कांद्यासहित इतर पदार्थांचे निर्जलीकरण करून उभा करा उद्योग

निर्जलीकरण हि काही अत्याधुनिक पद्धत नाही. फार जुनी पद्धत आहे. आपले पूर्वज जेव्हा जंगलात भटके जीवन जगत तेव्हा त्यांनी निसर्गत: सुकलेले अनेक पदार्थ, फळ, कंद खाल्ले व निर्जलीकरणाचा शोध आपसूकच लागला. यातूनच पुढे पापड, शेवया, कुरडई, करोडे, बिबडी,  बोंबील, झिंगे असे निर्जलीकरण प्रक्रियेत तयार होणारे पदार्थ सर्वश्रुत झाले. एकूणच कोणत्याची खाद्य पदार्थांचे निर्जलीकरण केले कि तो पदार्थ सहज साठवून ठेवता येतो व हवा तेव्हा उपयोगात आणता येतो असे साधेसोपे हे तंत्र आहे.

निर्जलीकरण विविध प्रकारच्या भाजीपाल्यात व फळात शक्य आहे. संत्रा, स्ट्रॉबेरी, किवी, टरबूज, ब्लैकबेरी, द्राक्ष, केळी, पेरू, फणस, आंबा, अननस, लीची, लिंबू, या फळांशिवाय टोमॅटो, मिरची,कोबी, कांदा, मटारम लसून, गंगाफळ, मुळा, आले, मशरूम, वांगे, बटाटे, गाजर या भाज्यांमध्ये निर्जलीकरण करण्यात येते.

कांद्याच्या निर्जलीकरणासाठी विशीष्ट प्रकारच्या कांद्याची गरज असते. एकसमान दर्जाच्या कांद्याची गरज असणे साहजिक आहे. प्रक्रियेत सर्वप्रथम टरफले काढून टाकली जातात व १० पी. पी. एम. क्लोरीनच्या पाण्यात त्याला धुण्यात येते. या नंतर कटिंग करण्यात येते. यानंतर याचे टप्याटप्यात निर्जलीकरण करण्यात येते. यानंतर तुकड्यांच्या आकारानुसार त्याचे ग्रेडिंग होते. यानंतर आवश्यकते नुसार पुन: निर्जलीकरण करण्यात येते. तयार तुकडे वेगवेगळ्या पद्धतीने वापरण्यात येतात. ग्रेव्ही, सॉस, सूप अश्या व्यंजनात वेगवेगळ्या ग्रेडची गरज असते. शेवटच्या टप्प्यात तयार माल मेटल डिटेक्टर मधून पास करण्यात करण्यात येतो व उत्तम पद्धतीने एअर टाईट पॅकिंग करण्यात येते. तयार माल उच्च मापदंडाच्या गोडावून मध्ये कीड व आद्रतामुक्त पद्धतीने साठवला जातो.

मोठ्या निर्जलीकरण कारखान्यातील प्रोसेस फ्लो-चार्ट मध्ये कच्चामाल साठवून, फीडिंग एरीया, सोलणे, धुणे, कापणे, पाच स्तरीय निर्जलीकरण, ग्रेडिंग, तापमान संतुलन, रंगानुसार ग्रेडिंग, मेटल डिटेक्टर , मोजून पेकिंग, स्टोरेज व निर्यात असे टप्पे स्पष्टपणे दिसून येतात.

निर्जलीकरण केलेल्या कांद्याला फास्टफूड, लोणचे, मटन उत्पादन, सीफूड उत्पादन, डब्बाबंद खाद्य पदार्थ, सलाद, चटण्या, बेकरी, सॉसनिर्मिती च्या ठिकाणी मागणी असते. आय्रुवेद कंपन्यामध्ये देखील याला मागणी असते. वर सांगितल्याप्रमाणे कांद्या व्यतिरिक्त इतर अनेक कृषीमालाचे निर्जलीकरण करता येते व त्याचे टप्पे सर्वसाधारणपणे कांदा निर्जलीकरण पद्धतीप्रमाणेच असतात.  

निर्जलीकरणासाठी पूर्वापार उन्हाचा व गरम हवेच्या झोताचा उपयोग करून घेण्यात आला. अनेक शेतकरी सौर उर्जेवर चालणारी छोटे निर्जलीकरण यंत्र स्थानिक कारागीराकडून बनवून घेतात व त्याचा आपल्या शेतातील उत्पादने सुकवण्यासाठी उपयोग करतात. 

टप्याटप्यात कोथिंबीर, पुदिना, मिरची, आले व जीरा उगवून त्यांचे निर्जलीकरण करून याच्या मिश्रणातून उत्तम दर्जाचा ताकाचा मसाला बनवता येतो. अश्याच प्रकारे निर्जलीकरण केलेल्या टोमॅटो, मिरची, कांदा, लसून, कोथिंबीर यांचे मिश्रण बनवून सूपपावडर बनवता येवू शकते. कारल्याची पावडर, जाभूळ पावडर यापासून मधुमेहावरील औषधी बनवता येते. निर्जलीकरण केलेल्या हिरवी मिरची पावडर, गवतीचहा, पुदिना यांना देखील बाजारात मागणी आहे. निर्जलीकरणासाठी मोठ्या यंत्रणेची गरज नसल्याने हा उद्योग छोट्या प्रमाणात सुरु करून हळूहळू वाढवता येवू शकतो. त्यासाठी आपल्याला  एफ.एस.एस ए..आय.चा अन्न परवाना, जी.एस.टी. नंबर, उद्योग आधार व अग्निशमन विभागाचा नाहरकत दाखला यांची गरज पडते. यातली बरीचशी कागदपत्रे आजकाल घरबसल्या ऑनलाईन मिळवता येतात.  

मित्रहो हे उद्योग करते वेळी उत्पादनाचा दर्जा व चव उत्तम राखणे महत्वाचे असते. आपले उत्पादन विकण्याऐवजी ते कसे बनवले व ग्राहकाला कसे उपयोगी आहे हे आपण त्यांना कथा रुपात सांगू शकलो तर मार्केटिंग चांगले होते. ओळख-परिचय वाढवणे, सुंदर पॅकेजिंग करणे, कागदोपत्री नेटके असणे, व्यवहारी पद्धतीने वागणे, कर आणि घसार्‍यासाठी रक्कम बाजूला काढून उरलेला नफा योग्य पद्धतीने संचालित करणे या बाबींचे निक्षून पालन केले तर इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे निर्जलीकरण उद्योग आपणास मोठे यश नक्की देवू शकतो.