उसाच्या ४० पट नफा तेही उसाला लागते त्याच्या फक्त ५ टक्के पाण्यात!

पारंपारिक पिके घेत असतांना अनेकवेळा बाजारभावाचा मोठा फटका बसतो हि बाब लक्षात घेवून अनेक शेतकरी बांधव नवीन अपारंपरिक पिकांकडे वळतात. अशा अपारंपरिक पिकांनी देखील अनेक वेळेला शेतकरी बांधवांना अडचणीत आणले आहे. दोन ते तीन दशकापूर्वी “मधुपर्णी”/ “स्टीव्हीया” ची एक लाट आली होती. त्यात अनेक शेतकरी बांधवांना मनस्ताप सहन करावा लागला. त्या मनस्तापाला काही वैविध्यपूर्ण कारणे होती. कालानुरूप गोष्टी बदलतात तेव्हा आता “पुन्हा एकदा “स्टीव्हीया”कडे वळून पहावेका?” याचा उहापोह इथे करीत आहोत.

“मधुपर्णी”/ “स्टीव्हीया” म्हणजे काय?

मित्रहो, अन्न हे पूर्ण ब्रम्ह असते म्हणूनच प्रत्येक स्वयंपाकि अन्न बनवतांना ते रुचकर बनेल असे बघतो. त्यात विविध चवी निर्माण करतो. “गोड” चव अतिशय महत्वाची असते. जेवणाच्या शेवटी एखादा गोड पदार्थ खाल्ला कि मन तृप्त होते. असे तृप्त मन निसर्गरूपी ईश्वराला, अन्नदात्याला व अन्नपूर्णेला नमन करते. समाधानी होते.

प्रत्येक भारतीयाने वाचावे असे पुस्तक

पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा


दुर्दैव हे कि काही व्यक्तींमधील गोड चवीसाठी आवश्यक असलेल्या शर्करेला पचवायची शक्ती कमी होते. रक्तात शर्करेचे प्रमाण वाढू लागते व त्यामुळे इतर अनेक समस्या निर्माण होतात. सामान्य जीवन जगणे कठीण होऊन बसते. हा एका प्रकारचा रोग असून यास “मधुमेह” असे संबोधले जाते. त्यांना साखर खाणे वर्ज होते किंवा ती फार कमी प्रमाणात खाता येते. यामुळे या लोकांना “अन्नग्रहणाचे” खरे समाधान मिळत नाही.

मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांना सामान्य जीवन जगण्यासाठी साखरे पासून दूर राहावे लागते. अगोड खाणे त्यांना जीवावर येते पण गोड खाणे जीवावर उठते! अश्या लोकांना मधुपर्णीच्या अर्कात असणाऱ्या गोडीचा उपयोग करून घेता येतो. मधुपर्णीच्या सुकलेल्या पानातून एक पांढरी पावडर मिळवली जाते. हि पावडर साखरेच्या ३०० पट गोड असली तरी मधुमेहींना याचा त्रास होत नाही. अन्नात जिथे जिथे साखर वापरतात तिथे तिथे “मधुपर्णी” ची पावडर वापरली कि “गोड” खाल्याचे समाधान मिळते. जीवनात “समाधान” हि एकमेव जमेची बाजू आहे.

दोन दशकापूर्वी काय घडले?

दोन दशकापूर्वी “मधुपर्णीच्या” लागवडीची लाट आली. उसाच्या ४० पट नफा देणारे व उसाला लागणाऱ्या पाण्याच्या फक्त ५ % पाण्यात येणारे पिक अशी या पिकाची ख्याती झाल्याने शेतकरी बांधवांना वाटले कि आपल्या हाती अल्लाउद्दिन चा दीवाच लागला! अनेक लोकं शेतकऱ्यास स्वप्न दाखवू लागलीत. लागवडीचा सुरवातीचा खर्च हेक्टरी एक लाख वीस हजार इतका जास्त होता/आहे. नवीन पिक असल्याने शेतकऱ्यास याच्या नियोजनात अनंत अडचणी येत होत्या. कृषी विभागाकडून खास मार्गदर्शन लाभले नाही. आपल्याकडे नियोजन कसे करावे याचा तांत्रिक अभ्यास झालेला नव्हता. दुसऱ्या बाजूने एक वेगळीच समस्या होती. मधुपर्णी मध्ये गोड तत्वा सोबत एक कडू तत्व देखील असते. चांगल्या दर्जाची गोडी हवी असेल तर हे कडू तत्व त्यापासून विलग करावे लागते. विलगीकरणाची हि प्रक्रिया तितकीशी चांगली स्थापित झालेली नव्हती. त्यात अडचणी होत्या. त्यामुळे वापरात अडचण होती. मध्यला काळात एफएसएसएआय ने मधुपर्णीच्या पावडरचा अन्नपदार्थात वापर करण्यास परवानगी नाकारली. इतर कृत्रिम गोड पदार्थ जसे अस्पार्तेम, सुक्रालोज व साकेरीन यांचा सर्रास वापर झाला व मधुपर्णी मागे पडले. कालांतराने शेतकरी बांधवांनी या पिकाकडे पाठ फिरवली.


