बोचणाऱ्या शल्याचे काय कराल?

बोचणाऱ्या शल्याचे काय कराल?

 

आपणास "महाभारत" यामहाकाव्यातील शल्य राजाची गोष्ट ठावूक आहे का?  रूपकाच्या आधारावर माणसाच्या मनोविज्ञानाचा जो उलगडा या कथेत केलेला आहे, तो अप्रतिम आहे. 

शल्य हा माद्र देशाचा महापराक्रमी राजा होता. नकुल-सहदेवाची माता माद्री हिचा तो सख्खा भाऊ. या नात्याने पांडवांचा "मामा". मामाच्या मनात "पांडवाबद्दल" अमाप "प्रेम-आदर-स्नेह" होते. 

जेव्हा "महायुद्धाची" घोषणा झाली तेव्हा "शल्य" आपले सारे सैन्य घेवून रणभूमीकडे निघाला. त्याची फौज मोठी होती. दिवसा प्रवास करायचा व रात्री मुक्काम. टप्याटप्याने सेना पुढे सरकू लागली. इकडे हि बातमी "दुर्योधनास" कळाली. शकुनी मामाच्या सल्ल्याने दुर्योधनाने "शल्यास" आपल्या बाजूने ओढायचा डाव रचला. त्यांने शल्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी चांगल्या सरबराईची सोय केली. आयोजन कुणाचे आहे हे मात्र शल्याच्या लक्षात येवू दिले नाही. मुक्कामाच्या ठिकाणी अफाट सैन्यासाठी सर्व सोयी युक्त छावण्या तयार असत. चार पाच रात्री या छावण्याचा पाहूणचार घेतल्यावर "शाल्यास" कळाले कि आपली हि अलिशान सोय "कौरवांनी" केली आहे. कुठलीही चौकशी न करता घेतलेला हा पाहुणचार स्वीकारण्याचा त्यास पश्चाताप होऊ लागला. या उपकाराची परतफेड म्हणून शल्यास कौरवा कडून लढावे लागणार होते.

 

युद्ध सुरु होण्यापूर्वी शल्याने आपल्या चुकीचे परिमार्जन "युधिष्ठिराकडे" केले. विपरीत परिस्थितीचा फायदा घेणार नाही ते "पांडव" कुठले? "तू शत्रूच्या गटात राहून आमची मदत करू शकतो, त्यांच्या कडून लढ पण त्यांचे मनोबल "खस्ता" करत रहा" त्यास सांगितले गेले. शल्याने देखील तसे वचन युधिष्ठिरास दिले. 

जसे अर्जुनाचे सारथ्य कृष्णाकडे होते तसे कर्णाचे सारथ्य शल्याकडे आले. रणांगणावर लढते वेळी तो कर्णास उपयुक्त मार्गदर्शन करीत होता पण मनोबल खचवत होता. तो मधून मधून अर्जुनाचे गुणगान करीत राही. आपण अधर्माच्या बाजूने लढतो आहोत हे तो कर्णाच्या मनात पेरत राही. त्याच्या या वागण्यामुळे "कर्ण" मनोमनी त्याबद्दल "साशंक" झाला.

मध्यंतरी कर्णाने, "नकुल व सहदेव' या शल्याच्या सख्ख्या भाचांना हरवले पण ते आपल्या पेक्षा वयाने लहान आहेत म्हणून त्यांचे प्राण घेतले नाही. या घटनेमुळे शल्यामनात कर्णाबद्दल आदर निर्माण झाला व तो कर्णास पूर्ण सहकार्य करू लागला. 

कर्ण-अर्जुन युद्ध  शिगेवर असताना, कर्णाने नागअस्त्र उपसले. त्याच्या कडे ते एकमेव होते. अर्जुनाचा ठाव घेण्याची क्षमता या एकाच अस्त्रात होती. अर्जुनाचा रथ खड्यातून जाईल व कर्णाचा नेम चुकेल हे शल्याच्या लक्षात आले. वार वाया जावू नये म्हणून अर्जुनाच्या डोक्यावर नेम धरण्यापेक्षा छातीवर नेम धरावा असे त्याने कर्णास सुचवले. पण हा शल्य मधून मधून अर्जूनाचे गुण गातो, तो अर्जुन धार्जिणा आहे असे कर्णास वाटत असल्याने त्याने शल्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. नेम अर्जुनाच्या डोक्यावर धरला. ऐन वेळी कृष्णाने अर्जुनाचा रथ खड्यात नेल्याने, नेम  चुकला. अर्जुनाचे मुकुट नागअस्त्राने पडले पण जीव वाचला. यानंतर अर्जुनाने कर्णाचा वध केला. 

