खरीप हंगामाचे काय होणार?

खरीप हंगामाचे काय होणार?

कोणते पिक निवडावे म्हणजे कमीत कमी खर्च येईल व जास्तीत जास्त नफा येईल? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक शेतकरी बांधव अहोरात्र शोधत आहे. कधीतर असे होईल..एखादे असे पिक हाती येईल ज्यात रोगराई नसेल, कीड नसेल! एका पिकाला कंटाळला कि शेतकरी याच आशेने दुसरे पिक शोधतो/निवडतो. 

आजकाल सोशल मिडीयावर येणारे व्हिडीओ आणखीच अचाट असतात. एखादा शेतकरी विळ्याने उभे पिक कापत सुटतो, दुसरा त्याचा व्हिडीओ काढतो. मग हा व्हिडीओ शेअर करून करून इतका व्हायरल होतो कि प्रत्येकाकडे तो पाच दहा वेळा तरी पोहोचतो.असे व्हिडीओ नजरेसमोर असेपर्यंत कुणीही ते पिक घ्यायचा विचार करीत नाही..धजत नाही. दुसरे एखादे पिक निवडतो. 

मागील वर्षी कापसाच्या बाबतीत असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले त्यामुळे शेतकर्यांच्या एका मोठा वर्गाने यावर्षी कापूस लागवड करायचे टाळले. मग दुसरे कोणते पिक आहे..यावर उत्तर आले सोयाबीन. सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हा आकडा इतका फुगला कि कमोडीटी मार्केट मध्ये "सोयाबीन" व "सोयाबीन तेलाचे" भाव गटांगळ्या खावू लागले. प्रत्यक्षात जेव्हा हा सोयाबीन, काढणी नंतर" शेतकऱ्याच्या घरात येईल तो पर्यंत हे भाव रसातळाला पोहोचलेले असतील". मग हे पिक देखील असेच बदनाम होईल.

चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने सोयाबीन चे एकरी उत्पादन वाढण्याची दाट शक्यता आहे त्यातच लागवडीखालील क्षेत्र काही पटीत वाढत असल्याने, "विक्रमी" उत्पादन व्हायची शक्यता खूप जास्त आहे. असे विक्रम करण्यात भारतीय शेतकरी अग्रणी आहे. तो लाटेवर शेती करतो, लाट इतकी उंच उंच जाते कि शेवटी तोल जावून "तो" बुडायला लागतो. 

-------------
-------------

अंदाजाप्रमाणे पाउस चांगला झाला तर असे होईल आणि जर पाउसच चांगला नाही झाला तर मात्र सोयाबीनला थोडा चांगला भाव मिळू शकतो. एकूणच काय होईल हे अजूनही पूर्णपणे खात्रीने सांगता येणार नाही. जगातील एकही "प्रकांड पंडित" छातीठोक पणे हे सांगू शकत नाही.

या अश्या परिस्थितीतून सुटकेचा मार्ग काय? काय केल्याने या चक्रव्युव्हातून "शेतकरी" सुटेल? तुमच्याजवळ उत्तर आहे का? चर्चा व्हायला हवी. 

तुमच्या जवळ उत्तर असेल तर या पेजवर खाली प्रतिक्रिया द्यायला एक चौकट आहेत त्यात आपण आपले विचार मांडू शकता. चांगल्या प्रतिक्रिया नावासहित याच लेखात समाविष्ट करून घेतल्या जातील. 

Back to blog