आता काय बदल झालेत?

मधुपर्णीतील गोड व कडू तत्व वेगळे करण्यासाठी विलगीकरण करण्याच्या प्रक्रियेत “मायक्रोवेव्ह, मेम्ब्रेन फिल्ट्रेशन व नॅनोफिल्ट्रेशन अश्या तंत्रांचा वापर करण्यात आला. नवीन तंत्रज्ञान गोड व कडू तत्व पूर्णपणे विलग करण्यात यशस्वी ठरल्याने त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली. डिसेम्बर २०१५ मध्ये एफएसएसएआय ने परवान्याची अडचण दूर केली. “अन्नपदार्थात अस्पार्तेम, सुक्रालोज व साकेरीन यांच्या अतिवापरामुळे मुळे कर्करोग होऊ शकतो” या विषयी ग्राहक जागरूक झाल्याने खाद्यपदार्थ निर्माते आता मधुपर्णीला प्रार्थमिकता देवू लागलेत. एकूणच या पिकाची शेती वाढावी म्हणून सरकार प्रयत्नशील झाले व राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियानात या पिकाचा समावेश करून एकरी उत्पादन खर्चावर ३० टक्के अनुदान देण्यात येते आहे. या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लेखाच्या खाली महत्वपूर्ण लिंक दिल्या आहेत. अमूल, मदर डेअरी, पेप्सिको, कोकाकोला या कंपन्यांनी मधुपर्णी चा अंतर्भाव असलेले १०० पेक्षा जास्त उत्पादने बाजारात विक्रीला आणली आहेत. अलीकडील काळात मलेशियातील शुद्ध मधुपर्णी तत्व तयार करणारया “प्युअर सर्कल” या कंपनीने पुढील पाच वर्षात भारतात १२०० कोटीची गुंतवणूकीची तयारी केली असून डाबर, फ्रुटी व हल्दीराम सोबत या तत्वावर आधारित पदार्थ निमिर्तीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.


या पुढील वाटचाल कशी असावी?

जागतिक लोकसंख्या व त्यातील मधुमेहींचे प्रमाण पाहता, मधुपर्णी युक्त पदार्थाचे मार्केट मोठे आहेत यात शंका नाही. अलीकडील काळात अंगकाठी पातळ रहावी म्हणून प्रयत्न करणारी मंडळी देखील साखर नसलेले गोड पदार्थ निवडतात त्यामुळे डाएट प्रकारातील शीतपेयात देखील मोठी मागणी आहेच. भारत व चायनात “मध्यमवर्ग” मोठ्या प्रमाणात वाढतो आहे या वर्गामुळे भविष्यातील मागणी वाढतीच राहील. या बाबी लक्षात घेवून मधुपर्णी लागवड आत्मसात करायला हवी. सुरवातीचा खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे जास्त महत्वाचे आहे. साखरेत सहकारातील स्वाहाकार मोठ्या प्रमाणात झाला, सरकारी लुडबुड देखील खूप आहे. तसे या पिकात होणे कठीण आहे. भांडवलशहा लोकांशी योग्य पद्धतीने व्यवहार केल्यास यापिकाचे व सोबत शेतकऱ्याचे भविष्य “उज्वल” राहील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

लागवडी विषयी माहिती

मधुपर्णी हे एक बहुवार्षिक झुडूप असून, एकदा लावले कि तीन वर्षे पाने मिळत रहातात. एमडीएस १४ व एमडीएस १३ या दोन प्रजाती भारतीय वातावरणानुसार कमीत कमी काळजी व खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देतात. या पिकास १५० सेमी पर्जन्यमान लागते तसेच सर्वसाधारण ३० ते ३२ हे तापमान योग्य असते. तापमान ४५ पेक्षा जास्त किंवा ५ पेक्षा कमी झाल्यास पिकास हानी पोहोचते.


