वेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग चौथा)

वेळ आली आहे..शेतकऱ्याने स्मार्ट होण्याची (भाग चौथा)

वेळ म्हणजेच संपत्ती हे प्रत्येकाला ठावूक असते पण जो हि संपत्ती जपून वापरतो तो यशस्वी होतो. अनेकदा आपला वेळ वाया जातो. वाट पहाणे - प्रवास करणे या दोन घटना भरपूर वेळ घेत असतात. अनेकदा या वेळेचा दूरउपयोग केला जातो व नुकसान होते.

एका शेतकरी मित्राने त्याच्या शेतातील कांदा ट्रकने भरून बाजारपेठेकडे रवाना केला. सोबत त्याचा मुलगा व मुलाचे मित्र गेले. बाजारपेठेत सकाळी पोहोचायचे होते. प्रवासादरम्यान या मुलाने मित्रांसोबत ढाब्यावर जुगार खेळला, नशा पाणी केले. जुगारात तो २६,००० रु हरला! 10 टन कांदा विकून असा कितीक पैसा मिळणार होता?

एकूणच प्रवास करते वेळी आपल्या वेळेचा सदुपयोग होईल हे बघायला हवे. सराव व व्यक्तिमत्वानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वेळेचा सदुपयोग करणे शक्य आहे.

२४ तासापैकी आपण ८ तास झोप काढतो. हि झोप अत्यावश्यक असते. अनेक यशस्वी माणसे प्रवासादरम्यान झोप काढण्याला महत्व देतात. त्यामुळे ते जिथे पोहोचतात तेथे तप्तरतेने कामे करू शकतात. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर प्रवास करतात. बहुतेक वेळा ते प्रवासादरम्यान झोप काढतात. त्यांच्या या सवयीमुळे कमी काळात त्यांनी जगातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. गांधीजी देखील प्रवासादरम्यान झोप काढत.


काही लोकं प्रवासादरम्यान ठरवून मोबाइलवर बोलून काही कामे करून घेतात. कोणत्या व्यक्तींशी बोलायचे आहे याची लिस्टच त्यांचेकडे असते. अनेक कार्यमग्न लोकांना काम व प्रवासामुळे कुटुंबियांशी बोलता येत नाही. एग्रो कंपनीचे संचालक व बहुउद्योगी असलेले माझे मित्र प्रवासादरम्यान आजी, आजोबा, आई, वडील, पत्नी, भाऊ अश्या सर्व आप्तेष्टांशी भरपूर बोलून घेतात. हायवे ने प्रवास करते वेळी पेट्रोल पंपावर इंधन भरायला गाडी थांबली कि ड्रायव्हर ला सांगून हे पायी पायी पुढे निघतात. ड्रायव्हर गाडी घेवून मागून येतो तोपर्यंत यांची २ किलोमीटर इतकी रपेट झालेली असते!

एकदा दिल्लीला जाते वेळी एका सहप्रवाशाला बघून मला आश्चर्य वाटले. त्याने सोबत एक नवी डायरी आणली होती व संपूर्ण प्रवासात त्याच्या सात आठ स्मरणिकातील  (पॉकेट डायरी) निवडक नोंदी त्याने नव्या डायरीत लिहिल्या. त्याचे सर्व काम झाल्यवर माझ्या प्रश्नार्थक मुद्रे कडे पहात तो म्हणाला "या हिशोबातून माझे वाया जाणारे ९० हजार रु मी शोधून काढले आहेत! थंड बस्त्यात गेलेली कामेहि सापडली आहेत!  पुढच्या प्रवासात या बहाद्दराने देणेकरी असलेल्या लोकांना फोन लावले, त्यांना व्यवहाराची आठवण करून दिली. प्रवासातच या देणेकरी लोकांकडे माणसे पाठवून काही रक्कम वसूल देखील केली!

अनेक लोकं प्रवास करते वेळी हातावर हात धरून बसतात, इतर काही खात सुटतात, काही कानास हेडफोन लावून गाणे ऐकतात. हे चुकीचे आहे असे नाही पण योग्य आहे असे अजिबात नाही. निव्वळ गाणी कण्या ऐवजी तुम्ही एखादे दुसरे चागंले भाषण देखील ऐकू शकता!

 

या फोटोंवर क्लिक करून आपण स्व-सुरक्षे ची साधने खरेदी करू शकता. एमझोन वर या वस्तू अतिशय योग्य किमतीत उपलब्ध आहेत.

 

वाट पहाणे अनेक वेळा अपरिहार्य असते. ग्रामसेवकाची वाट पहाणे, कचेरीत कामासाठी लटकून पडणे असा भरपूर वेळ वाया जात असतो. हि वेळ देखील कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वाचवली जावू शकते. 

एक शेतकरी म्हणून अशा फावल्या वेळेत तुम्ही काय करू शकता?

  • नवीन पिकाबद्दल माहिती मिळवा
  • वेगवेगळ्या बाजारपेठां बद्दल माहिती मिळवा
  • नवीन प्रक्रिया उद्योगांची माहिती मिळवा
  • उपयोगी सरकारी योजनांची माहिती मिळवा
  • या ब्लॉग सारखे ब्लॉग शोधून काढा व वाचा!

इच्छा तिथे मार्ग आहे.... 

 

Back to blog