ढेपाळणारी इच्छाशक्ती आणि आईची शपथ

"आता मी कधीही दारू पिणार नाही, काहीही झाले तरी मी एका थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही. माझ्या आईची शप्पथ!" सुभानरावांनी शपथ घेतली तेव्हा त्यांच्या कुटुंबाला खूप आनंद झाला. 

सुभानराव तसे मनस्वी होते. मनाने ठाम होते. ठरवले ते करून दाखवायची त्यांच्यात धमक होती. अशा अनेक घटना होत्या, अनेकांचा अनुभव होता. त्यामुळेच सुभांनरावांनी शपथ घेतली तेव्हा कुटुंबात एक विश्वास निर्माण झाला. घरी तसे चांगलेच होते. चार भावातील सुभानराव थोरला होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने शेतीत लक्ष घातले. भाउकीत एकट्या पडलेल्या वडलांच्या खांद्याला खांदा लावून त्याने दरमजल करत प्रगती केली होती. "हे माझे - हे तुझे" त्याच्या गावी नव्हते. भाऊ-बहिणीचे शिक्षण, लग्न, नोकरी, व्यवसाय, अडी-अडचणीला तो धावून जाई. 

"माझा सुभानराव हिरा आहे हिरा!" त्यांची आई चारचौघात ठासून सांगत असे. कधी कधी हळूच कुणीतरी "सुभानराव दारुडे" असल्याचा विषय काढी. "स्वत:च्या पैशाची पितो - कुणाच्या घरी येवून गोंधळ घालतो का?" असा प्रतीप्रश्न विचारून आई "पदराखाली" लपवायचा प्रयत्न करत असे. 

पण आता सुभानरावांनी शपथच घेतली होती!

दारूचे व्यसन सुटून चार वर्षे झाली होती. सुभांनरावांचे आई-वडील आता शरीराने थकले होते. वडिलांचा एका अपघातात पाय मोडला तेव्हा पासून ते थोडे जायबंदी झाले. आईला मधुमेहाने कवेत घेतले. मुलांच्या शिक्षणासाठी सुभानरावांची पत्नी मुलांसहित शहरात राहायला गेली. भाऊ-बहिणी सारे त्यांच्या त्यांच्या संसारात लागले. अधूनमधून फोन सूर रहात पण सहवास नव्हता. सुभानरावांना एकटेएकटे वाटू लागले. शेतीत नित्य एका संकटाला सामोरे जावे लागते त्यामुळे सुभानरावांची सारी इच्छाशक्ती "शेतीत प्रगती साधण्यात" लागली होती. दमून भागून घरी आल्यावर त्यांनी गुपचूप "थोडी-थोडी घ्यायला सुरवात केली". कुणाच्या लक्षात येणार नाही याची ते काळजी घेत. 

व्यसनमुक्ती साठी लागणारया "इच्छाशक्ती"ची वाटणी झाली होती. त्यामुळे हळूहळू हे "गुपचूप चे पिणे" बळ धरु लागले. सुभानराव सायंकाळ झाली कि सर्वांना चुकवून आपली इच्छा तृप्त करत. आपल्याला कधीही कमी पडू नये म्हणून त्यांनी खोलीतील एका कप्यात दारूचा साठाच करून ठेवला. 

कितीही लपवले तरी लपून राहणारी हि गोष्ट नाही. सुटीत घरी आलेल्या त्यांच्या पत्नीच्या लक्षात हि गोष्ट आली. उगाच हा विषय काढला तर "सुभानराव" उघड-उघड प्यायला मोकळे होतील म्हणून तिने विषय उकरला नाही. 

इकडे जीवनात अडीअडचणी वाढू लागल्या. कर्ज वाढल्यामुळे सुभानरावांनी शेतीचा एक तुकडा विकला. मुलाच्या शिक्षणासाठी व मुलीच्या लग्नासाठी अजून काही भाव विकावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. आपण इतक्या मेहनतीने जोडलेली शेती विकावी लागणार याचे सुभानरावांना दुख: होत होते. नियती त्यांची परीक्षा घेत होती. 

सुभानराव शेतात जाण्यापूर्वी "एक पेग" घ्यायला लागले. आईच्या लक्षात येणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेत. इतरही कुणाच्या लक्षात येणार नाही असा त्यांचा प्रयत्न होता. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही.

एक दिवस शेतात माणूस निरोप घेवून आला, "आई चक्कर येवून पडली." सुभानराव तडक घरी आले. आई शेजारी बसले, तिचा हात हातात घेतला. "काळजी घे" एव्हडे बोलून आईने डोळे मिटले. सुभानरावांच्या डोक्यावर मोठेच संकट कोसळले, धीर सुटला व ते रडू लागले; अगदी लहान मुलासारखे. 

इतर सर्व सोपस्कार सुरु झाले. "आईची तब्येत काही इतकी वाईट नव्हती, अशीकशी अचानक सोडून गेली?" हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला होता. "आई थकली होती पण अशी अचानक जावी असे काही झालेलं नव्हत." "असे का झाले?"

काहीतरी कामासाठी सुभानराव त्यांच्या खोलीत गेले. काम करता करता अचानक त्यांचे लक्ष कप्याकडे गेले, तो उघडा होता.

"आईने ते बघितले असावे?" हा विचार येताक्षणी "सुभांनरावांच्या छातीत कळ आली, ते कोसळले".

"मित्रहो. व्यसन सोडणे इतके सोपे नाही. इच्छाशक्ती महत्वाची आहे पण फक्त तिच्या जोरावर व्यसनमुक्ती होत नाही. जीवनातील चढ-उतरात इच्छाशक्ती विभागली जाते. मोह हा त्यापेक्षा गहन विषय आहे. बोट दिले तर तो हात पकडतो!  तुम्हाला कुठलेही व्यसन असेल तर आजच व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्या. व्यसन सोडा!

तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा!