Call 9923974222 for dealership.

आर्थिक कुसंस्कार व स्व-घृणेतून होणारा आत्मघात

शामराव माझा लंगोटी यार होता, सख्या भावापेक्षा जास्त जवळचा. एकदा अचानक त्याचा फोन आला, "मला गरज नसती तर मी तुला पैसे मागितले नसते, मला पाच लाखाची गरज आहे." त्याला मी पहिल्यांदा पैसे देत नव्हतो. या पूर्वीही त्याने मदत मागितली  - मी दिली. त्याने परतफेड देखील केली. पण त्याच्या या फोनने मला अस्वस्थ केले. यापूर्वी त्याचा आवाज कधी कापरा झाला नव्हता. बोलण्यात अपराधी भावना नव्हती. त्याचा माझ्याकडे हक्क होता व त्या हक्काने तो मदत घेत असे! मी त्याला काही नेहमीचे प्रश्न विचारले व पैसे मी तुझ्या घरी घेवून येईल असे आश्वासन दिले.

ठरल्याप्रमाणे मी एका सायकाळी त्याच्याघरी पैसे घेवून गेलो. त्याला ते दिल्यावर आमची चर्चा सुरु झाली. "अलिशान घर, सुंदर सजवट, नित्याचा बढेजाव चांगली गोष्ट नाही. हे सर्व विकून तू तुला परवडेल अशा घरात का रहात नाही?  हा नसता बढेजाव एक सापळा आहे. आपण उगाच नसत्या चणचणीत अडकतो." मी त्याला सुचवले. वहिनी देखील ऐकत होत्या. त्यांनी नवऱ्याचे उणे दुणे काढणे सुरु केले. शाम प्रत्युत्तर देवू लागला. हि चर्चा लवकरच एका वाईट वळणावर गेली. नवरा-बायको एक मेकाला पिंजऱ्यात उभे करू लागले. त्याच्यात चांगलाच वाद सुरु झाला. दोघांची समजूत काढता काढता माझ्या नाकी नऊ आले. "अरे तुम्ही दोघे मोठे आहात, एकमेकाला साथ द्या. तुम्हाला मुले आहेत." त्यादिवशी हे प्रकरण निस्तरून मी शामरावकडून निघालो.

राजन आमच्या दोघांचा (शामचा आणि माझा) जवळचा मित्र आहे. आमच्यात काही लपत नाही. मी त्याच्याजवळ घडल्या प्रसंगाची चर्चा केली. शाम त्याच्याशी अगोदरच या विषयावर बोलला होता. मी व त्याच्या पत्नीने त्याला कोंडीत पकडल्याची त्याची भावना झाली होती. तो दुखावला होता. पांघरून पाहून पाय पसरवायचा माझा सल्लाहि त्याच्या जिव्हारी लागला होता.

 

दोन महिन्याने शामने आत्महत्या केली. नुकताच कॉलेजमध्ये दाखल झालेला त्याचा मुलगा, लग्नाच्या वयाची मुलगी अशी जबाबदारी पत्नीवर टाकून तो निघून गेला. या कुटुंबाचा पुढचा प्रवास आता खडतर होता. थोड्या दिवसांनी त्याच्या घरच्या व ऑफिसच्या कपाटात त्याच्या कर्जाची कागदे, थकलेली बिले व त्याने आत्महत्या केली त्या दिवसाची बँकेची लिलावाची नोटीस मला मिळाली. 

असे का घडले? शाम या आर्थिक दुष्टचक्रात कसा काय फसला? मित्रहो ४० ते ६५ च्या वयात आर्थिक दुष्टचक्रात फसून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नोकरी जाणे, दिवाळखोरी होणे व संपत्ती लिलावात निघण्याचे प्रमाण मोठे आहे. 

