वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग सातवा)

वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग सातवा)

मित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या नियोजनावर भर देत आहोत. सोबतच इतर काही बाबीं ज्या आपल्या मानसिकतेवर परिणाम करतात त्यांच्या विषयी देखील जाणून घेत आहोत. (जसे मागील भागात आपण "सोशल प्रुफ" मुळे आपण कसे चुकीचे निर्णय घेतो हे बघितले.)

अनेक शेतकरी मित्रांनी फोन करून व प्रतिक्रिया देवून आपले मत मांडले आहे. मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांच्याशी चर्चा करते वेळी मी स्वत: वेळेच्या तीन नियमांबद्दल वाचत होतो व मी त्यातील मुद्दे शेतकरी बांधवांशी शेअर केले. असे करतांना ," वेळेच्या या नियमांचा अनुभव शेतकरी बांधवांना देखील येत असतो" असे मला जाणवले. या लेखात दिलेली बहुतेक माहिती शेतकरी मित्रास अगोदरच ज्ञात आहे पण हे ज्ञान प्रत्यक्षात वापरायला ते विसरून जातात. हे लेख वाचून आपल्याला हे नियम वापरायला प्रेरणा मिळेल व हे नियम केव्हा व कुठे वापरून घ्यायचे हे तुम्ही ठरवाल अशी अपेक्षा आहे.

बहुतेक वेळेला काम करतांना ते काम सर्वोत्तम पद्धतीने व्हावे असा आपला प्रयत्न असतो. अचूक पद्धतीने काम झाल्याने मोठे मानसिक समाधान मिळते. वेळेचा नियम असे सांगतो कि एक काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला जेव्हडा वेळ लागतो त्या वेळेच्या २० टक्के वेळेत आपले काम ८० टक्के पूर्ण झालेले असते व उर्वरित २० टक्के काम करण्यासाठी आपण उरलेला 80 टक्के वेळ देतो. या नियमाच्या  आधारे आपण आपली व्यग्रता कमी करू शकतो. जर ८० टक्के काम पूर्ण झाल्यावर आपल्याला १०० टक्के कामाचा फायदा होत असेल तर उर्वरित २० टक्के काम सोडून देवून आपण 80 टक्के वेळ वाचवू शकतो. राजहंस जसे "दुधातील" पाणी सोडून देतो तशीच हि गोष्ट आहे. या नियमाला वेळ व्यवस्थापनात पॅरेटो चा नियम म्हणतात. तुम्ही हा नियम कुठे वापरू शकतात? प्रतिक्रियेत लिहा जेणेकरून चर्चा होईल!

पॅरेटोच्या नियमाला साधर्म्य असलेला दुसरा नियम आहे तो म्हणजे पर्किन्सचा नियम. ठरवून केले तर काही कामे नेहमी पेक्षा कमी वेळेत पूर्ण होतात. याला आपल्या कडे "लगबग" म्हणतात. जेव्हा आपण एखादे काम रोजंदारीवर देतो तेव्हा मजुर एका दिवसात किती काम करतो व तेच काम आपण त्याला अंगावर दिले तर ते काम किती वेळेत पूर्ण होते याचा आपल्याला अनुभव आहेच! वेळ व काम यांची सांगड घालायची असेल तर आपल्याला प्रत्येक काम लगबगीने आवरायला हवे. अगदी वाचन व लेखन करते वेळी देखील लगबगीचा नियम लागू होतो. पुढील काम करते वेळी तुम्ही हा प्रयोग करून बघा!

 वेळेचा तिसरा नियम प्रहरावर आधारित आहे. जर तुम्हाला शेतावर फवारणी करयाची असेल किंवा पिकास पाणी द्यायचे असेल तर सायंकाळी चार नंतर व सकाळी १० अगोदर करावी असा नियम विज्ञानावर आधारित आहे. त्या मुळे पिकास फवारणी तील औषध किंवा जमिनीतल पाणी शोषून घेण्यास वेळ मिळतो. एकदा सूर्य तळपायला लागला कि बाष्पीभवनाचा वेग वाढतो व शोषण व्हायच्या ऐवजी वाफा तयार होतात. अगदी हाच  नियम शेतात काम करणाऱ्या व्यक्तीस देखील लागू होतो. सावली किंवा कमी गरमीच्या वेळी लगबगीने काम केल्यास दुपारच्या वेळी आराम करता येतो. दुपारी आराम केला तर चार वाजे नंतर ताजेतवाने वाटते व अंधार पडायच्या आधी जास्तीत जास्त काम होऊ शकते. हा नियम कोणत्याही कामाची तुमची "चांगली" वेळ कोणती हे शोधून नेमक्या त्याच वेळेत ते काम करून घ्या असे सुचवतो. जसे विद्यार्थी सकाळच्या वेळी "कमी वेळेत जास्त ज्ञान ग्रहण" करू शकतात. एक शेतकरी म्हणून तुम्हाला कोणकोणती कामे करायची असतात याची एक यादी बनवून ते काम करायचा योग्य प्रहर कोणता याचा विचार करून पुढील वेळी हा नियम लागू करायचा प्रयत्न करा!

 तुम्हाला हा लेख कसा वाटला ते प्रतिक्रियेत नक्की लिहा! 

वेळ वाचवण्यासाठी अधून मधून त्यासंबंधी पुस्तके वाचल्याने वेळ वाचवाची प्रेरणा सातत्याने जागृत ठेवता येते. खाली दिलेल्या पुस्तकांच्या फोटो वर क्लिक करून हवे ते पुस्तक खरेदी करू शकता!

---------
Back to blog