अपयशाचे घोंगडे फेकून द्या कारण "यश" फक्त तुमची वाट पाहते आहे!

अपयशाचे घोंगडे फेकून द्या कारण "यश" फक्त तुमची वाट पाहते आहे!

ममताचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सुमित, तिचा नवरा, रात्री उशिरा पार डुलत डुलत घरी आला. व्यापारी, सरकार व यंत्रणेविषयी तो शिवराळ भाषेत बोलत होता. ममताने त्याला धरायला हात पुढे केला तेव्हा तो हातही त्याने झटकून टाकला. तोडातल्या तोंंडात काही पुटपुटत, अगोदरच तयार करून ठेवलेल्या बिझान्यात तो झोपी गेला. त्याला घरी सोडायला आलेली माणसे देखील डोलतच होती. स्वतच्या मजेसाठी हि माणसे इतरांना फूस लावतात, यांच्या कडून कसलीही अपेक्षा करणे चुकीचे असते, हे तिला चांगलेच ठावूक होते. ममता समोर त्यांची फारशी बिशाद नव्हती. तिच्या नजरेत नजर मिळवायची कुणाचीही हिम्मत नसल्याने माना खाली घालून त्यांनी पळ काढला.  आता त्याचे, सुमितचे, डोके व शरीर ठिकाणावर नसतांना त्याला जेवणाविषयी बोलायचे तिने टाळले. "एव्हडा उमदा माणूस एक रात्र भुकेला झोपला तरी काय बिघडत नाही आणि कदाचीत पिता पिता त्याने काही खाल्लेलंच असेल."  तिने मनोमनी विचार केला. 

-------------------------------
वीज गेल्यावर चार तास प्रकाशमान रहाणारा बल्ब
---------------------------------------

सकाळी ममताला जाग आल्यावर कालचा विषय काढायचा नाही हे तिने अगोदरच ठरवले. निरुपयोगी विषयांना महत्व दिल्याने तो तिच्यापासून दूर जाईल हे तिला चांगलेच माहित होते. सुमित ने शेतावर शेडनेट, तळे अशी कामे हाती घेतल्याने त्याचा हात थोडा तंगीत होता. अवकाळी वातावरणामुळे उत्पन्न हवे तसे नव्हते. परिस्थिती बदलेल याची त्याला खात्री होती पण प्रत्येक प्रयत्नवादि माणसाला थोडीतरी अपयशाची भीती असतेच! त्याच्या मनातील "अपयशाची भीती" काही बांडगुळांनी ओळखली होती. तो धागा पकडून हि मांडळी त्याला सायंकाळी घेरत. मद्यपानाचा बेत आखत, गप्पा मारत आणि मनाला बळ देण्याऐवजी नकारात्मक विचार मांडत.

ममताचे एकच लक्ष होते "इतरांनी टाकलेले, नवऱ्याच्या डोक्यातले, अपयशाचे घोंगडे काढून फेकायचे. यापूर्वी त्याने अपार कष्ट व जिद्दीने कसा संसाराचा गाडा व्यवस्थित ठेवला आहे एव्हडे पटवून द्यायचे. संकटकाळी हिम्मत टिकवली तर भविष्यात "यश" त्याच्या सारख्या हुन्नरी माणसांचीच वाट पहात असते हे त्याच्या मनात ठासून द्यायचे!". ती मनाची पक्की होती!

सुमितला जाग आली तेव्हा सूर्यप्रकाश पूर्ण प्रखरतेने पसरलेला होता. रात्रीच्या नशा-पाण्यामुळे त्याचे डोके दुखत होते. मनातील अपयशाची धग अजून कमी झालेली नव्हती. तो खूप नशेबाज नव्हता म्हणूनच कि काय त्याला ममताच्या सामोरे जायची हिम्मत होत नव्हती. तो उगाचच बिछान्यात, घोंगडे ओढून, तोंड लपवत, पडला होता. आता परत झोप लागणार नव्हतीच त्यामुळे तो सारखी चूळबुळ करीत होता.

ममताने हि गोष्ट ताडली. स्वत:च्या हाताने बनवलेल्या व सुमितला आवडणारया चहाचे दोन कप घेवून त्याच्या पुढ्यात येवून बसली. कपाच्या आवाजाने, चहा च्या सुगंधाने आणि तिच्या हातातल्या बांगड्यांच्या किणकिणीतुन सुमितला जे समजायचे ते तो समजला. ममता आपल्याला हतबल होऊच देणार नाही, आपला आत्मविश्वास डगमगू देणार नाही, हे त्याला चांगलेच ठावूक होते. तो उठून बसला. चहाच्या झुरक्या घेता घेता, दोघी मनातल्या मनात हसत होते. लग्नाला एव्हडी वर्ष होऊनही "ममताच्या टपोऱ्या डोळ्यांचे व हसऱ्या चेहेऱ्याचे" त्याचे वेड कसूभरही कमी झालेले नव्हते. "असे काय पहाताय माझ्याकडे?" ती लाजतच म्हणाली. तो गालातल्या गालात हसला. "तुमच्या आवडीच्या आळूच्या वड्या तळल्या आहेत!" कपबशा आवरत ती एव्हढेच बोलली आणि स्वयंपाकखोलीकडे निघाली. सुमितने उठता उठता बिछान्यावरचे घोंगडे "गुंढाळून" ठेवले व अंघोळीसाठी स्नान गृहात गेला कारण त्याला लगबगीने मार्गस्थ व्हायचे होते...यशाच्या वाटेवर! 

"दुष्काळातील संधी: हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती" हा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Back to blog