कर्णाच्या मृत्यूनंतर कौरवांचे सेनापतीपद शल्या कडे आले. एव्हाना तो सर्वकाही विसरून कौरवांशी एकरूप होऊन पांडवांशी द्वेषाने लढू लागला. कर्णाचा मृत्यू त्याच्या जिव्हारी लागला. तो इरेला पेटला. त्याने कौरव सेनेत नवचैतन्य निर्माण केले. हे प्रकरण हाताबाहेर गेले आहे हे कृष्णास जाणवले व त्याने धर्मराज युधिष्ठिरास "शल्याला" संपवायची जबाबदारी दिली. युधिष्ठिरा समोर शल्य चपापला. आपण धर्मराजास दिलेले वचन मोडले आहे हे त्याच्या लक्षात आले. युधिष्ठिरा समोर त्याची आंतरिक शक्ती क्षीण झाली व तो मारला गेला. 

मित्रहो या कथेतील "शल्य" हि संकल्पना लक्षात घ्यायला हवी. शल्य कसे निर्माण होते व कसे अस्त होते हे समजावून घेणे महत्वाचे आहे.  प्रत्येकाच्या जीवनात चुका होतात, अपयश येते, अपमान होतो, निराशा पदरी पडते, अवहेलना देखील होते. या घटनांमधून मोठ्या प्रमाणात शल्य निर्माण होते. ते बोचते, टोचते, हृदयाला भोकं पाडते. प्रत्येकाच्या जीवनात हे होतच असते. माझ्या जीवनात आहे, तुमच्याही जीवनात असणारच आहे. 

प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनात हि अवस्था निर्माण होत असते. कारणे अनेक असतात. मनात शल्य घर करायला लागते. मजल्यावर मजले चढायला लागतात. शल्य इरेला पेटलेले असते. एक वेळ अशी येते कि "आपल्या मनात चुकीचे विचार चमकून जातात".  

तुमच्या माझ्या सारखा संसारी माणूस खरे बघितले तर निष्पाप असतो. हातून घोर चुका झाल्याही असतील पण त्याला जीवनातील चढ उतार कारणीभूत असतो. अज्ञान व विसंगती कारणीभूत असतात. सकाळी उठून "मी कुटुंबासाठी काय करू?" हा विचार तुमच्या मनात येत असेल तर स्वत:ला सावरा. मनातील शल्याचा "वध" करायचा आहे हे प्रथम लक्षात घ्या. तसा निश्चय करा. तुमच्यातील धर्मराजाला जागृत करा. कृष्णाचे मत घ्या. सरळ बोटाने तूप निघत नाही - बोट थोडे वाकडे करा. शल्य आपल्या मनातील कौरवांची मदत करतो हे लक्षात घ्या.

शल्य मुळात निर्माणच व्हायला नको. त्यासाठी जीवनातील चढ-उतारास आपण मनापासून मान्यता द्यायला हवी. सुखा मागून फक्त सुखाची लालसा धरल्याने लहानसे दुखः देखील डोंगराएव्हडे भासते. जीवनात वाईट दिवस येतात हा विचार मनात पक्का करा. 

अज्ञानातून जाणारी वाट अंधाराकडे जाते. तुम्ही ज्ञानगंगेच्या काठावरील वाट धरा. कुठलाही एक मार्गदर्शक व कुठलेही एक पुस्तक संपूर्ण जीवनात प्रकाश निर्माण करू शकत नाही. सातत्याने नवनवीन पुस्तके वाचीत रहा. ज्ञानगंगेतून नित्य नियमित पणे शुद्द ज्ञान पीत रहा. पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकातून माहिती मिळेल - माहितीतून विचार निर्माण होतील व विचारातून तुमच्यात "ज्ञान वाढीस लागेल". त्यातून तुम्ही सूर्यासारखे स्वयंप्रकाशित व्हाल. अंधारलेली वाट तुमच्या समोर कधीच येणार नाही.    

राजा असूनही वनवास भोगावा लागला ना रामाला? राज्य मिळवून देखील कैकई चा मुलगा बसला का सिंहासनावर? पांडव महायुद्ध जिंकले पण त्यांना "आपली माणसे" गमवावी लागली. पेरलं ते उगवत. जे उगवलं त्याचे पोषण करा. जतन करा. एव्हढे करूनही जो पर्यंत ते खिशात येत नाही तो पर्यंत त्याला हिशोबात घेवू नका कारण विसंगती हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. परीस्थीतीशी लढा द्यायची तयारी ठेवा.   

आपल्याला आपल्या माणसांचा जय करायचा आहे. विजय सत्याचाच व्हायला हवा. जीवन हेच सत्य आहे. सत्याची कास धरा - शल्याचा नाश आपोआप होईल.

--------------------
हि पुस्तके तुम्ही फोटोवर क्लिक करून खरेदी करू शकता.
 ----------------------------
पुन्हा भेटू पुढील लेखात तो पर्यंत तुम्ही आमची  हि पोष्ट फेसबुकवर शेअर करायला विसरू नका, हि पोष्ट व्हायरल व्हायला हवी ना!

शेअर प्लीज

Back to blog