टोमॅटोवर प्रक्रिया उत्पादनातून मिळवा भरगोस नफा

टोमॅटोवर प्रक्रिया उत्पादनातून मिळवा भरगोस नफा

भाजीवर्गीय पिकात कांदा, बटाटा व मिरची सोबत टोमॅटोचे पिक व्यापारी पद्धतीने घेतले जाते. टोमॅटोला घरगुती मागणी व्यतिरिक्त औद्योगिक मागणी मोठ्या प्रमाणात असते कारण त्यापासून खेचअप, सॉस, प्युरी, पल्प, पावडर अशी उत्पादने बनवली जावू शकतात. 

टोमॅटो सूप, पिझ्झा, पास्ता, सॅडविचेस, रोल अश्या विविध व्यंजनात टोमॅटो प्रक्रिया उत्पादनांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. नेस्ले, हिंदुस्थान युनिलीवर, मेरिको, आय.टी.सी. अश्या ख्यातनाम कंपन्यांनी टोमॅटो प्रक्रिया उत्पादनांवर आधारित अनेक ब्रांड विकसित केल्याने हि उत्पादने आज घरोघरी पोहोचली आहेत. स्पर्धेचा भाग म्हणून या कंपन्या आता शहरी बाजारा व्यतिरिक्त ग्रामीण भागातहि पोहोचत आहेत. यातून या उत्पादनांची ओळख ग्रामीण भागात देखील झाली आहे. नवीन पिढीला या उत्पादनांचे मोठे आकर्षण आहे. या पार्श्वभूमीमुळे आता प्रचार-प्रसार हि उठाठेव अत्यल्प राहिली आहे. 

"सिर्फ १ रु मे" अश्या पद्धतीने या कंपन्या टोमॅटोची पाउचबंद उत्पादने आपल्या गाव खेड्यात येवून विकत असतांना आपल्या टोमॅटोला मात्र भाव मिळत नसतो. वाहतूक खर्च देखील निघणार नाही म्हणून आपल्याला टोमॅटो बांधावरच फेकून द्यावा लागतो. अशी दुर्दैवी घटना वरचेवर घडत नसली तरी जेव्हा असे घडते तेव्हा ती आपल्याला मोठी आर्थिक, मानसिक व सामाजिक  हानी करते.

खरे बघितले तर टोमॅटोचे पिक महा-खादाड व खर्चिक आहे. पूर्वमशागत, भरखते, जोरखते, ठिबक, मल्चिंग, बांधणी, औषधी, काढणी, वाहतूक, वेगवेगळ्या आकारण्या असा खर्चिक व भारंभार आहेर केल्याशिवाय उत्पादकता गाठणे अश्यक असते. सगळी मेहनत, वेळ व खर्च गृहीत धरल्यावर टोमॅटोला १० रूपयाच्या खालचे दर नुकसानीचे असतात. हि बाब लक्षात घेवून आपल्याला दर खालच्या बाजूला जायला लागले कि आपल्या नफ्याचे संरक्षण करणे गरजेचे ठरते. 

इतर सर्व व्यावसायिक अश्या प्रकारच्या नफा संरक्षणाला "हेजिंग" (व्दैध व्यवहार रक्षण) असे म्हणतात. व्यापारात हेजिंगचे महत्व अनन्यसाधारण असून व्यवसायात टिकून रहाण्यासाठी असे करणे महत्वाचे ठरते. अपुरे आर्थिक भांडवल, अज्ञान, दुर्लक्ष करण्याची वृत्ती, व्यावसायिक दृष्टीकोनाचा अभाव यातून शेतकरी वर्ग कधीच हेजिंगचा विचार करीत नाही. भाव गडगडू लागले कि टोमॅटोवर प्रक्रिया करून त्या उत्पादनांची ठोक व किरकोळ विक्री करणे शक्य आहे. यामुळे आपल्याला हेजिंगचा फायदातर होईलच शिवाय पुरवठा साखळीतील हरामखोर मानसिकतेला देखील चाप बसेल. 

वर सांगितल्याप्रमाणे टोमॅटोपासून खेचअप, सॉस, प्युरी, पल्प, पावडर अशी उत्पादने बनवली जावू शकतात. या व्यतिरिक्त टोमॅटोपासून लोणचे, पापड असे गावरान थाटणीचे पदार्थ देखील सहज बनू शकतात.  

प्रकिया उद्योगासाठी आपल्याला फळे धुणे, प्रतवारी करणे, क्रश करणे, पल्प बनवणे,शिजवणे, एकजीव करणे, फिलिंग-सिलिंग-लेबलिंग-पेकेजिंग अशा प्रक्रिया करणारी सेमी ऑटोमेटिक किंवा फुल्ली ऑटोमेटीक मशिनरी लागते. सेमी ऑटोमेटिक मशिनरी साठी ५ लाख तर ऑटोमेटिक साठी २०-२५ लाखाचा खर्च लागतो. 

कच्च्या मालात टोमॅटो व्यतिरिक्त तिखट, मीठ, साखर, सायट्रिक एसिड, मसाले, खाद्य रंग व प्रिझरवेटीव्ह यांची गरज पडते. 

त्याव्यतिरिक्त, छोटी सुरुवात करायला १०००-५००० वर्गफुट जागा व १५-२० किलोवॅट चा विद्युत पुरवठा लागतो. 

कागदी घोड्यांच्या बाबतीत एफ.एस.एस ए..आय.चा अन्न परवाना, जी.एस.टी. नंबर, उद्योग आधार व अग्निशमन विभागाचा नाहरकत दाखला यांची गरज पडते. यातली बरीचशी कागदपत्रे आजकाल घरबसल्या ऑनलाईन मिळवता येतात.  

समजा १ किलो उत्पादनासाठी, कच्चा माल, पेकेजिंग व प्रोसेसिंग खर्चाची बेरीज रु. ६०-७५ असली व विक्री ८५-९० रु किलोने झाली. ताशी १०० किलो उत्पादन घेतल्यास दिवसाकाठी ७-८ हजाराचा निव्वळ नफा निघू शकतो. 

उद्योगाच्या सुरवातीला लागणारा भांडवली खर्च करण्यासाठी "प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून" कर्ज मिळवले जावू शकते. 

मित्रहो, १९८०च्या दशकापासुन, वर्षातून एकदातरी टोमॅटो फेकला जातो आहे व साधारण याच दशकापासून प्रक्रिया उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. असे असूनही आजही हि उत्पादने बनवणाऱ्या शेतकऱ्याचा कारखाना मी तरी बघितला नाहीये. उद्योग म्हटला तर यश-अपयश सुरूच असते. प्रभावी आर्थिक व्यवस्थापण, चुणचुणीत कारभार, जिद्द अशी जोड बसली तर यश येतेच. प्रक्रिया उत्पादनाची उभारणी गावोगावी झाली तर शेतीतून पिकणाऱ्या मालाचे भाव ठरवण्याचे अधिकार काही अंशी तरी शेतकऱ्याच्या हाती येतील. आपले याबद्दल काय मत आहे? हा लेख आपणास कसा वाटला? ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा.

आवडला असेल व इतर बांधवांना उपयोगी ठरेल अशी खात्री असेल तर लेख शेअर करायला विसरू नका.

या संबंधित आमचे अन्य लेख वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा.

Back to blog