शेतकऱ्यासाठी जमीन, मजूर व भांडवल या नंतरचे चौथे महत्वाचे आर्थिक संसाधन कोणते?

शेतकऱ्यासाठी जमीन, मजूर व भांडवल या नंतरचे चौथे महत्वाचे आर्थिक संसाधन कोणते?

भाग पहीला

आपल्याजवळ कोणती आर्थिक संसाधने उपलब्ध आहेत असे जर आपण एक शेतकरी म्हणून विचार केला तर -जमीन जुमला - मजूर, कामगार - स्थिर व खेळते भांडवल हे मुद्दे लगेच लक्षात येतात. चौथे असे कोणते संसाधन आहे जे सर्व शेतकरी बांधवांकडे सारख्याच प्रमाणात उपलब्ध आहे व एकदा वाया गेले कि त्याचे तिळमात्रही शिल्लक रहात नाही?

वेळ!

हो बरोबर ओळखले आपण. अनेक वेळा शेतकरी बांधव बोलूनही दाखवतात कि मी ज्या पद्धतीने शेती करतो आहे त्यापेक्षा उत्तम करू शकतो पण मला वेळ पुरत नाही! 

मित्रहो, वेळ हा व्यवस्थापनाचा मुद्दा आहे. जसा आपण पैशाचा हिशोब ठेवतो तसा वेळेचाही हिशोब ठेवायला हवा कारण एकदा हातून निसटलेली वेळ कुणालाच परत मिळत नाही. तुमच्या जवळ जितका वेळ आहे तितक्याच वेळेत तुम्हाला महत्वाची कामे, दैनंदिन कामे  व फुरसतीतील कामे आटोपायची असतात.  समजा आपल्याजवळील कामांची आपण विभागणी केली तर व्यवस्थापन चांगले होईल.

  • महत्वाचे व तत्काल काम
  • महत्वाचे पण फुरसतीचे काम
  • दुय्यम पण तत्काल काम
  • दुय्यम व फुरसतीचे काम

आपल्या जवळील वेळेची देखील विभागणी करणे शक्य आहे. बहुवार्षिक कामे, येत्या वर्षभरातील कामे, सहमहितील कामे, या महिना-पंधरवड्यातील कामे, चालू आठवड्यातील कामे, उद्याची कामे, आज सायंकाळी-दुपारी व सकाळची कामे!

१. महत्वाचे व तत्काल काम: हे काम तुम्हाला आजच करावेच लागणार आहे. तुम्ही पुढील आठवडयात काढणीचा विचार केला होता पण वातावरणात बदलण्याची शक्यता आहे. आज केले नाही तर हाती काहीच येणार नाही. गोठ्यातील गायी-म्हशींचे दुध काढणे वेळेवर केले नाही तर दुधाचा उतारा कायमस्वरूपी कमी होऊ शकतो. रात्रीच्या पावसामुळे शेतात साठलेल्या पाण्याला लवकरात लवकर वाट काढून दिल्याने वाफसा निर्मिती होऊन पिके जोमाने वाढतील नाही तर मूळकुज होईल. वारा-वादळाने नुकसान झाले तर पाठपुरावा करून लवकरात लवकर पंचनामा करून घ्यावा जेणे करून पुढील कामे मार्गी लागतील.

२. महत्वाचे पण फुरसतीचे काम: हि कामे महत्वाची असतात पण हाती थोडा अवधी असतो. जसे पूर्वतयारी, नियोजन, संकटपूर्व  तयारी इ.. यात तुम्ही आर्थिक व  मजूर व्यवस्थापन, पुढील हंगामासाठी करायच्या सुधारणा, सल्लामसलत, विक्री व्यवस्थापनेतील सुधारणा/बदल, नवीन तंत्रज्ञान व कौशल्याचा अभ्यास, सराव, कार्यशाळा व प्रदर्शनात भाग घेणे या गोष्टींचा समावेश करू शकता. 

 वेळेची बचत, खर्चाची बचत, खताची बचत असे तिहेरी फायदा देणारे प्लानटिंग मशीन आता पाटील बायोटेक च्या स्टोअर वर उपलब्ध. महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पार्सल सेवे द्वारा पाठवण्यात येईल, शिपिंग निशुल्क.

३. दुय्यम पण तत्काल काम: हि कामे महत्वाची नसतात पण लगेच करावी लागतात. दारावर आलेल्या विक्रीप्रतीनिधीला भेटणे, फोनवर बोलणे. कधीकधी शेतातील काही कामे देखील यात असू शकतात. शेतातल्या काही सुधारणा किंवा स्वच्छतेची काही कामे. हि दुय्यम दर्जाची कामे असल्याने दुसऱ्याकडून करून घेतलेली चांगली. समजा विक्री प्रतिनिधीने दारात आला व लगेच वेळ द्या असे म्हटले तर त्याचे म्हणणे खरच महत्वाचे आहे का ते तपासायला हवे. त्याच्या कडील माहितीपत्रक मागून घ्यावे, वाचून नंतर बोलवतो असे सांगावे. फोन करणाऱ्या व्यक्तीला नंतर योग्य वेळी फोन करायला सांगावे.  

४. दुय्यम व फुरसतीचे काम: लक्षात ठेवा हि देखील कामेच आहेत पण महत्वाची नाहीत. आजतरी अजिबात नाही. कदाचित हि कामे दुसरे कुणी करू शकेल! आपला वेळ का घालवायचा यात? वेळ असेल तेव्हा करावीत.

पहिल्या व दुसऱ्या प्रकारातील कामे सारख्याच महत्वाची असू शकतात पण दुसऱ्या प्रकारची कामे करायला थोडा वेळ उपलब्ध असतो. पहिल्या प्रकारातील कामे प्रकर्षाने करावीत.  पण सातत्याने या प्रकारातील कामे केल्याने तणाव निर्माण होतो म्हणून दुसऱ्या प्रकारातील कामे करत राहिल्याने ती पहिल्या प्रकारात यायच्या आधीच आटोपलेली असतात व तणाव निर्माण होत नाही. दुसऱ्या प्रकारातील कामे होण्यासाठी तिसऱ्या व चौथ्या प्रकारातील कामाकडे दुर्लक्ष करणे किंवा ते इतरांवर सोपवणे जास्त व्यवहार्य आहे. 

हि झाली कामांची विभागणी, वेळेची विभागणी कशी करावी हे पुढील भागात पाहू.

 

क्रमशः

Back to blog