बोंडअळीला "प्रतिबंधक्षम वाण" येईल का?

बोंडअळीला "प्रतिबंधक्षम वाण" येईल का?

१९९३ साली बीटी बियाण्याच्या चाचण्या अमेरिकेत घेण्यात आल्या व १९९५ पासून तिथे या बियाण्याचा व्यापारी उपयोग सूर झाला. १९९७ मध्ये चायनात या बियाण्याला परवानगी देण्यात आली तर भारतात याची सुरवात व्हायला २००२ साल उगवले. 

भारताने जरी थोडी उशिरा सुरवात केली असली तरी या तंत्राचा वापर करण्यात ते सर्वात पुढे राहिले. पोषक वातावरणामुळे अल्प काळात कापूस उत्पादनात आपण इतरांना मागे टाकले. २०१४ या वर्षी भारत जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश ठरला. क्षेत्रात अफाट वाढ झाली. मोठ्या प्रमाणत निर्यात होत असल्याने भरपूर भाव मिळाला. कापसाचा शेतकरी मालामाल झाला!

याच दरम्यान आपण मोठ्या प्रमाणात अपयशाची बीजे पेरलीत. एकात्मिक कीड नियंत्रणाच्या नियमाची आपण पायमल्ली केली. कापूस क्षेत्रात भरमसाठ वाढ केली, रीफ्युजी बियाण्याचा वापरच केला नाही, फरदड घेण्याकडे कल प्रचंड वाढला. यामुळे बीटी टोक्झीनला प्रतिकार करू शकणारी बोंडअळी ची जात टप्याटप्याने वाढू लागली. सुरवातीला हे लक्षात न आल्याने याप्रकारची बोंड अळी निसर्गात स्थिर झाली. मागील वर्षी याचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला. 

हा बदल पचनी न पडल्याने शेतकरी बांधव पार भामभावले त्यात यवतमाळ मधील दुर्घटना घडली. एका पाठोपाठ एक अडचणी वाढल्याने शेतकरी बांधव नकारात्मक झाले. त्याच्या मानत एक प्रश्न निर्माण झाला - 

 बोंडअळीला प्रतिबंधक्षम वाण येईल का?

प्रांजळपणे हे सांगावेसे वाटते कि असे घडणार नाही. असे का घडणार नाही व मग आपली या पुढची वाटचाल कशी असावी याबद्दल आपण टप्याटप्याने विचार करू.

प्रतिकार व प्रतिबंध हे दोन वेगळे शब्द आहेत. हातावर बांधायची घड्याळे दोन प्रकारची असतात. वाटर रेझिस्टंट व वाटर प्रूफ. हात धुते वेळी घड्याळ उतरवावे लागू नये म्हणून वाटर रेझिस्टंट  घड्याळे बाजारात आली. सर्वसाधारणपणे हीच घड्याळे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. लहान मुले किंवा पाण्यात काम करणारी माणसे यांना हि घड्याळे उपयोगी ठरत नाहीत कारण ती थोडाच काळ पाण्याचा सामना करू शकतात. हि बाब लक्षात घेवून पुढे वाटरप्रुफ घड्याळे बाजारात आली. कितीही वेळ पाण्यात ठेवली तरी ती खराब होत नाही. दुकानात हि घड्याळे पाण्याने भरलेल्या जारमध्येच ठेवलेली असतात. 

प्रतिकार व प्रतिबंध या दोन शब्दात असाच फरक आहे. प्रतिकार हा काही काळ होत असतो तर प्रतिबंध हा कायमस्वरूपी असतो. बोंडअळी ला प्रतिकारक्षम वाण विकसित झाल्यावर ते बाजारात यायला वेळ लागला तसा वेळ प्रतिबंधक्षम वाण विकसित झाल्यावरही लागेल. खरे सांगायचे तर असे कोणतेही वाण विकासाधीन असल्याचे कोणत्याहि संशोधन संस्थेने अजूनतरी सांगितलेले नाही. त्यामुळे असे कोणतेही वाण पुढील चार-पाच वर्षात येईल याची शक्यता शून्य टक्के आहे

 कापूस लागवडीचे भवितव्य काय आहे?

वस्त्रोद्योगातील वाटचाल पहाता भविष्यातहि कापसाची गरज असणार आहे हे निश्चित. इतर पिकाप्रमाणे कापसाच्या किमतीत मागणी नुसार चढ उतार होतीलच. बाजारात उपलब्ध बीटी वाण पेरूनच पुढेही लागवड होत राहील. परंतु आता ठेच लागली असल्याने बहुतेक शेतकरी बांधव एकात्मिक खत व  कीड व्यवस्थापनाकडे लक्ष देतील. बेफिक्री करण्या ऐवजी "कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकरी बांधवांचा कल असे. व्यवस्थापनातील महत्वाचे मुद्दे असे रहातील.

  • मृदेची दर्जेदार मशागत
  • विश्वसनिय बेण्याची निवड
  • दर्जेदार जलव्यवस्थापन
  • संतुलित व नियमित खत मात्रा 
  • चिकट सापळे व बोंड अळीचे सापळे लावून किडींचे निरीक्षण
  • कोम्बो कीटकनाशकांचा वापर व योग्य वेळी फवारणी
  • फरदड टाळली जाईल
  • सामुहिक स्तरावर कीड नियंत्रण

 मित्रहो,बीटी बियाणे फक्त बोंडअळी पासून संरक्षण करते व इतर किडी जसे फुलकिडे, तुडतूडे, नागअळी, मिलीबग या साठी आपल्याला व्यवस्थापनाचा दर्जा उत्तम ठेवणे गरजेचेच आहे. माझ्या मते बोंड अळीच्या नावाखाली जी नकारात्मकता पसरवली जात आहे त्याकडे दुर्लेक्ष करून कापूस लागवड करावी व योग्य व्यवस्थापन करून प्रगती साधावी. 

 

 

    Back to blog