दुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार!

दुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार!

एक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन खिन्न होते. मी नुकत्याच अशा एका लाटेवर स्वार झालो आणि मला झालेला साक्षात्कार चिरकाल पुरून उरेल इतकि शक्ती देवून गेला.

हाती आलेले उत्त्पन्न, त्यासाठी केलेले खर्च, झालेल्या नुकसानाच अंदाज, पुढील वर्षी येवून ठेपलेल्या कार्यांच्या खर्चाचा अंदाज, नियोजित कृषी गुंतवणूक, कर्जाचे हप्ते याचा हिशोब केल्यावर बँकेत नावाला खडकू देखील शिल्लक पडणार नाही हे लक्षात आले. वर्षापूर्वी बांधलेले इमले चुलीत घालावे लागल्याने मन सुन्न झाले. मी शर्थी चे प्रयत्न केले होते पण पदरी घोर निराशा पडली. काही तरी वेगळ करावे जेणे करून शिल्लक पडेल, पण काय? काही सुचत नाही!

जीवनाच्या प्रवाहात विश्रांती आहे, थांबणे नाही. शहरात मोठे प्रदर्शन भरले होते, सौ सोबत ते बघायला गेलो. स्टॉल मागून स्टॉल मागे पडत गेले, नवीन काहीच दिसे ना. तिथलं तेच तेच पण बघून खिन्न झालो. कुठून आलो या गर्दीत!....शेवटच्या कॉर्नर ला एक माणूस सुकलेली रोपे विकत होता. “हि रोपे पाण्यात टाका रात्रभरात हिरवीगार होतील” तो म्हणाला. अश्या पद्धतीने हिरवी झालेली काही रोपे त्याने ठेवली होती. गंमत म्हणून आम्ही ती रोपटी खरेदी केली. पुढचा स्टॉल “विद्यार्थी समितीचा” होता. कॉलेज मध्ये खेडे गावाहून आलेल्या गरीब मुलांना कमी किमतीत रहाण्याची व खाण्याची सोय करणारी हि संस्था. लोक सहभागातून व शैक्षणिक मार्गाने समाज पुनर्जीवित करायचा हा मार्ग मला फार प्रशंसनीय वाटतो. तिथे खिसा थोडा रिता करून माझ्या स्वार्थी मनाला मी परोपकराचा ओलावा दिला. शेवटी निघता निघता अनोख्या पद्धतीने बनलेले फ्रुट आईसक्रिम चाखले. आईसक्रिम बनवणारा त्यात वेगवेगळी फळ, दुध, सरबते टाकून त्याला थंड करत होता.  त्यात अनेक रंग व स्वाद होते. चाखता चाखता मन सुखावले. सौने आग्रह करून मनाला अधिक प्रसन्नता दिली. एक्झीबीशन चा निरोप घेतला तेव्हा रात्रीचे साडेदहा झाले होते.

झोपण्या पूर्वी एक्झीबीशन मधून आणलेली रोपे पाण्यात ठेवली. सकाळी सौने हलवून उठवले, तिच्या हातात टवटवीत हिरवीगार झालेली रोपे होती! चेहरा विस्मयाने फुलला होता! सहज मनात विचार डोकावला “दुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुन्हा असे टवटवीत हिरवेगार झाले तर!

मी लगेच डिक्शनरी शोधली व पुनर्जीवित होणे याला इंग्रजीत काय म्हणतात ते बघितले. रीसरेक्शन! बस मग गुगल केले. माझ्या मनात जे होते ते समोर दिसू लागले.

.

यु-ट्यूब वरील सारांश असा:

येणाऱ्या काळात तापमानात बदलामुळे पृथ्वीवरील मोठ्या भूभागात रुक्षता निर्माण होत जाईल, पण लोकसंख्या वाढत असल्याने अन्नधान्य पुरवठा कमी पडू लागेल. यावर एक तोडगा म्हणजे पुनर्जीवित होणाऱ्या पिकांचा शोध लावणे. समजा केळी चा बगीचा वाढीत असतांना पाण्याचा दुष्काळ पडला तर सर्व साधारण केळी सुकून-मरून जातील. पण पुनर्जीवित होऊ शकणारे केळी चे पिक सुकले तरी ते मरणार नाही. पाच-सहा महिन्यात त्याला ओलावा मिळाला कि ते पुन्हा जसे च्या तसे हिरवे गार होईल!

वैज्ञानिकानी जेव्हा यावर अभ्यास केला तेव्हा हे लक्षात आले कि पुनर्जीवित होण्यासाठी लागणारे गुणसूत्र बहुधा प्रत्येक पिकात असतात पण पान, खोड व मुळात ते सुप्त होतात. फक्त बीज तयार होतांना ते गुणसूत्र कार्यान्वित होतात, म्हणून बी ला ओलावा मिळाला कि ती पुनर्जीवित होते. आता वैज्ञानिकांसमोर एकच आवाहन शिल्लक होते ते म्हणजे पान, खोड व मुळातील  सुप्तावस्थेतील पुनर्जीवित करणारे गुणसूत्र शुष्क वातावरणात कार्यान्वित होतील याची व्यवस्था करणे. हा अडसर देखील आता दूर झाला आहे. म्हणजे पुनर्जीवित होणारी पिके आणणे नजदीक च्या भविष्यात शक्य आहे.

Back to blog