेल तर त्याला अर्ध्या एकराचा एक तुकडा द्या व त्या तुकड्यातून तो किती कमाई करू शकतो ते बघा! पत्नीला व्यवहार समजत नाही असे वाटत असेल तर पुढच्या महिन्यात तिला घरातील संपूर्ण व्यवहारासाठी एक रक्कम द्या व हिशोब द्यावा लागेल असे ठासून सांगा. सालदार सांगकाम्या असेल तर रोज शेतातून निघण्यापूर्वी उद्याची कामे त्याला नीट समजावून सांगा व दुसऱ्या दिवसी संध्याकाळी न चुकता आढावा घ्या. सरावाने व त्याच्या क्षमते नुसार तुम्ही त्याला आठवडेभराची कामे सांगू शकाल. मजुरांना एक लक्ष्य ठरवून दिले तर, उत्तम काम करणाऱ्या मजुराला बक्षीस देवून गौरान्वित केले तर? 

आपल्या भोवतालच्या लोकांच्या क्षमतांचा विकास हि आपली जबाबदारी असते. एखाद्या वेळी गरजेपोटी किंवा बुद्धीच्या कमजोरी मुळे कुणी चुकीचे वागले तरी त्यावर तसे "लेबल" लावणे चुकीचे आहे. कुणावर असे एखादे लेबल लावणे म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. 

मित्रहो, जो दुसऱ्यावर विसंबला तो संपला अशी एक म्हण आहे. इतरांकडून कामे करून घेतांना त्याचा आढावा घेणे हे तुमचे काम आहे हे विसरून जावू नका. तुम्ही इतरांवर सोपवलेल्या कामांची नोंद ठेवा व विशिष्ठ कालावधी नंतर प्रगतीचा आढावा घ्या. आढावा घेते वेळी आपण त्याच्यात आत्मविश्वास व निष्ठा निर्माण करतो आहे कि नाही हे स्वत: लक्षात घ्या. क्षणिक संतापाच्या भरात त्याच्या चुकांवर आरडाओरडा करून घडी विस्कळीत होऊ देवू नका.