मृदेची निवड व तिचे नियोजन विशेष महत्वाचे आहे. चांगल्या निचऱ्याची लाल, वालुकामय चिकण माती या पिकासाठी चांगली असते. मृदेचा सामू साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान असावा. मृदेचा दर्जा चांगला नसेल तर तिची नांगरणी चांगली करावी व त्यात मुबलक भरखते टाकावीत. ती चांगली तण विरहीत करावी. मृदेत पाणी अडकून नुकसान होऊ नये म्हणून १२ ते १५ सेमी उंचीचे व ५० ते ६० सेमी रुंदीचे वरंबे बनवावेत. दोन वरंब्यात ४० सेमी अंतर ठेवावे. या पद्धतीने एका एकरात २० ते २५ हजार झुडपे बसतील.


फेब्रुवारी-मार्च दरम्यान लागवड करावी. लागवडीसाठी चांगल्या दर्जाची रोपे मिळवावीत. मागील वर्षीच्या झाडापासून १५ सेमी फांदी वापरून नवीन रोपे बनवता येतात. अशी रोपे चार आठवड्यात पुनर्लागवडीसाठी योग्य होतात.


जमिनीच्या मगदुरानुसार या पिकास संतुलित खत मात्रेची गरज असते. सर्वसाधारण पणे २५ किलो नत्र, १०० किलो स्पुरद, १०० किलो पालाश व १० किलो मायक्रोडील ग्रेड १ जमीन तयार करते वेळी टाकावे. यानंतर गरज पडेल त्या नुसार ठिबक द्वारा अमृत गोल्ड वाटर सोल्युबल खते, पंपाचे नोझल काढून अमृत प्लस ड्रेंचींग कीट ची आळवणी व मायक्रोडील ग्रेड २ ची फवारणी करावी. असे केल्याने पिकात फुलोरा येण्यापूर्वी, पानात गोड तत्व अधिक प्रमाणात जमा होईल.

जलव्यवस्थापनात ड्रीप सोबत स्प्रिकलर देखील लावावेत. नियमित हलके पाणी देणे चांगले असते. पावसाळ्यात व हिवाळ्यात पाणी कमी लागेल. हवेचे तापमान संतुलन करण्यासाठी स्प्रिकलरचा वापर संयुक्तीक ठरतो. मुळाभोवती अतिरिक्त ओलावा तयार होणार नाही व हवा खेळती राहील हे बघावे.

सर्वसाधारण पणे या पिकात किडींचा फारसा त्रास होत नाही. एकरी २० पिवळे व ५ निळे चिकट सापळे लावल्याने रससोशक किडी नियंत्रणात रहातील. नियमित पद्धतीने तणनियंत्रण करावे. दर दोन महिन्याला मजूर लावून तणे काढून टाकावीत.

लागवडीनंतर सर्वसाधारण ४ ते ५ महिन्यात पहिली काढणी करावी. त्यानंत दर ३ महिन्याला काढणी करता येते. निट निगा राखल्यास तीन वर्ष उत्पादन मिळते. फुलोरा सरू होण्यापूर्वी काढणी करावी कारण त्यावेळी पानात अधिकतम गोडी असते. काढणी करते वेळी खालचा १५ सेमी भाग सोडून वरील फांद्या काढाव्यात. दोन दिवस चांगल्या सुकवाव्यात व पाने वेगळी करून त्यांची पावडर साठवून ठेवावी.

प्रत्येक भारतीयाने वाचावे असे पुस्तक

पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

सर्वकाही चांगले राहिल्यास एकरी अडीच टन उत्पादन मिळते.

मित्रहो हि माहिती इंटरनेटवर संकलित, भाषांतरीत करून लेखात रुपांतरीत केलेली आहे. कुठलेही आर्थिक निर्णय घेण्याअगोदर आपण हि माहिती पडताळून पहावी.

महत्वाच्या व संदर्भीय लिंक्स 

  1. स्वीटन स्टीव्हीआ - द इकोनोमीक्स टाइम्स - स्पॉट लाईट फेब्रुवारी ४-१०, २०१८
  2. राष्ट्रीय औषधी वनस्पती अभियान
  3. ३० टक्के अनुदान
  4. पाटील बायोटेक तंत्रज्ञान
  5. प्युअर सर्कल या कंपनीचा संपर्क