प्रभावी तणनियंत्रणातून मिळवा ३०-४० % अधिक फायदा

प्रभावी तणनियंत्रणातून मिळवा ३०-४० % अधिक फायदा

आपली मृदा किती कसदार आहे? आपण किती दर्जेदार व संतुलित खते वापरली आहेत? किती चांगले बियाणे वापरले आहे? हे सर्व दुय्यम ठरते जेव्हा "तण खाते धन"! त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने प्रभावी पद्धतीने तण नियंत्रण करायला हवे.

गाजरगवत, हरळी, कुंदा, नागरमोथा अशी कितीतरी तणे आहेत जी आपले भरमसाठ नुकसान करतात. हि तणे मुख्य पिकासोबत खते, पाणी व जागेसाठी स्पर्धा करतात. यामुळे उत्पन्नात ३०-४० टक्के घट येते. दुर्लक्ष झाले तर तणामुळे रोग-किडींचा प्रदुर्भावात वाढू शकतो. अशा पद्धतीने एकीकडे उत्पादन खर्च वाढतो तर दुसरीकडे उत्पादनाच्या गुणवत्तेत व गुणोत्तरात घसरण होते.

"तण देई धन" असे काही तथाकथित-स्वघोषित तज्ञांनी म्हटले असले तरी आपण यांच्या "बडबड" गीताकडे दुर्लक्ष करावे कारण आपल्याला आधुनिक जगासोबत यशस्वी व्हायचे आहे!  

प्रत्येक पिकासाठी एक सुरवातीचा संवेदनशील कालावधी असतो. या कालावधीत पिकाची प्रार्थमिक वाढ होत असते. या कालावधीत आपण प्रभावी तण नियंत्रण केले हि तणे पिकाचे काही खास नुकसान करू शकत नाहीत. मुग, उडीद, बाजरी या पिकात हा संवेदनशील कालावधी ३५ दिवस; ज्वारी, सुर्यफुल, भात, सोयाबीन, भुईमुग मध्ये ३० दिवस, कापूस व तुरीत ६० दिवस व उसात १२० दिवस असा असतो.  

कधीही नियंत्रणापेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावशाली असतो. तणनियंत्रणाच्या पद्धती जाणून घेण्यापूर्वी आपण तणप्रतिबंधनात्मक उपाय काय आहेत हे देखील जाणून घेवू.   

 • नेहमी तण विरहित बियाणेच वापरा
 • बांध-धुरे-पाट याठिकाणी तण वाढू देवू नका
 • शेत-परिसरात येणारे कोणतेही तण फुलावर यायच्या आधी उपटा
 • पूर्णपणे कुजलेलेच कंपोष्ट वापरा कारण अश्या कंपोष्ट मधील तणांच्या सर्व बिया उष्णतेमुळे निर्जीव झालेल्या असतात
 • पेरणी करण्यापूर्वी आलेली तणे वाखरीने काढून शेत स्वच्छ करा

तणनियंत्रणाची एकात्मिक पद्धत

तणनियंत्रण करण्यासाठी नेहमी एकात्मिक पद्धतीचाच वापर करावा. याचा अर्थ असा होता कि दोन ते तीन संपूर्ण वेगळ्या पद्धतींची सांगड घालावी. 

व्यवस्थापकीय पद्धत - हि तण नियंत्रणाची अप्रत्यक्ष पद्धत आहे असे म्हणायला हरकत नाही. वेळेवर, योग्य खोलीवर व नेमक्या अंतरावर पेरणी करणे, खतांची योग्य मात्रा अचूक पद्धतीने देणे, एकरी रोपांची संख्या योग्य राखणे, नेमके जलव्यवस्थापन, आंतरपीक घेणे यांचा या पद्धतीत समावेश होतो.

भौतिक/यांत्रिक पद्धत - या पद्धतीत तण उपटणे, निंदणी-खुरपणी, कोळपणी करणे, पेरणीपूर्व वखराचीपाळी मारणे, मल्चिंग (प्लास्टिक, अवशेष) करणे अशा पद्धतींचा समावेश होतो. 

रासायनिक पद्धत - या पद्धतीत रासायनिक तणनाशकांचा उपयोग करण्यात येतो.  तणनाशकाचे परिणाम जितके स्पष्ट दिसतात तितकेच त्याचे दुष्परिणाम देखील स्पष्ट असतात त्यामुळे यांचा उपयोग व्यवस्थित अभ्यास करूनच करावा.

 • काही तणनाशके आंतर प्रवाही असतात. ते पिकाच्या आत शोषले जातात व त्यानंतर परिणाम दाखवतात. परिणाम दिसायला ३-४ दिवस लागतात उदा. ग्लायफोसेट 
 • स्पर्शजन्य तणनाशके लगेच परिणाम दाखवतात पण त्यांची फवारणी नीट व्हायला हवी. उदा पॅराक्वाट, ओक्झीफ्लुरफेन, डायक्वाट आणि ब्रोमोक्झीनील 
 • निवडक तणनाशके- यांची प्रमाणबद्ध फवारणी केल्यास तण जळते व मुख्य पिकास काहीही होत नाही. जसे एट्राझीन, पेंदिमिथिलीन
 • बिन-निवडक तणनाशके - सर्व प्रकारच्या वनस्पती साठी घातक असतात जसे  पेराक्वाट, ग्लायफोसेट
 • अवशेषजन्य तणनाशके - यांचे अवशेष जमिनीत टिकून रहातात व नंतर अंकुरणाऱ्या तणांचा नाश करतात.
 • अवशेषविरहीत तणनाशके - यांचे अवशेष जमिनीत टिकून रहातनाहीत. 
 • उगवणी पूर्व तणनाशके - कोणत्याही पेरणी पूर्वी वापरली जातात
 • पेरणीनंतर पण उगवणी पूर्व तणनाशके - पेरणीनंतर लगेच पण अकुरणापूर्वी वापरली जातात
 • उगवणी नंतरची तणनाशके - उभ्या पिकात वापरली जातात, मुख्य पिकावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

मल्चफिल्मची निवड व फायदा हा ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जैवक नियंत्रण - कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करून तणनियंत्रण करता येते. उदा. गाजरगवताचे नियंत्रण करण्यासाठी त्यावर मेक्‍सिकन भुंगे सोडण्यात येतात किंवा तरोटा, स्टायलो हेमाटा गवत घेऊन गजरगवताच्या वाढीवर नैसर्गिक नियंत्रण ठेवता येते. 

मित्रहो अचूक तणनियंत्रणातून उत्पादनात ३०-४० % वाढ सहज होते. मुख्य पिकाला वाढायला पूर्ण वाव मिळतो. या विषयावर अजून काही माहितीपूर्ण ब्लॉग आम्ही लवकरच देणार आहोत. 

आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

फेसबुक
टेलेग्राम
आपल्याला कोणत्या पिकाचे व्यवस्थापन शेड्यूल हवे आहे का? शेड्यूल मिळवा स्क्रीन वर दिसणाऱ्या बटणावर क्लिक करा.
Back to blog