गहू लागवड व व्यवस्थापन -भाग 1

गहू या पिकाबद्दल माहिती घेण्या अगोदर गहू हे पिक आपण घ्यावे कि नाही? या प्रश्नाचे उत्तर शेतकरी बांधवांनी जाणून घ्यायला हवे. घ्यायचा असेल तर

 • किती क्षेत्र या पिकास द्यावे? व
 • उत्पादनाचे काय लक्ष्य ठेवावे?

हे मुद्दे देखील अतिशय महत्वाचे आहेत.

 • कोणकोणती  पिके घेतली जावू शकतात?
 • इतर कोणते पिक आपण घेवून आपण चांगला नफा कमवू शकतो का?
 • आपल्याकडे एकूण किती क्षेत्र आहे?
 • मृदेची अवस्था काय?
 • कोणत्या पिकासाठी बाजारपेठ अनुकूल आहे?
 • कोणत्या पिकापासून किती उत्पादन येईल? शाश्वत उत्पन्न किती?
 • पाणी साठा किती?
 • सर्वसाधारण वातावरणाचा कल कसा असणार आहे?
 • मनुष्यबळ किती उपलब्ध आहे?
 • यापूर्वीचा आपला काय अनुभव आहे? 
 • गहू पिक घ्यायचे असेल तर कोणते वाण निवडावे?
 • गहू कोणत्या ग्राहकासाठी घ्यायचा?

या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक शेतकरी बांधवासाठी वेगवेगळी असतील. असा चौफेर विचार करून निर्णय घ्यावा.

आयात निर्यातिच्या मागील तीन वर्षांचा अभ्यास केल्यास निर्यातीत आपला दहाव्वा नंबर आहेत व पहिल्या क्रमांकाच्या देशाच्या फक्त ७ ते ८ टक्के गहू आपण निर्यात करीत आहोत.

नेपाळ , अफगाणिस्तान हे आपल्या गव्हाचे मुख्य आयातक आहेत. या दोन देशांशी आपले राजकीय संबध कसे आहेत यावर आपल्या निर्यातीचे भवितव्य अवलंबून आहे

हमीभावाचा विचार केल्यास गेल्या पाच वर्षात हमीभावात सातत्याने थोडी-थोडी वाढ झाली असून २०१७-१८ सालचा हमी भाव १७.३५ प्रती किलो होता. हा हमीभाव आंतरराष्ट्रीय दरापेक्षा जास्त असून गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय भाव १२ ते १५ रु किलोच्या दरम्यान रेंगाळलेला आहे.एकूणच गहू निर्यातीच्या बाबतीत फार चांगले चिन्ह नाहीत हे लक्षात घ्यावे व आपला उत्पादित गहू हा देशांतर्गत बाजारात चांगला भाव कसा मिळवू शकेल? असे बघावे.

गहू या पिकाच्या सरबती, बक्षी(बन्सी) व खपली या तीन प्रजाती असून असून जलव्यवस्थापना नुसार वेगवेगळे वाण उपलब्ध आहेत. इथे त्याबद्दल संक्षिप्त माहिती घेवू.

 • जिरायती साठी पंचवटी हे बन्सी प्रजातीचे वाण असून तंबोरा रोगास प्रतिकार करते. रवा, शेवया, कुरडया बनवण्यासाठी उत्तम आहे
 • जिरायती साठी शरद (AKDW 2997-16)हे वाण चपाती व पास्ता बनवण्यासाठी चांगले आहे
 • जिरायती मध्ये मर्यादित सिंचन उपलब्ध असल्यास नेत्रावती (NIAW 1415) हे तंबोरा प्रतिकारक वाण चपातीसाठी चांगले आहे
 • वेळेवरील बागायती साठी तपोवन NIAW 917 हे तंबोरा प्रतिकारक सरबती वाण चपाती व पावासाठी उत्तम वाण आहे
 • वेळेवरील बागायती साठी गोदावरी NIDW 295 हे तंबोरा प्रतिकारक वक्षी वाण रवा, शेवया व कुरडयासाठी चांगले आहे
 • वेळेवरील बागायती साठी त्रंबक NIAW 301 हे चपातीसाठी उत्तम सरबती प्रजातीचे वाण आहे
 • बागायती उशिरा पेरणी साठी NIAW-34 सरबती प्रजातीचे तंबोरा प्रतिबंधक वाण चपातीसाठी चांगले आहे

पेरणीच्या योग्य वेळा

हि माहिती सामन्य निकषावर आधारित असून वातावरणातील बदल लक्षात घेवून वेळेत बदल होऊ शकतो 

 • जिरायती गहू ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात,
 • बागायती वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात,
 • बागायती उशिरा पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करावी.

