Click Here for Product Demand Form

वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग बाराव्वा )

मित्रहो, वेळ आली आहे शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची या सदरात आपण वेळेच्या नियोजनावर भर देत आहोत. सोबतच इतर काही बाबीं ज्या आपल्या यशावर परिणाम करतात त्यांच्या विषयी देखील जाणून घेत आहोत. (जर आपण या पूर्वीचे भाग वाचले नसतील तर नक्की वाचा. याच पानावर त्याच्या लिंक्स मिळतील) 

या भागात आपण शेतकऱ्याने वेळापत्रक का व कसे ठरवायचे हे बघू.

केव्हा काय पेराल? हा लेख तुम्ही वाचला आहे का? या लेखात एक तक्ता दिलेला आहे व तक्त्यात दिलेली माहिती शेतकरी बांधवास अगोदरच माहिती आहे पण तरीही या तक्त्यामुळे त्यास अधिक चांगला निर्णय घेता येतो. एकूणच लिखित स्वरूपातील मांडणी समोर ठेवली तर अधिक चांगले निर्णय घेता येतात, हे स्पष्ट आहे.  

शेतीचे काम म्हणजे ऑफिसमध्ये बसून मिटिंग घेण्याइतके सरळ नसते त्यामुळे शहरी लोकं किंवा उद्योजक जसे वेळापत्रक बनवतात तसे शेतकरी बांधवास शक्य नाही. तरीही वेळापत्रक बनवले जावू शकत नाही असे नाही. वेळापत्रक बनवतांना बहुवार्षिक, वार्षिक, सहामाही, तिमाही, पंधरवाडा, सप्ताह व दिवस असे टप्पे बनवता येतील.

प्रत्येक दिवसाचे प्रहरानुसार वर्गीकरण असते व त्यानुसारच आपली कामे चालतात. दैनंदिन दिनचर्या वेगळी करून एक शेतकरी म्हणून करायची कामे तासिकेच्या पद्धतीने लिहून ठेवली तर वेळापत्रक तयार होते. 

वेळापत्रकात नित्य कामाव्यतिरिक्त आपले शेतीविषयक लक्ष्य नोंदवून त्याचा आढावा तीन महिन्यातून एकदा घेण्यासाठी वेळ ठरवावी. रोजचा हिशोब लिहायची वेळ ठरवावी व दर आठवड्याला याचा आढावा घेण्यासाठी वेगळा वेळ द्यावा.

कोणती खते/कीटकनाशके वापरली? किती प्रमाणात वापरली? काय फायदा झाला? या नोंदी लिहून त्यावर आधारित नवीन माहिती मिळवण्यासाठी वेळ काढायला हवा. जर वेळा पत्रक तयार केले तर कधीच न होणारे हे काम नक्की होईल.

आधुनिक शेतकरी विविध प्रकारची यंत्रे वापरतो, त्यांचा रखरखाव व नवीन यंत्रसामुग्रीचा अभ्यास महत्वाचा आहे वेळापत्रकात यासाठी वेगळा वेळ निश्चित केला जावू शकतो.

जर तुम्ही पशुपालन करत असाल तर प्रत्येक जनावराच्या दुभत्या काळाच्या व ततस्म नोंदी करणे, त्यानुसार नियोजन करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही या नोंदी नीट ठेवल्या तर जनावर जास्तीत जास्त काळ दुभते ठेवणे शक्य आहे. वेळापत्रक या कामी तुमची मोठी मदत करेल. 

नियमित वचनामुळे ज्ञानसंपदा प्राप्त होते. तेव्हा पुस्तके मिळवणे, चाळणे, वाचणे व त्यातून नोंदी लिहून घेणे महत्वाचे आहे. वेळापत्रकात यासाठी वेळ दिला तर उतरोउतर प्रगती होईल यात शंका नाही. 

स्वत:च्या व कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मानसिक गरजांचा विचार होणे गरजेचे आहे. पूर्वी अनेक प्रथा व सणवार होते तेव्हा उत्सव व संवादाच्या माध्यमातून  मानसिक गरजा पूर्ण केल्या जात. आता तसे राहिलेले नाही. आपल्या मनाची व नात्यांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने योग्य वेळ देणे महत्वाच्चे आहे. वेळापत्रकात याचादेखील सहभाग महत्वाचा आहे.  

