सोशल

? *रामफळ लागवडीविषयी थोडक्यात* ?

रामफळ हा सीताफळापेक्षा मोठा पानझडी वृक्ष असून हा मूळचा वेस्ट इंडीजमधला असून हल्ली भारतात व उष्ण कटिबंधीय अमेरिकेत भरपूर आढळतो. खाद्य फळांकरिता याची लागवड करतात; पण ती सीताफळापेक्षा कमी आहे. भारतात उद्यानांतून लहान प्रमाणावर परंतु शेतात अधिक प्रमाणावर रामफळाची लागवड करतात. बंगालमध्ये व द. भारतात रामफळाचे वृक्ष सुस्थित झाले आहेत. रामफळ हे उन्हाळ्यात येणारे फळ आहे. फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे (कुटुंबातील) आहे. रामफळ, सीताफळ, मामफळ व चेरिमोया अथवा मारुतिफळ ह्या ॲनोना या प्रजातीतील चार जाती भारतात आढळतात; या प्रजातीत एकूण सु. १२० जाती आहेत.
सीताफळाप्रमाणे पण रंगाने पिवळट लालसर व मोठे (सु. १० – १५ सेंमी.) आणि वजनाने एक किग्रॅ. पर्यंत असते. त्याची साल गुळगुळीत व त्यावर पुसट डोळे असतात. फळाचा हृदयासारखा आकार व रंगरूप यांवरून बैलाचे हृदय (बुलक्स हार्ट) या अर्थाचे इंग्रजी नाव पडले आहे. बिया अनेक, काळपट आणि गुळगुळीत असून तळाशी रुंद व गोलसर आणि टोकास निमुळत्या असतात.
फळातील मगज काहीसा आंबुस गोड, रुचकर पण रवाळ वा पिठूळ, पांढरट व खाद्य आहे. राजस्थानात पाने व कोवळ्या फांद्या टॅनीनमुळे कातडी कमावण्यास वापरतात. अपक्व व सुकलेल्या फळांत काळा रंग व ताज्या पानांत नीळ सापडते. लाकूड उपयुक्त असते. सालीत ०·०३ टक्के ॲनोनाइन हे अल्कलॉइड असते. कोवळ्या फांद्यांवरच्या सालीपासून चांगला धागा मिळतो. बियांचे तेल कीटकनाशक म्हणून व साबण बनविण्यास वापरण्यास उपयुक्त असते. रामफळाचा गर, साखर, सिट्रिक आम्ल आणि गरजेप्रमाणे पेक्टिन याचं प्रमाणबद्ध मिश्रण आटवून रबड़ीसारख्या घट्ट जाम बनवता येतो.
साधारणतः शेळी, हरण यांच्यापासून फळबागा वाचवण्यासाठी त्या शेतकरी रामफळ लावतात कारण रामफळाची पाने विषारी असल्यामुळे ते कोणते प्राणी खात नाहीत. कमी पाण्यावर येणारी हे पिक फायदेशीर आहे. उन्हाळय़ात या झाडाला पाणी लागत नाही. फेब्रुवारीपासून झाडांची पानगळ सुरू होते व मार्च ते जून या कालावधीत अजिबात पाणी दिले नाहीतरी हे झाड तगून राहते.
रामफळाची लागवड 4X4 मीटर ते 5X5 मीटर या अंतराने करावी. साधारणतः 2.5 फुट X 2.5 फुट X 2.5 फुट आकाराचे घ्यावेत. खड्ड्याच्या तळाशी वाळलेला पालापाचोळा घालावा. 3 घमेली पूर्ण कुजलेले शेणखत, अर्धा किलो निंबोळी पेंड, 1 किलो सुपर फॉस्फेट, 50 ते 60 ग्रॅम लींडेन पावडर तसेच चांगली माती या सर्वांनी खड्डा भरावा. खड्डा पूर्ण भरून घ्यावा व संध्याकाळच्या दरम्यान खड्ड्याच्या मधोमध कलम लावावे. कलम लावताना पॉलीथीन पिशवी ब्लेडने कापावी पण मातीचा गड्डा फुटु देऊ नये कारण मातीचा गड्डा फुटल्यास मुळांना इजा पोचू शकते. लागवडीनंतर झाडांना लगेच पाणी द्यावे व काठीचा आधार द्यावा.
पावसाळ्यात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खोडाला पाणी साचु देऊ नये. साधारणतः 2.5 फुटापर्यंत एका खोड वाढु द्यावे. रामफळाच्या खोडावरील फुट नियमीत काढावी. 3 ते 4 फांद्या वेगवेगळ्या दिशेस वाढु द्याव्यात.
रामफळाच्या एका झाडापासून वर्षभरात सुमारे २५ किलो इतकी फळे मिळतात. जानेवारी ते मार्च या कालावधीतच झाडाला फळे येतात. एका झाडापासून एक हजार रुपये उत्पन्न मिळते. या फळाचे वैशिष्टय़ असे की, नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत सिताफळ येते व एप्रिलनंतर बाजारपेठेत आंबा येतो. जानेवारी ते मार्च या कालावधीत रामफळ येते. त्या्मुळे बाजारपेठेत कोणत्याही फळाशी स्पर्धा करावी लागत नाही त्यामुळे याला भावही चांगला मिळतो. पुणे, वाशी, सुरत, कोल्हापूर अशा बाजारपेठेत ते आपला माल पाठवू शकतो. रामफळाची पाने व शेतातील तण जमिनीतच कुजवून त्याचे खत झाडाला दिले तरी भागते. सध्या उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, बीड व नांदेड या जिल्हय़ात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. कमी पाण्यावर रामफळाची बाग चांगली पोसली जाते. शेतकऱ्यांनी रामफळाचे उत्पादन घेण्याचे ठरवले तर ते जेवढे उत्पादन करतील तेवढय़ा मालाला बाजारपेठ आहे.