दाणे थंडीत चांगले भरले जातात हे लक्षात घेवून पेरणीच्या वेळेचे नियोजन करावे. 

जमिनीची निवड व तयारी:

हलक्या जमिनीत गहू घेवूच नये. मध्यम जमिनीत भर खतांचे व रासायनिक खतांचे नियोजन उत्तम ठेवावे. गहू पिकासाठी भारी व खोल जमीन उत्कृष्ट असते. बागायती साठी चांगला निचरा होणारी तर जिरायती साठी ओल टिकवून धरणारी जमीन निवडावी. जमीन तयार करण्यासाठी १५-२० सेमी खोल नांगरणी करावी, ३-४ वेळा कुळव फिरवून माती भुसभुशीत करावी,

शेवटच्या कुळवणी अगोदर एकरी ४ टन उत्तम दर्जाचे पूर्णपणे कुजलेले, ३ किलो हुमणासूर मिसळलेले शेणखत  पसरवावे. पूर्वी हुमणी फक्त उसाला लागत असे पण आता तिचा प्रादुर्भाव इतर पिकात देखील दिसून येतो, त्यामुळे हुमणासूरची शिफारस करण्यात येत आहे.

पेरणी

पेरणीसाठी ४० किलो बियाण्यामध्ये १ किलो ह्युमोल गोल्ड व रासायनिक खताचा पहिला हप्ता मिसळून टाकावा व दोन चाडीची पाभर उपयोगात आणावी. दोन ओळीतील अंतर २२.५ ते २३.० सें.मी. राखावे. पेरणी ५ ते ६ से.मी. पेक्षा जास्त खोल होणार नाही याकडे लक्ष द्यावे. ओळी मधील अंतरामुळे आंतरमशागत करणे सोपे होईल.

खत नियोजन

 • जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी एकरी 16 किलो नत्र आणि 8 किलो स्फुरद आणि 8 किलो पालाश, १० किलो मायक्रोडील ग्रेड १ द्यावे.
 • बागायती गव्हास वेळेवर पेरणीसाठी पेरणीच्या वेळी एकरी 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद व 16 किलो पालाश व १० किलो मायक्रोडील ग्रेड १ द्यावे. तर तीन आठवड्याने खुरपणी झाल्यावर 25 किलो नत्र द्यावे
 • उशीरा पेरणीसाठी एकरी पेरणीच्या वेळी एकरी 25 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 16 किलो पालाश व १० किलो मायक्रोडील ग्रेड १ द्यावे तर तीन आठवड्याने खुरपणी झाल्यावर 25 किलो नत्र द्यावे

तणव्यवस्थापन

रुंद पत्याच्या तणासाठी टू फोर डी, टरब्यूट्रीन, फ्लूरोक्झीपूर, डीकंब या तणनाशकांची तर अरुंद पानाच्या तणासाठी आयसोप्रोट्युरॉन, मेथाबेन्झथायझुरोन, पेंडामेथालीन या तणनाशकांची शिफारस करण्यात आली आहे. या बद्दल अधिक माहितीसाठी आपण श्री. अमोल पाटील यांच्याशी व्हाट्सअप वर संपर्क साधू शकतात. स्कीनवर तरंगणारया बटनावर क्लिक करा.

गव्हाचे उत्पादन वाढविण्यासाठी करायचे व्यवस्थापन, कमतरतेची लक्षणे व त्यांचे निराकरण याविषयी माहिती "गहू लागवड व व्यवस्थापन -भाग 2" प्रकाशित करण्यात आला आहे. तो वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

 •  संदर्भ:
 • PDKV, Akola
 • Vikaspedia
 • farmer.gov.in