या आत्मघातकी प्रवृत्तीचे व आर्थिक स्व-पराभवाचे कारण काय आहे? आपला विवेक व तर्कबुद्धी कारणीभूत आहे का? प्रतिष्ठा जपायच्या नादात आपण हि मोठी कर्ज करून ठेवतो का? या कर्जामुळे आपल्या समोर काय संकट येवू शकते हे आपल्या लक्षात येत नाही का? असे नक्कीच नाही. तज्ञ सांगतात कि या समस्येचे मूळ आपल्या बालपणात आहे. आपल्यावर झालेले आर्थिक संस्कार याला कारणीभूत आहे. "तू आळशी आहेस, मूर्ख आहेस,तुला पैसा वापरायची अक्कल नाही, तुला पैसे कमवायची अक्कल नाही - तू पैसा फक्त घालवशील" हे विचार सातत्याने आपल्या मनात बिंबवले जातात. आपल्यात कमतरता आहे म्हणून आपण पैसा मिळवू शकत नाही, आपली लायकी नाही. पैसा नसल्याने आपल्याला प्रेम-आत्मीयता मिळणार नाही. संपत्ती-गाडी-बंगल्याशिवाय आपली काहीही किंमत नाही. नालायक माणसेच फक्त श्रीमंत बनू शकतात. असे गैरसमज मोठ्या प्रमाणात आपल्यावर आदळले जातात.

आर्थिक साक्षरता महत्वाची आहे. हि दोन पुस्तके आपल्याला हे साक्षरता देवू शकतात.
या पुस्तकांच्या वाचनातून आपल्या विचार व व्यवहार क्षमतेत वाढ होऊन फायदा होईल हे निश्चित.

पुढे जावून कमवते झाल्यावर तुमच्याजवळ दहा लाख असोत कि दहा करोड, हे ब्रेन प्रोग्रामिंग आपला पिच्छा सोडत नाही. आपण आपली किंमत स्वत:च्या संपत्ती पेक्षा जास्त धरत नाहीत. पैशाच्या मागे लागून जीवन जगायचे विसरून जाणारी माणसे पदोपदी दिसतात. आनंदाची किंमत पैशात मोजणारी माणसे खूप आहेत. 

नैनोकार घेण्याची ऐपत असणारी माणसे ब्रीझा घेतल्याशिवाय समाधानी होत नाहीत! गणपूती पुळ्याला सहलीवर गेलेली माणसे फेसबुकवर मित्र होंगकोंगला गेली आहेत हे पाहून दुखी होतात! 

शामच्या घरचा त्या दिवसाचा प्रसंग आजही मला आठवतो आहे. आम्ही तिघी आमच्यावरील "आर्थिक व स्व-घृणेच्या कुसंस्काराने" बाधित होतो.

शामला त्याच्या आर्थिक स्थितीची लाज वाटत होती, आपण मित्रा कडून मदत घेत आहोत याचा न्यूनगंड त्याला वाटत होता. मित्राची मदत हे एक उत्तम लक्षण समजून त्याने आर्थिक व्यवहारात सुधारणा मनावर घेणे आवश्यक होते.

त्याच्या बद्दल प्रेम, आदर व विश्वास दाखवून त्याचे अपराधीपणाचे ओझे हलके करण्या ऐवजी, मी त्याला उपदेश देत बसलो हि माझी मोठी चूक होती. खरेतर फक्त दैवामुळे माझी आर्थिक स्थिती त्यावेळी चांगली होती. माझ्या दिवाळखोरीतून स्वकीयांनी मला बाहेर काढले आहे. हे मी विसरून गेलो होतो. 

संसाराला दोन चाके असतात हे विसरून वाहिनीदेखील कुठलाही दोष स्वत:कडे घ्यायला तयार नव्हत्या. तू कंगाल झाला तरी मी सदैव तुझ्या सोबत राहील, तुला सक्षम बनवण्यासाठी प्रयत्नशील राहील हा विश्वास त्या शामला देवू शकल्या असत्या.

आपले आर्थिक संस्कार सुधारणे फार महत्वाचे आहे. पैसा गौण आहे, व्यवहार महत्वाचा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे हि बाब मला इथे अधोरेखित करावीशी वाटते.

6 comments

 • Nice

  Dhananjay kale
 • अंथरूण पाहून पाय पसरावे हि म्हण काही खोटी नाही ?
  चांदा तालुका नेवासा जि अ. नगर
  ४१४६०६

  Kiran s jawale
 • Naics blog sir is very good

  Ram
 • Nice page

  Shivaji jeure
 • कर्ज होइल असे विनाकारण खर्च करु नये

  दादासाहेब जगन्नाथ बोडखे

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published