मित्रहो तुम्ही वेळापत्रक तयार करायला हाती घ्या व त्यात वरील मुद्याचा समावेश करा.

आपल्याजवळील कामांची आपण विभागणी केली तर व्यवस्थापन चांगले होईल.

  • महत्वाचे व तत्काल काम
  • महत्वाचे पण फुरसतीचे काम
  • दुय्यम पण तत्काल काम
  • दुय्यम व फुरसतीचे काम

१. महत्वाचे व तत्काल काम: हे काम तुम्हाला आजच करावेच लागणार आहे. तुम्ही पुढील आठवडयात काढणीचा विचार केला होता पण वातावरणात बदलण्याची शक्यता आहे. आज केले नाही तर हाती काहीच येणार नाही. गोठ्यातील गायी-म्हशींचे दुध काढणे वेळेवर केले नाही तर दुधाचा उतारा कायमस्वरूपी कमी होऊ शकतो. रात्रीच्या पावसामुळे शेतात साठलेल्या पाण्याला लवकरात लवकर वाट काढून दिल्याने वाफसा निर्मिती होऊन पिके जोमाने वाढतील नाही तर मूळकुज होईल. वारा-वादळाने नुकसान झाले तर पाठपुरावा करून लवकरात लवकर पंचनामा करून घ्यावा जेणे करून पुढील कामे मार्गी लागतील.

२. महत्वाचे पण फुरसतीचे काम: हि कामे महत्वाची असतात पण हाती थोडा अवधी असतो. जसे पूर्वतयारी, नियोजन, संकटपूर्व  तयारी इ.. यात तुम्ही आर्थिक व  मजूर व्यवस्थापन, पुढील हंगामासाठी करायच्या सुधारणा, सल्लामसलत, विक्री व्यवस्थापनेतील सुधारणा/बदल, नवीन तंत्रज्ञान व कौशल्याचा अभ्यास, सराव, कार्यशाळा व प्रदर्शनात भाग घेणे या गोष्टींचा समावेश करू शकता.

३. दुय्यम पण तत्काल काम: हि कामे महत्वाची नसतात पण लगेच करावी लागतात. दारावर आलेल्या विक्रीप्रतीनिधीला भेटणे, फोनवर बोलणे. कधीकधी शेतातील काही कामे देखील यात असू शकतात. शेतातल्या काही सुधारणा किंवा स्वच्छतेची काही कामे. हि दुय्यम दर्जाची कामे असल्याने दुसऱ्याकडून करून घेतलेली चांगली. समजा विक्री प्रतिनिधीने दारात आला व लगेच वेळ द्या असे म्हटले तर त्याचे म्हणणे खरच महत्वाचे आहे का ते तपासायला हवे. त्याच्या कडील माहितीपत्रक मागून घ्यावे, वाचून नंतर बोलवतो असे सांगावे. फोन करणाऱ्या व्यक्तीला नंतर योग्य वेळी फोन करायला सांगावे.  

४. दुय्यम व फुरसतीचे काम: लक्षात ठेवा हि देखील कामेच आहेत पण महत्वाची नाहीत. आजतरी अजिबात नाही. कदाचित हि कामे दुसरे कुणी करू शकेल! आपला वेळ का घालवायचा यात? वेळ असेल तेव्हा करावीत.

पहिल्या व दुसऱ्या प्रकारातील कामे सारख्याच महत्वाची असू शकतात पण दुसऱ्या प्रकारची कामे करायला थोडा वेळ उपलब्ध असतो. पहिल्या प्रकारातील कामे प्रकर्षाने करावीत.  पण सातत्याने या प्रकारातील कामे केल्याने तणाव निर्माण होतो म्हणून दुसऱ्या प्रकारातील कामे करत राहिल्याने ती पहिल्या प्रकारात यायच्या आधीच आटोपलेली असतात व तणाव निर्माण होत नाही. दुसऱ्या प्रकारातील कामे होण्यासाठी तिसऱ्या व चौथ्या प्रकारातील कामाकडे दुर्लक्ष करणे किंवा ते इतरांवर सोपवणे जास्त व्यवहार्य आहे. 

 

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published