आगळे वेगळे शेतकरी - मुंबईतले!

आगळे वेगळे शेतकरी - मुंबईतले!

आपण मुंबईला फिरले असाल तर प्रत्येक उपनगरीय स्टेशनच्या बाहेरचा भाजी-बाजार बघितलाच असेल. तिथे चिरून ठेवलेल्या भाज्या, तोडलेल्या शेंगा, सोललेले लसूण असे प्रकार वरचेवर दिसतात. इथल्या सामान्य जनतेला जगा-मरायला वेळ नाही मग लसून कोण सोलणार? आणि भाज्या कोण चिरणार? लोकलमधून उतरले कि या चिरलेल्या भाज्या घ्या, सोललेल्या लसणात फोडणी घाला, खा आणि झोपा. दुसऱ्या दिवशी उठले कि पुन्हा आदल्या दिवशीच्या चिरलेल्या भाज्या वापरून स्वयंपाक करा, डबे भरा आणि लोकल धरा. तिथले जगणेच वेगळे आहे! अर्थात या शहराची हि एक बाजू झाली. मुंबईत असेही अनेक लोकं आहेत जे कधी लोकल मध्ये प्रवास करीत नाहीत. हि उच्चभ्रू मंडळी, शहरी श्रीमंत व उच्च-मध्यमवर्ग, "आपण" काय खातो याबद्दल फार जागरूक असतात. शहरी बाजारात आपल्याला हव्या तशा भाज्या मिळत नाही हे त्याला चांगलेच ठावूक आहे. असे असले तरी ते शुद्ध भाज्या खाण्यासाठी गावी येवून रहाणार नाही. मातीत हात घालणार नाही. त्यांना प्रामाणिकपणे विषमुक्त भाज्यांचे उत्पादन घेणारा उत्पादक हवा आहे. या भाज्या ताज्या हव्या, दिसायला सुंदर, टवटवीत, रसरशीत, पोषक हव्यात. जो उत्पादक शक्य तितका पारदर्शी असेल, आपण भाज्या कुठे उगवतो, कशा उगवतो हे सांगणारा, नियमितपणे आपल्या फार्म चे फोटो (सोशलमिडीयावर) दाखवणारा, फार्मचा "लाइव कॅम" दाखवणारा असला तर उत्तम. असा हा फार्म "हायपर लोकल" म्हणजे शक्य तितका जवळचा असायला हवा, येता जाता दिसणारा हवा! आता मुंबईत कुठून असणार असा व्यक्ती? आणि तिथे शेती करायला इतकी जागा आहे का? आणि असली तर पाणी कुठून आणणार? मुंबईची हवा किती प्रदूषित आहे? ताज्या, सुंदर, रसरशीत, पोषक भाज्या कशा उगवणार मुंबईत!

तुम्ही म्हणाल "राणे हे जरा अति होतंय", "हे कसे शक्य आहे?" "तुम्ही थापा मारू नका राव", "फेकू नका"....एरवी तुम्ही इतकी चांगली माहिती देता, आज काय झालय?जरा धीर धरा मित्रांनो. माझ माझ थोड चुकलच! पुराव्याशिवाय काही लिहायला नको! या लेखाच्या खाली "संदर्भ" देतोय. ते तुम्ही बघा!

 

