शेतकऱ्याने यशाचा शोध कुठे घ्यावा?

किसन ला सर्वदूर यशस्वी शेतकरी दिसत होते. पेपर मध्ये, टीव्हीवर, मासिकात, सत्कार समारंभात, फेसबुक व युट्यूबवर अनेक यशोगाथा त्याने बघितल्या. अनेकांनी दैदिप्यमान यश मिळवले होते. कृषीसम्राट, प्रगतीशील शेतकरी असे बिरूद मिरवणारे अनेक शेतकरी त्याने बघितले. तो काही यशस्वी शेतकरी बांधवांना जाऊन भेटला. सर्वांनी त्याचे स्वागत केले, त्याच्याशी चर्चा केली, शुभेच्छा दिल्या, मनोबल दिले. काहींनी आर्थिक मदत देण्याचे देखील कबूल केले व प्रत्यक्ष दिली देखील!

किसन या यशोगाथांनी प्रभावित झाला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास करून त्याने देखील शेतीकडे लक्ष दिले. तन-मन-धन लावून, सर्वस्व झोकून देत त्याने धडाडीने शेती केली. त्याला याचा फायदा होऊ लागला. त्याचे पंचक्रोशीत नाव झाले, त्याच्याकडे सुद्धा अनेक शेतकरी बांधव येवू लागले. तो तळमळीने बोलत असे, मदत करत असे. आर्थिक यश मात्र त्याला मिळत नव्हते, हे त्याला जाणवण होते. तो जगत होता, सर्वकाहि सुरु होते पण ज्याला उत्तरोत्तर प्रगती म्हणतात ती त्याला दिसत नव्हती. 

किसन यशस्वी शेतकरी होईल का? त्याला यश मिळेल का? तो कमीत कमी आपली गुंतवणूक तरी वसूल करू शकेल का?

शक्यता अतिशय कमी आहे. अगदी शून्य टक्यापेक्षा थोडी अधिक. किसन चे नाव अपयशी शेतकऱ्यांच्या यादीत सामील होईल. हि अपयशी शेतकऱ्यांची यादी प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यादी पेक्षा हजारो पटीने मोठी आहे. कुठल्याही पत्रकाराने, सत्कारकर्त्याने या अपयशी शेतकऱ्यांकडे कधी वळूनच बघितले नव्हते. त्यामुळे किसन समोरचे वास्तव व त्याने चोहो बाजूला अनुभवलेला यशाचा तामझाम यात मोठे अंतर होते. मूठभर पेरून सूपभर उगवून देखील यश अजून क्षितिजावरच दिसत होते. किसन आता डगमगु लागला. त्याने लोकांना भेटणे बंद केले. मनातल्या मनात कुढणे सुरु झाले. परिस्थिती, सिस्टीम व नशीब कसे खराब आहे हे विचार त्याच्या मनात घेर घालू लागले. 

जीवनात यशाचे इतके उदात्तीकरण केले जाते कि आपण नक्की यशस्वी होऊ असा निष्कर्ष काढणे सोपे जाते. किसनने आपण लवकरच आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ अशी अपेक्षा उरी बाळगली होती. जगात यशापेक्षा अपयश जास्त आहे हे लक्षात न ठेवल्यामुळे  किसन अपयशी ठरला, टिकून रहाण्यात अपयशी ठरला

काही चित्रकारांची चित्रे कोट्यावधी रुपयात विकली जातात. या प्रत्येक यशस्वी चित्रकारामागे तुम्हाला शेकडो असे चित्रकार मिळतील ज्यांची चित्रे विकलीच जात नाहीत. त्यांच्याही पाठी असे चित्रकार आहेत ज्यांची चित्र लोकांनी बघितली देखील नाही. त्यांच्याही पाठी असे चित्रकार आहेत ज्यांची चित्र कधी पूर्णच झाली नाहीत. अनेक चित्रकारांच्या चित्र काढायच्या संकल्पना फक्त विचारच राहिल्या. असे सर्वासोबत होते. गायिका असो कि उद्योजक, लेखक असो कि कवी, अभिनेता असो कि दिग्दर्शक, आर्कीटेक असो कि वकील, अपयश हे यशापेक्षा नेहमीच उदंड राहिले आहे.

नव्याने सूरु होणाऱ्या उद्योगातील  ९० टक्के उद्योग पहिल्या पाच वर्षात बुडतात व त्यापुढील पाच वर्षात त्यातील ९० टक्के उद्योग गुंढाळले  जातात. यशाची गोष्ट सोडा...साधे टिकून रहाणे देखील कुणाला जमत नाही.  

जर तुम्ही कधी थोडेही यशस्वी झालात व यशातील आपल्या गुणांचा मागोवा घेतला तर हे लक्षात येईल कि अपयशी झालेल्या अनेक व्यक्तीमध्ये तुमच्या सारखे गुण होते, तरी ते अपयशी ठरले. 

यशाचा शोध घ्यावा तरी कुठे हा प्रश्न आता तुमच्या मनात यक्षा प्रमाणे उभा असेल. घाबरून जावू नका. आपल्याला यश मिळेल अशी अवास्तव अपेक्षा करण्यापेक्षा जर तुम्हाला टिकून रहायचे असेल तर अपयशी लोकांना अधून मधून भेटत रहा.  त्यांच्या फसलेल्या नियोजनाचा अभ्यास करा. हा अभ्यास तुम्हाला खिन्न करू शकतो पण तुमच्या मनातील संकल्पना स्पष्ट रहातील. अपयश हि यशाची पहिली पायरी असते हे विसरून जावू नका. आपल्या व इतरांच्या छोट्या-मोठ्या अपयशाची कारणमिमासा करणे आवश्यक आहे.  यासाठी व्यवहारिक चातुर्याचा वापर महत्वाचा आहे.  अपयशाच्या अभ्यासातून तुम्ही टिकून रहायला शिकाल. स्पर्धेत टिकून रहाणारया लोकांनाच यशस्वी व्हायचा चान्स मिळतो. 

ससा व कासव या स्पर्धेत कासव निर्विवाद विजेता ठरला कारण सश्याने अपयशाचा विचारच केला नव्हता व कासवाने शर्यात्तीत टिकून रहात अपयश टाळण्याचा प्रयत्न सुरु ठेवला होता. अपयश टाळण्याचा प्रयत्न करणे हि गोष्ट त्याची जिद्द दाखवते तर झोपलेला ससा बघून तो थांबला नाही हि गोष्ट त्याची कामाप्रती निष्ठा दाखवते. थांबून "सश्याला उठवले नाही" हि गोष्ट त्याचे व्यवहार चातुर्य दाखवते. 

मित्रहो, स्वत:च्या व इतरांच्या अपयशात "निर्वीवाद यशाचा शोध सुरु ठेवा;  त्याला जिद्द, निष्ठाचातुर्याची जोड द्यायला विसरू नका".  यश तुमचेच आहे व राहील.  

  

प्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

 

आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.