लखोबाला ठार कसे मारणार?
"तो मी नव्हेच" हे आचार्य अत्रे लिखित "सत्य घटनेवर आधारित" एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. बार्शीच्या कोर्टात हा खटला सुरु होता. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी "लखोबा लोखंडे" ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे.
लखोबा लोखंडे हा आरोपी विविध लोकांना नाना प्रकारची सोंगे घेऊन फसवतो आणि त्याबद्दल कोर्टात त्याच्यावर भरण्यात आल्येला खटल्यात स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करतो. त्याच्या विरोधातील प्रत्येकाला तो प्रतीप्रश्न करून निरुत्तर करतो.
माझ्या मते हा "लखोबा" प्रत्येकात असतो, हो अगदी माझ्यातही तो आहे.
तुम्ही आपल्याकडील कंपन्या, सोसायट्यांचे वार्षिक अहवाल वाचले आहेत का? समजा गेलेले वर्ष अतिशय चांगले होते, संस्थेने भरीव प्रगती केली असेल तर या वार्षिक अहवालात सोसायटीचे प्रमुख व इतर मान्यवर किती चांगले आहेत, त्यांनी कशी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे छापलेले असते. समजा या उलट झालेले असेल तर देशाची राजकीय स्थिती चांगली नव्हती, दुष्काळ पडला, कुणीतरी गबन केले असे मुद्दे दिलेले असतात. चांगले केले तर ते मी केले व वाईट झाले ते माझ्यामुळे नाही. असा हा लखोबा असतो.
समजा उसाला चांगले भाव मिळाले तर "साहेबांनी" दिले व "पैसेच नाही दिले" तर परिस्थिती वाईट आहे. जुलमी केंद्र सरकारने साखर आयात केली, उसाचे उत्पन्न खूप झाले, राजकीय अस्थिरता आहे, असा हा लखोबा आहे!
परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मी खूप मन लावून अभ्यास केला होता व नापास व्हायची वेळ आली तर पेपर कठीण होता, ऐन वेळी आजोबा वारले, टायफाइड झाला होता, शाळेत निट शिकवले नाही, पेपर खूप बारकाईने तपासले. असा हा लखोबा आहे!
माझा एखादा ब्लॉग खूप वाचला जातो, शेअर केला जातो त्यावर अनेक प्रतिक्रिया येतात कारण मी खूप अभ्यास करतो. सरळ-सुगम भाषेत लिहितो. जर एखादा ब्लोग शेतकरयांनी वाचलाच नाही, शेअर केला नाही, त्यावर प्रतिक्रिया दिल्या नाहीत तर? शेतकरयांना या विषयाचे ज्ञानच नाही, ते अशिक्षित अडाणी आहेत. असा हा लखोबा माझ्यातही आहे!
मित्रहो हा असा लखोबा तुमच्या मनातहि आहे का? हंगाम चांगला झाला तर तुमची प्रतिक्रिया काय असते व खराब झाला तर तुमची प्रतिक्रिया काय असते?
- पिकासाठी वाढीच्या कोणत्या काळात कोणते अन्नद्रव्य किती प्रमाणात वापरावे? हे आपण निक्षून सांगू शकता का?
- पिकावर विषाणू-जीवाणू-बुरशी येवू नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात हे आपण सांगू शकता का?
- घरगुती बियाणे वापरायचे असेल तर त्याची साठवण कशी करायची? त्यावर कोणती प्रक्रिया करायची?
- शेतावरच खते (जसे जीवामृत) बनवायची असल्यास, कोणता घटक किती घ्यायचा याचे शास्त्रीय विश्लेषण आपण करू शकता का? बनवण्याच्या प्रक्रीयेतील तांत्रिक मुद्दे सांगू शकता का?
जर आपणास या प्रश्नाची उत्तरे माहिती असतील तर तुमच्यात लखोबा नाही असे नक्की म्हणता येईल पण जर बहुतेक प्रश्नांची उत्तरे माहित नसतील तर इतर कुणालाही दोष न देता आपल्यातील लाखोबाचा वेध घ्या.