मुंबईच्या अंधेरीत ऐन तिशीतल्या एका जोडप्याने एक इनडोअर (बंद छता खालचा) फार्म सुरु केलाय, नाव आहे "हर्बीवोर फार्म" (घास-पूस खाणाऱ्यांचे शेत)" तिथे ते हायड्रोपोनिक (मृदाविरहीत फक्त पाण्यावर उगवणाऱ्या) भाज्या उगवतात उदा. स्विस चार्ड (काही ठिकाणी शार्ड असा उच्चार ऐकण्यात आला), केल (केळ नाही बर), रॉकेट आणि लेट्युसचे प्रकार जसे लोलो रोसो, ग्रांड रॅपिड, रोमानी, बटाविआ, प्राईज हेड, बटरहेड! अलीकडेच यांनी मायक्रोग्रीन्स हा प्रकार देखील सुरु केलेला दिसतोय. मायक्रोग्रीन्स मध्ये अरुगुला, बेसिल, रॅडीश (मुळा), गाजर, सेलेरी, चीव्ह, ब्रोकोली, कोबी, मोहरी, क्रेस, पार्सेली, फेनिल, सिलांट्रो, फ्रेंच सोरेल, मिंट, डील, शिशो, स्पिनाच, बीट, टाटसोल, मिटझुना, एमेरांथ, चार्ड, केल, मेच, लेट्युस  अशा भाज्यांच्या बिया भिजवून, अंकुरित केल्या जातात. कोंब २.५ ते ७ सेंटीमीटर पर्यत वाढले कि लगेच काढणी करतात. हायड्रोपोनिक्स प्रमाणे यात वहाते पाणी दिले जात नाही आणि माती देखील वापरत नाही. मायक्रोग्रीन्सला खते देखील दिली जात नाहीत.

 

हे फार्म दिसायला अगदी साफ, नीटनेटके दिसतात. तिथली हवा "स्टराइल" असते. (हॉस्पिटल च्या ऑपरेशन थेटर मध्ये असते तशी!). कीटकनाशकांचा वापर अजिबात होत नाही. खर तर शहरात जागा अतिशय महाग असते आणि पाणी देखील जपूनच वापरावे लागते. या अडचणीवर मात करण्यासाठी या फार्म मध्ये शेल्फ आहेत, एकावर एक अशे दहा! आणि सर्वच्या सर्व पाणी प्रक्रिया करून पुन्हा पुन्हा वापरले जाते. अंधेरीतील या फार्मचे क्षेत्र १००० स्क्वेअर फुट आहे, म्हणजे एका एकरात असे ४० फार्म बसतील! पाणी किती लागते? अशा भाज्या शेतात करायला लागते त्याच्या २० टक्के फक्त!

ताज्या भाज्या छोट्या छोट्या बॉक्स मध्ये भरल्या जातात. एका बॉक्स मध्ये दोन ते तीन भाज्या. प्रत्येक ग्राहकाला आठवड्यातून १ बॉक्स घरपोच दिला जातो. महिन्याकाठी याचे १५००-२००० रु घेतले जातात. जर पोच करायचे ठिकाण एका विशिष्ट अंतरा पेक्षा जास्त असेल तर पोच करायचे चार्जेस वेगळे घेतले जातात. हे सर्व सुरु होण्यापूर्वी या दाम्पत्याने, अभिप्राय देण्याच्या अटीवर, भाज्या फुकट वाटल्या. भाज्याची चव व दर्जा उत्तम असल्याने लोकांना हा प्रकार आवडला. ग्राहकांनी खरेदी सुरु केली! 

हे दाम्पत्य इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर नियमित फोटो-माहिती शेअर करते. या माहितीसोबत ते आपली लाईफस्टाईल, काम, भविष्यातील योजना, नाविण्यता याची जोड देतात जेणेकरून ग्राहकांशी सातत्याने संवाद सुरु राहील. ग्राह्कातील उत्सुकता, विश्वास, आत्मीयता, मैत्रत्व टीकुन राहील याची ते काळजी घेतात. 

मित्रहो अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न शिल्लक असतील. प्रश्न निर्माण करणे व मग त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सांगणे हे माझे उद्दिष्ट नाहीये. उरलेल्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही स्वत: शोधा. मला विचारू शकता पण कदाचित काही प्रश्नाची उत्तरे मी देवूच शकणार नाही. तुम्हाला लहानमोठे प्रयोग करून या प्रश्नाची उत्तरे मिळवावी लागतील.  

या प्रयोगासाठी तुम्हाला पाण्यात विरघळणारी जी खते लागतील ती तुम्ही आमच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. त्याव्यतिरिक्त जे बियाणे व इतर साहित्य लागेल ते तुम्ही एमेझोनवरून खरेदी करू शकता, त्याच्या लिंक्स वरती दिल्या आहेत. 

संदर्भ

Back to blog