Call 9923974222 for dealership.

वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग दहाव्वा )

मित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या नियोजनावर भर देत आहोत. सोबतच इतर काही बाबीं ज्या आपल्या यशावर परिणाम करतात त्यांच्या विषयी देखील जाणून घेत आहोत. (जर आपण या पूर्वीचे भाग वाचले नसतील तर नक्की वाचा. याच पानावर त्याच्या लिंक्स मिळतील)

अनेक शेतकरी मित्रांनी फोन करून व प्रतिक्रिया देवून आपले मत मांडले आहे. मी त्यांचा फार आभारी आहे. चर्चेशिवाय प्रगती होणे शक्य नाही व प्रतिक्रियेच्या माध्यमातून केलेली चर्चा जास्त उपयोगी असते. आपण या प्रक्रियेत भाग घ्याल अशी मला खात्री आहे. 

या भागात आपण स्वत:ला शिस्त लावून वेळ कसा वाचवू शकतो याचा विचार करू. मला सांगा तुमचा सगळ्यात जास्त वेळ कशात जातो?

एकादी वस्तू हवी असली व ती सापडत नसली कि आपला खूप वेळ वाया जातो. अगदी नाकापेक्षा मोती जड या म्हणी प्रमाणे एखाद्या कामाला जितका वेळ लागतो त्यापेक्षा अधिक वेळ त्या कामासाठी आवश्यक असणारी साधने शोधण्यात लागतो. कधी कधी त्यामुळे कामे होत सुध्दा नाहीत. हरवलेली वस्तू अनेक वेळेला अशा ठिकाणी मिळते जिथे ती ठेवायलाच नको होती! शेतकरी म्हटला कि त्याला अनेक साधने लागतात. उदय ने शेतावर फेरफटका मारल्यावर त्याला पिकाची वाढ खुंटली आहे असे जाणवले. वाढीचा वेग पूर्ववत करण्यासाठी त्यावर संजीवक व विद्राव्य खताची फवारणी करायची असे त्याने ठरवले. सर्व साहित्य जमवून फवारणी सुरु केल्यावर नोझल मधील डिस्क खराब झाली आहे हे त्याच्या लक्षात आले. तो शेतावरच रहात असल्याने घरी परत आला पण सामानात या चकत्यांचे पाकीट त्याला सापडले नाही. दिवस वाया जायला नको म्हणून त्याने पंपाचे नोझल काढून आळवणी केली. खत व मजुरी जास्त लागली शिवाय फवारणीतून जी परिणामकता साधता येते ती आळवणी ने येत नाही! चार दिवसांनी त्याच्या पत्नीने स्नानगृहातून ते चकत्यांचे पाकीट काढून दिले तेव्हा आपणच केलेली चूक उदय च्या लक्षात आली.  समान वेळीच योग्य जागेवर ठेवणे किती महत्वाचे आहे हे लक्षात असू द्या. 

अजयचे हातपाय लटलट करतात. काहीवेळा तो घरात व शेतात चक्कर येवून पडला आहे. त्याच्या घरात कुणालाच हे त्रास नाहीयेत. सर्व चेक करून झाले पण या आजाराचे मूळ सापडत नाहीये. दिवस जात आहेत, वडील म्हातारे होत आहेत, अजून त्याच्या शरीरात चांगली ताकद आहे; पण मुलाकडे पाहून त्यांना थकायला होते आहे. अनियमित जेवण, नियमित मद्यपान, भविष्याबद्दलची अनाकलनीय भीती यामुळेच अजयची तब्येत खराब आहे. स्वत:चे आरोग्य न सांभाळणे हा एक बेशिस्तपणाच आहे. शिस्तीने वागले कि सर्व आजार गायब होतील व कामांचा वेग व दर्जा वाढून भविष्याची भीती वाटण्याऐवजी मनगटातली ताकद "मुलाबाळांचे" भविष्य घडवू शकते.  

ज्या प्रमाणे पिकाला संतुलित खत मात्रेची गरज असते त्याच प्रमाणे शरीरासाठी देखील संतुलित आहाराची गरज असते. आपल्या आहारातून प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध, जीवनसत्वे, मिनरल्स मिळाली पाहिजेत. तुम्ही किती खाता हे महत्वाचे नसून काय खाता व कसे खाता हे महत्वाचे आहे. भारंभार खाल्याने शरीर जड होते तर नको तसा उपवास केल्याने अशक्तपणा येतो. या दोघी अश्या घटना आहेत ज्यामुळे तुमची कामे वेळेवर व योग्य दर्जाची होत नाहीत. नियमित संतुलित व वैविध्यपूर्ण आहार, सोबत योग्य तो व्यायाम यातून आपण शिस्तबद्धता रुजवू शकतो!  

फवारणी करते वेळी वापरायची सेफ्टी कीट फक्त रु ५००/-
----------------------------------

काही घरातील पुरुष कधीच घरी सापडत नाहीत. गावातील चौक, पार व चावडी हि त्यांची ठिकाण असतात. माणसाने सामाजिकदृष्ट्या मिळूनमिसळून रहाणे चांगले असते पण उठसुठ चौकात, पारावर किंवा चावडीवर बसून नुसत्या रिकाम्या बाता मारून व इतरांच्या कुरघोड्या करून आपण खूप वेळ वाया घालवतो. व्हाटसएप व फेसबुक हि वेळ वाया घालवायची नवी पद्धत आहे. हजारो ग्रुप मध्ये सहभागी होऊन काय मिळते? राजकारणी मंडळी आपल्या फायद्यासाठी लोकास या पध्दतीने स्वत:भोवती घोळत ठेवतात. तेव्हा या सवयींना आपण तिलांजली देणे जास्त श्रेयस्कर आहे. चार रिकामटेकड्या भामट्यांनी आपल्याला वाईट म्हटले तर चालेल पण आपण स्वत:ला शिस्त लावली तर थोरली मंडळी आपलेच गुणगान गातील हे नक्की.

मित्रहो वेळेच्या बाबतीत सर्वात महत्वाचा अनुभव म्हणजे कधी कधी वेळ कसा जातो हेच कळत नाही तर कधी कधी तो जाता जात नाही! जर आपण आपल्या वेळेचे नियोजन शिकलो व शिस्त लावली तर "वेळ न जाणे" हा अनुभव येणारच नाही.

स्वत:ला शिस्त लावण्याबद्दल तुम्हाला काय वाटतय ते नक्की लिहा. वेळ वाचवायचा व स्वत:ला शिस्त लावायचा तुमचा काय फंडा आहे? नक्की शेअर करा!

1 comment

  • खूप चांगली माहिती आहे, वेळेची सवय वेळेची बचत आणि शिस्त हे नक्की असायलाच पाहिजे त्याशिवाय वळण लागत नाही.

    भाष्कर शामराव माहुरे

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published