मित्रहो या लाखोबाला चांगले ठेचले पाहिजे. नाटकातील लखोबा बेरकी होता तो स्वत:चा फायदा पहात होता पण आपल्यातील हा लखोबा म्हणजे "कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ" आहे.
आपल्यातील अवगुणांचा वेध घेणे, आपल्या कृतीतील चुका शोधून दुरुस्त करणे महत्वाचे आहे. पण हे नेमके करायचे कसे? लखोबाला ठार कसे मारणार?
हे काम थोडे कठीण असले तरी "या कामाची गरज इतकी मोठी आहे कि किंवा तुमचा जो फायदा होणार आहे तो इतका मोठा असेल कि, त्यासमोर हे काम अगदीच सोपे आहे.
नोंदवही लिहायला व तिचा अभ्यास करायला सुरुवात करा. शेतीसंदर्भात जे छोटेमोठे प्रयोग तुम्ही करतात ते नोंदवून ठेवा. आमचा ब्लोग / शेतीविषयी पुस्तके वाचता वाचता जी माहिती महत्वाची वाटते ती नोंदवून घ्या. पुढे कधीतरी हे लिखाण नक्कीच उपयोगी होईल. पुस्तकी माहिती व प्रत्यक्ष अनुभव तपासून बघा.
तुम्हाला जिवलग मित्र आहे का? तुम्ही नशीबवान आहात! त्याच्याशी तुमच्या यशाच्या बढाया मारण्याऐवजी शेतीतील वेगवेगळ्या मुद्मयावर तुमच्या निरीक्षणाबद्दल व त्याच्या निरीक्षणाबद्दल चर्चा करा. एकमेकाच्या निरीक्षणा मधील सारखेपणा व वेगळेपणा नोंदवून ठेवला व त्याचा पाठपुरावा केला तर यातून अधिक चांगले व भक्कम निष्कर्ष तयार होतील.
मला या वेळी तुमची प्रतिक्रिया नकोय, त्याऐवजी तुमच्यातला "लखोबा" काय म्हणतोय व त्यला ठार करायची काय योजना तुमच्याकडे आहे ते लिहा!
लेख आवडला.योग्य माहिती मिळते.
नमस्कार 🙏 नमनाला घडा भर तेल असा प्रकार जाणवतो, असो ज्या मुद्याला घेऊन वा व्हायरस अज्ञानाचा मुद्दा घेतला त्याबाबत ज्ञानात भर पडेल असा एकही टिप्पणी नाही, तुम्हालाही विनंती राग मानू नये, प्रवचना चा धागा पकडून आम्ही कसे हुशार अन समोरचा किती अडाणी हि मांडणी सोडा, ह्याच अडान्या च्चा खिशावर नजर ठेवत त्यालाच टोचत राहायचे कसे बरोबर वाटते देवच जाणे, चुक नेमकी कशी ? ती शोधावी म्हणुन ब्लाॅग वाचावा तर वेळेचा अपव्यय ठरतो… धन्यवाद सस्नेह.. 🙏
आपलं बरोबर आहे
आपण जो मुद्दा मांडला तो अगदी लाख मोलाचा आहे, नक्कीच आपल्या सर्वात ऐक लाखोबा आहे, आपल्या कृतीतील चुका, बाहाने न देता दुरुस्त केल्या पाहिजेत.
आपले लेख नियमीत वाचतो.
आपले मार्गदर्शन मोलाचे आहे, मी आपला आभारी आहे 🙏
एकदम मस्त माहिती शेतकऱ्यांना( म्हणजे आम्हा सर्वांनाच) कायमच बढाया मारण्याची सवय असते कधीही ते खरी माहिती इतरांना देत नाही थोडेफार चांगले उत्पन्न झाले तरी ते वाढवूनच सांगतात भरमसाठ खतांचा औषधांचा वापर करूनही खूप कमी वापर केला आहे असेच भासवतात