सन्मानातून साधू प्रगती, राहू अनंत आनंदी.

सन्मानातून साधू प्रगती, राहू अनंत आनंदी.

मित्रहो एकाच जंगलाचा भाग असलेल्या विविध प्राण्यांचा त्याच जंगलाबद्दलचा अनुभव वेगळा असणार आहे. या पैकी एखादा प्राणी हुशार आणि बाकी वेडे असे म्हणता येणार नाही. जंगलातील मातीत रेंगणारे गांडूळ, मातीवर रेंगणारे किडे, हवेत उडणारे पक्षी, फांद्यांवर खेळणारी माकडे, मैदानात धावणारी हरीणे आणि लपून छपुन शिकारिचा मागोवा घेणारे वाघ. हे सर्व प्राणीच आहेत. ते दिसायला वेगळे, त्यांची शक्तीस्थळे वेगळी, चालचलन वेगळे, दृष्टीकोन वेगळे, पण यापैकी कुणीही हीन नक्कीच नाही. ते एकमेकाकडे सन्मानाने पाहतात का? नक्कीच पहात असावेत! हे सिद्ध करणे शक्य नसले तरी त्यांच्या युगे-युगे अस्तित्वातून हे सिद्ध होते.

मुद्दा हा कि “एकमेकाबद्दल सन्मान राखणे आणि एकमेकाच्या अस्तित्वासाठी प्रयत्नशील रहाणे गरजेचे आहे.” दुसऱ्याचा मुद्दा न-पटणारा असू द्या, संस्कृती वेगळी असू द्या, अर्थकारण वेगळे असू द्या, आज एकमेकची गरज नसली तरी काही हरकत नाही पण एकमेकाचा सन्मान करणे, एकमेकांच्या हक्कांचे, अस्तित्वाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आपण दुसऱ्याचा सन्मान केला नाही तर त्याची जागा दुश्वास घेईल. या दुश्वासातून त्याचा अंत झाला तर पुढला नंबर आपला असेल. आज त्याच्या अस्तित्वाची लढाई तो हरला तर आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या लढाईत शर्थ करावी लागेल. दुर्देवाने म्हणा कि आपल्या कर्माच्या अभावाने म्हणा, आपल्या लढ्यात रसद द्यायला “तो” देखील उपलब्ध नसेल.

कृषीक्षेत्रात काम करते वेळी मी काही शेतकरी बांधवांचे, इतर शेतकरी बांधवाबद्दलचे विचार वेगळे असतात हे बघितले आहे. त्यातून आज या क्षेत्रातील मूळ भागधारकाची अस्तित्वाची लढाई जगभरात सुरु झालेली दिसते.

आज सत्तरीच्या टप्यात असलेल्या व नोकरी करून रिटायर्ड लाईफ जगणाऱ्या प्रत्येक मध्यमवर्गीयाने बालपणी शेतीतील कामे केलेलीच असतील. कुणी मोट हाकली असेल, कुणी शेंगा फोडल्या असतील, कुणी खुरपणी केली असेल. त्यांना तेव्हा युरिया ज्ञात नव्हता. पन्नाशीच्या टप्प्यातील नोकर वर्गापैकी फार कमी लोकांनी हा अनुभव घेतला असणार आहे, तरीही त्यांनी ट्रॅक्टरचा अनुभव घेतला असण्याची शक्यता जास्त आहे. त्यांनी युरिया वापरला असेल पण सूक्ष्मअन्नद्रव्य हा विषय त्यांना ज्ञातच नव्हता. नव्याने नोकरीत लागलेल्या अनेकांना भुईमुग मातीत येतो हे फक्त पुस्तकात वाचून माहित असणार. त्यांना विचारले तर ते वनस्पतीला लागणारे सोळा मूलद्रव्य खाड-खाड म्हणून दाखवतील. पाणी-खते-औषधे ठिबकने देतात हे देखील ते सहज सांगू शकतील. पण त्यांना शेतीतले कळत नाही व पुस्तके वाचून शेती करता येत नाही असा त्याबद्दल दुस्वास होतांना दिसतो. खरतर हा स्थळ, काळ व परिस्थतीतून निर्माण झालेला फरक आहे. त्यासाठी कुणी कुणाला ढब्बू किंवा हुशार, आळशी किंवा कार्यतत्पर म्हणू शकत नाही. 

मराठवाड्यातील व विदर्भातील शेतकरी जो अनुभव घेतो त्यापेक्षा कोकणी व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे अनुभव वेगळे असणार. नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, दोघी खानदेशातील असले तरी, वेगळे असणार हे नक्की. त्यांची पिकपद्धती, अर्थार्जन,दृष्टीकोन वेगवेगळे असणारच. पंजाब व हरयाणा मधील शेतकरी, तामिळनाडू-केरळातील शेतकरी व महाराष्ट्र-मध्यप्रदेश मधील शेतकरी यांचे संपूर्ण अर्थकारण वेगळेच आहे. त्याच्या प्रथा, संस्कृती वेगळे असणार यात शंका नाही पण आपण शेतकरी आहोत हि बाब आपल्याला एका धाग्यात बांधायला पुरेशी आहे. हा धागा जपणे आपल्या स्वत:च्या अस्तित्वासाठी महत्वाचे आहे, हे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात घ्यायला हवे.

पुरातन शेती, स्वातंत्र्यपूर्व शेती, स्वातंत्र्योत्तर शेती, हरितक्रांतीतील शेती, धवलक्रांतीतील शेती व आताची प्रक्रिया उद्योग काळातील शेती यात फार मोठे अंतर आहे. कोरडवाहू, बागायती, संरक्षित, हायड्रोपोनिक्स या विविध प्रकारच्या शेतीत काम करणाऱ्याचा अनुभव, ज्ञान, कसब यात मोठे अंतर आहे. निव्वळ शेती करणारा शेतकरी, पूरक उद्योग करणारा शेतकरी, प्रक्रिया उद्योग करणारा शेतकरी, फार्म टू फोर्क क्षेत्रातील शेतकरी यांची गणिते वेगळी असणारच आहेत. आपण एकमेकाबद्दल काय विचार करतो? कसे वेगवेगळे आहोत? हे मुद्दे अलहिदा असले तरी आपण शेतकरी आहोत हि ऐक्याची भावना आपल्याला एकमेकाचा सन्मान करायला शिकवते. हा सन्मान आवश्यक आहे.

भविष्यात शेतीचे स्वरूप प्रचंड बदलणार आहे यात शंका नाही. मास प्रयोगशाळेत तयार होईल. चिकन फ्लेवरचे, मटन फ्लेवरचे असे मास मिळेल, ते कुठल्या प्राण्याचे नसेल! शेताची निगा राखायला उद्या कदाचित “मायक्रोड्रोनचा” थवा (पक्षांचा थवा आकाशात उडतो तसा) शेतात उडेल! पिकाच्या चौफेर उडून ते प्रत्येक पानाचे, काडीचे व मुळाचे सर्वेक्षण करतील. कमतरता व पूर्ततेचा सातत्यपूर्ण आढावा घेतील.  चौथ्या ओळीतील एकशेपाचव्या रोपाला पाणी कमी पडते आहे, सोळाव्या ओळीतील दहाव्या रोपावर पांढरी माशी अंडी देते आहे, पन्नासव्या ओळीतील एक्कावनव्या रोपाला, आज सकाळी दहा वाजेनंतर, लोहाची कमतरता जाणवली होती, असले मेसेज हे “मायक्रोड्रोन” आपल्या मोबाईलवर पाठवतील. तेव्हा तुम्ही कदाचित केलीफोर्नियातील बाजारात पुढल्या पाच वर्षात पिकणाऱ्या धान्याचा लिलाव करीत असाल. तेथूनच तुम्ही बटने दाबून हव्या त्या रोपाला पाणी, हवे त्याला औषध व हवे त्याला लोह देवू शकाल! हे असले लेखन करणारा माणूस आज तुम्हाला वेडगळ वाटू शकतो. पण या पूर्वी हि अशीच कल्पना करू शकणाऱ्या व्यक्तींने आजच्या आधुनिक शेतीच्या अस्तित्वात मोलाचा सहभाग दिला आहे. तो देखील शेतकरी समाजाचा एक अविभाज्य भाग आहे. शेती क्षेत्रासाठी काम करणारे संशोधक, उद्योजक, भांडवलदार हे देखील एका प्रकारे शेतकरीच आहे. ते भागधारक असून त्यांची कामाची पद्धत वेगळी असू शकते.  त्यांना एकरूप करून घेण्या ईतपत सामंजस्य बाळगणे शेती, शेतकरी व मनुष्यजातीच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. एकमेकाच्या अस्तित्व जपणे व आपल्यामुळे इतरांच्या अस्तित्वावर प्रश्न उभे रहाणार नाही याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.  एकमेकाचा सन्मान करणे हेच आपल्या जीवनाचे मर्म आहे, अस्तित्वाचा पाया आहे एव्हढाच हा संदेश आहे.

डॉ. मकरंद राणे

फेसबुकवर  

आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

---------------------

Back to blog